शिर्डी लोकसभा मतदारसंघात प्रचाराच्या तोफा थंडावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:50 PM2019-04-28T12:50:00+5:302019-04-28T12:50:44+5:30

शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. २९) मतदान होत आहे़ गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला प्रचार शनिवारी सायंकाळी थंडावला.

 Shirdi Lok Sabha Constituency | शिर्डी लोकसभा मतदारसंघात प्रचाराच्या तोफा थंडावल्या

शिर्डी लोकसभा मतदारसंघात प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Next

शिर्डी : शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. २९) मतदान होत आहे़ गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला प्रचार शनिवारी सायंकाळी थंडावला. प्रचार फेऱ्या, सभा घेऊन शेवटच्या दिवशीही आरोप-प्रत्यारोप झाले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे शिर्डी मतदारसंघातील प्रचार चांगलाच तापला होता.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. शिवसेनेकडून खासदार सदाशिव लोखंडे, काँग्रेसकडून आमदार भाऊसाहेब कांबळे, अपक्ष व भाजपचे बंडखोर माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह २० उमेदवार रिंगणात आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघात राहुल गांधी, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, नितीन गडकरी, शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या सभा झाल्या. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, करण ससाणे यांच्या पदाच्या राजीनाम्याने प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राजकारणाने वेगळे वळण घेतले.
लोकसभा मतदारसंघासाठी येत्या २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेची संपूर्ण तयारी झाली असून १५ लाख ८४ हजार ३०३ मतदार येथे आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पी. एल. सोरमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याप्रसंगी निवडणूक निरीक्षक विरेंद्रसिंह बंकावत, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) जितेंद्र पाटील, तहसीलदार (निवडणूक) हेमा बडे, नायब तहसीलदार गोसावी यांच्यासह विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी ८ लाख २१ हजार ४०१ पुरुष, तर ७ लाख ६१ हजार ८३२ महिला तर इतर ७० मतदार आहेत. निवडणूक कामासाठी नेमणूक असलेल्या ६ हजार ५४८ मतदारांना टपाली मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत.
मतदानासाठी १७१० मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर १० हजार २६० अधिकारी, कर्मचारी व १५९ क्षेत्रीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर मतदानाच्या कालावधीत जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मतदार संघातील १७४ मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात येणार असून इतर १०१ मतदानकेंद्रांवर सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय एक याप्रमाणे ९ मतदान केंद्र सखी मतदान केंद्र म्हणून निवडण्यात आले असून येथील सर्व अधिकारी, कर्मचारी हे महिला असणार आहे.
लोकसभा निवडणुकीची प्रशासकीय पातळीवर संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. दि. २८ एप्रिल रोजी निवडणुकीसाठी नेमलेले अधिकारी साहित्यासह केंद्रांवर दुपारपर्यंत पोहोचणार आहेत.

Web Title:  Shirdi Lok Sabha Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.