on the seventh day of fasting against the wrong course of the railway route | रेल्वे मार्गाच्या चुकीच्या सर्वेक्षणाच्या विरोधात कुकाण्यातील उपोषण सातव्या दिवशी सुरुच

ठळक मुद्देबेलापूर-नेवासा-शेवगाव-गेवराई-बीड-परळी या रेल्वे मार्गाच्या चुकीच्या सर्वेक्षणाच्या विरोधात कुकाणा उपोषणकोणतीही सकारात्मक चर्चा न झाल्याने गुरुवारी सातव्या दिवशी हे उपोषण सुरुचउपोषणास बसलेल्या सहा उपोषणार्थींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना बुधवारी रात्री नगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

कुकाणा : बेलापूर-नेवासा-शेवगाव-गेवराई-बीड-परळी या रेल्वे मार्गाच्या चुकीच्या सर्वेक्षणाच्या विरोधात कुकाणा (ता. नेवासा) येथील नागरिकांनी १ डिसेंबरपासून कुकाणा येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणात कोणतीही सकारात्मक चर्चा न झाल्याने गुरुवारी सातव्या दिवशी हे उपोषण सुरुच होते. बुधवारपासून साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे.
उपोषणास बसलेल्या सहा उपोषणार्थींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना बुधवारी रात्री नगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. सुरेश नरवणे, कारभारी गरड, प्रकाश देशमुख, निसार सय्यद, महेश पुंड यांचा यामध्ये समावेश आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे समजले. रितेश भंडारी उपोषणस्थळी ठाण मांडून आहेत. जोपर्यंत रेल्वेचे सरव्यवस्थापक रेल्वे मार्गाच्या सर्वेविषयी लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला आहे.
ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी दहातोंडे यांनी गुरुवारीे उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. गडाख म्हणाले, बेलापूर-नेवासा रेल्वे मार्ग होणे महत्त्वाचे आहे. नेवासा तालुक्यात तीर्र्थक्षेत्राबरोबरच कारखानदारी मोठी आहे. हा मार्ग झाल्यास नेवासा, शेवगाव तालुक्याच्या विकासाला चालना मिळेल. हा प्रश्न रेल्वे मंत्र्यांपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करीन, असे आश्वासन गडाख यांनी दिले.
सातव्या दिवशीच्या साखळी उपोषणामध्ये लतीफ मन्सुरी, भानुदास मिसाळ, मुसा इनामदार, पोपट सरोदे, मधुकर पावसे, सतीश मुथ्था, भाऊसाहेब खाटीक, सुरेश खाटीक, दादा थोरे, दिलीप खाटीक, सनी जगदाळे, हरिश्चंद्र खाटीक यांच्यासह परिसरातील युवक सहभागी झाले आहेत. उपोषणाला कुकाणा व परिसरातून पाठिंबा मिळत आहे.


Web Title: on the seventh day of fasting against the wrong course of the railway route
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.