मिरजगाव  : कर्जतसह व आष्टी तालुक्याला वरदान ठरलेले सीना धरण तब्बल सात वर्षांनी बुधवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास शंभर टक्के भरले. तर चारच्या सुमारास सांडव्यावरून पूर्णपणे विसर्ग सुरू झाला.
सातत्याने दुष्काळी परिस्थिती या भागात असल्याने सीना धरण ओव्हरफ्लो झाल्याने या लाभक्षेत्रातील शेतकºयांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास सीना धरण २४०० दशलक्ष घनफूट पूर्ण क्षमतेने भरले असून दुपारी चारच्या सुमारास सांडव्यावरून चार दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून २०१० नंतर तब्बल सात वर्षांनी हे धरण ओव्हरफ्लो झाले. कुकडीच्या आवर्तनाच्या मदतीने हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. सीना धरणात सध्या कुकडीचे ४११ दशलक्ष घनफूट पाणी आले असून उर्वरित पाणी पावसाने धरणात आले आहे. धरणाच्या दोन कालव्यापैकी उजव्या कालव्याद्वारे आवर्तन चालू आहे.
 सीना धरण ओव्हरफ्लो करूच व सीना धरण ओव्हरफ्लो होईपर्यत कुकडीचे आवर्तन सुरूच ठेऊ, अशा शब्द पालकमंत्र्यांनी मतदार संघातील जनतेला दिला होता. कुकडीच्या इतिहासात पहिल्याच जुलै महिन्यात कुकडीचे पाणी तालुक्यात आले.