संगमनेर : तालुक्यातील कोल्हेवाडी येथील तरुणांची छेड काढणा-या आणि मुलांना मारहाण करणा-या गुन्हेगारांना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी संगमनेर पोलीस ठाण्यावर शनिवारी सकाळी ११ वाजता कोल्हेवाडी ग्रामस्थांनी मोर्चा काढला.
कोल्हेवाडी येथील मुले, मुली संगमनेर येथे शिक्षणासाठी येतात. दरम्यान शहरातील दिल्ली नाका परिसरात काही टुकार तरुण कोल्हेवाडीहून येणा-या मुलींची छेड काढतात. त्यामुळे मुली या रस्त्यावरुन येण्याजाण्यास घाबरतात. दिल्ली नाका परिसरातील काही तरुणांनी नुकतीच कोल्हेवाडी येथील दोन शाळकरी मुलांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. यातील एका मुलाच्या डोक्याला टाके पडले असून, शाळकरी मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तसेच गुन्हेगारांना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी कोल्हेवाडी ग्रामस्थांनी संगमनेर पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला.