शेवगावात राष्ट्रवादीला धक्का, भाजपाच्या राणी मोहिते नगराध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 05:46 PM2018-08-01T17:46:01+5:302018-08-01T17:46:24+5:30

शेवगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या माध्यमातून तालुक्याच्या राजकारणाला नाट्यपूर्ण कलाटणी मिळाली असून अंतर्गत फाटाफुटीमुळे राष्ट्रवादीच्या ताब्यातील या नगरपरिषदेवर कब्जा करण्यात भाजपला यश मिळाले आहे.

Pushing NCP to Shevgaon, Rani Mohite municipal chief of BJP | शेवगावात राष्ट्रवादीला धक्का, भाजपाच्या राणी मोहिते नगराध्यक्ष

शेवगावात राष्ट्रवादीला धक्का, भाजपाच्या राणी मोहिते नगराध्यक्ष

Next

शेवगाव : शेवगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या माध्यमातून तालुक्याच्या राजकारणाला नाट्यपूर्ण कलाटणी मिळाली असून अंतर्गत फाटाफुटीमुळे राष्ट्रवादीच्या ताब्यातील या नगरपरिषदेवर कब्जा करण्यात भाजपला यश मिळाले आहे. नगराध्यक्षपदी भाजपच्या राणी विनायक मोहिते तर उपनगराध्यक्षपदी अपक्ष नगरसेवक वजीर बाबुलाल पठाण यांची निवड झाली. राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांनी बंड पुकारल्याने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना आपल्या बालेकिल्ल्यातच मोठी नामुष्की पत्करावी लागली आहे.
नगराध्यक्षा राणी मोहिते व उपनगराध्यक्ष वजीर पठाण यांना प्रत्येकी १२ तर, विरोधी राष्ट्रवादीच्या विजयमाला तिजोरे व सागर फडके यांना प्रत्येकी ९ मते मिळाली.
शेवगाव नगरपरिषदेच्या पदाधिकारी निवडीसाठी प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवकांची विशेष बैठक आज पार पडली. पालिकेचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या राणी मोहिते व राष्ट्रवादीतर्फे अपक्ष नगरसेविका विजयमाला कैलास तिजोरे यांच्यात सरळ लढत झाली. उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून कमलेश गांधी, शारदा काथवटे व अपक्ष वजीर पठाण अशा तिघांनी तर राष्ट्रवादीकडून अपक्ष नगरसेवक सागर शशिकांत फडके यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून गांधी व काथवटे यांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे पठाण व फडके यांच्यातही सरळ लढत झाली.
शेवगाव नगरपालिकेत राष्ट्रवादी ९, भाजप ८ व अपक्ष ४ असे बलाबल आहे. नगरपालिका निवडणुकीनंतर पदाधिकारी निवडीत राष्ट्रवादीने तीन अपक्षांना बरोबर घेत सत्ता काबीज करण्यात यश मिळविले होते. त्यामुळे आजही राष्ट्रवादीच्या एकतर्फी विजयाचा अंदाज वर्तविण्यात येत होता. तसेच पदाधिकारी निवडीपूर्वी १२ नगरसेवकांचा हा गट एकत्रितरित्या सहलीवर गेल्याने या अंदाजाला बळकटी मिळाली होती. त्यातच भाजपने मात्र गनिमीकाव्याने विजयाचे मनोरे बांधण्यास सुरुवात केली. उपनगराध्यक्षपदाची उमेदवारी मुस्लिम समाजाच्या अपक्ष नगरसेवकास देण्याची तयारी दर्शवून तसेच राष्ट्रवादीकडून उमेदवारीबाबत नाराज असलेल्या पक्षाच्या तिघा नगरसेवकांना आपल्या बाजूने वळविण्याची खेळी भाजपने यशस्विपणे पार पाडली.

राष्ट्रवादीच्या तिघांची बंडखोरी
शेवगाव नगरपरिषदेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक उमर बशीर शेख, शब्बीर कासब शेख व अजय उत्तम भारस्कर यांनी भाजपची उघड पाठराखण केली. राष्ट्रवादीच्या आजच्या पराभवास दोन महिन्यापूर्वी तत्कालीन नगराध्यक्षा विद्या लांडे यांच्याविरुध्द सागर फडके यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्याच गटातील काही नगरसेवकांनी दाखल केलेल्या अविश्वास ठराव नाट्याची किनार लाभली आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत बंडाळीचा ऐनवेळी अचूक लाभ उठवून त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटविण्याची करामत आमदार मोनिका राजळे यांनी केली. तालुक्याचे मुख्यालय असलेल्या शेवगाव नगरपरिषदेत झालेल्या सत्तांतरामुळे तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली असून ही घटना राष्ट्रवादीला अंतर्मुख करणारी तर, भाजपला उभारी देणारी ठरली आहे.

 

Web Title: Pushing NCP to Shevgaon, Rani Mohite municipal chief of BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.