घाटशिरस येथील बोगस डॉक्टरच्या रुग्णालयावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 03:14 PM2018-03-19T15:14:55+5:302018-03-19T15:14:55+5:30

पोलिसांनी बोगस डॉक्टर सुमित बिश्वास यास ताब्यात घेतले

Print on the bogus doctor's hospital in Ghatshiras | घाटशिरस येथील बोगस डॉक्टरच्या रुग्णालयावर छापा

घाटशिरस येथील बोगस डॉक्टरच्या रुग्णालयावर छापा

Next

पाथर्डी : तालुक्यातील घाटशिरस येथे तालुका आरोग्य अधिकारी, पोलीस यांनी संयुक्तपणे एका बोगस डॉक्टरवर कारवाई केली. यावेळी राबविलेल्या छापा सत्रात रुग्णालयातील औषधाचा साठा हस्तगत केला असून बोगस डॉक्टर सुमित बिश्वास यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घाटशिरस येथे गेल्या अनेक दिवसापासून वैद्यकीय व्यवसाय करणारा सुमित बिश्वास हा बोगस डॉक्टर गावात राहत्या घरातील दवाखान्यातून अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय चालवत असल्याबाबत बोगस डॉक्टर तालुका शोध पथकांला माहिती मिळाली होती. त्याच अनुषंगाने तालुका आरोग्य अधिकारी भगवान दराडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.भास्कर लाखुळे, आरोग्य सेवक जायभाय, हरिष शेळके, आरोग्य सेवक धर्मनाथ पालवे, पोलीस कॉ. देविदास तांदळे यांनी बोगस डॉक्टर शोध समिती अध्यक्ष तथा गटविकास अधिकारी जगदीश पालवे व पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गावात सोमवारी सकाळी अचानक छापा टाकला असता सुमित बिश्वास हा परप्रांतीय बोगस डॉक्टर बेकायदेशीररित्या वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास आले.
सुमित बिश्वास याने भरारी पथकाला पाहताच दवाखान्याच्या मागच्या दाराने धूम ठोकली, परंतु पथकाने बिश्वास याला पाठलाग करून पकडले आहे. अवैधरित्या दवाखाना सुरु असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर इंजेक्शन, सुया, औषधांचा मोठा साठा आढळून आला असून पथकाने पंचनामा करून सदर औषध साठा जप्त करून बोगस डॉक्टर सुमित बिश्वास याच्याविरुद्ध समितीने फिर्याद नोंदविण्याचे काम सुरु केले आहे.
ग्रामीण भागात राहणाऱ्या गरीब अशिक्षित व अज्ञानी लोकांच्या अडाणी पणाचा गैरफायदा घेऊन तथाकथित बोगस डॉक्टरांनी मोठी माया जमविण्याचे काम सुरु केले असून यापूर्वी गुन्हे दाखल असतानाच नावे बदलून पुन्हा त्याच बोगस डॉक्टरांनी व्यवसाय सुरु केल्याने प्रशासनासमोर आव्हान उभे राहिले आहे.
वैद्यकीय व्यवसायाचा परवाना असल्याशिवाय औषधे पुरविण्यात येऊ नये असा नियम असताना या बोगस डॉक्टरला कोणी औषधे पुरवली याचा शोध घेऊन त्यांच्यावर देखील कार्यवाही करणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी भगवान दराडे यांनी सांगितले.

Web Title: Print on the bogus doctor's hospital in Ghatshiras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.