The price of buffaloes is 2 lakh 41 thousand; Sales in the market in Ghodegaon | अबब ! म्हशींच्या जोडीची किंमत २ लाख ४१ हजार; घोडेगावच्या बाजारात झाली विक्री 

ठळक मुद्देशुक्रवारी म्हसाण जातीच्या जोडीने खरेदीचा विक्रम मोडला. तब्बल २ लाख ४१ हजारांना ही जोडी विकली गेली.या दोन म्हशी औरंगाबाद जिल्ह्यातील वडगाव येथील बागायतदार एकनाथ साळे यांनी खरेदी केल्या.म्हशीच्या बाजारातील जुने जाणते नाव असलेले कै. बबनराव बर्डे यांचे चिरंजीव रवींद्र बर्डे यांच्या दावणीवरून म्हसाण जातीच्या दोन म्हशींची विक्री झाली.

घोडेगाव : जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या घोडेगाव (ता. नेवासा) येथील आठवडे बाजारात शुक्रवारी म्हसाण जातीच्या जोडीने खरेदीचा विक्रम मोडला. तब्बल २ लाख ४१ हजारांना ही जोडी विकली गेली. या दोन म्हशी औरंगाबाद जिल्ह्यातील वडगाव येथील बागायतदार एकनाथ साळे यांनी खरेदी केल्या. बाजारातील अलीकडील हा विक्रम समजला जातो.
देशभरातून घोडेगावच्या म्हशीच्या बाजारात जातिवंत म्हशींची खरेदी व विक्री होते. म्हसाण, मु-हा, जाफराबादी, गावरान, पंढरपुरी अशा म्हशींच्या जाती खरेदी-विक्रीसाठी येतात. शुक्रवारी म्हसाण जातीच्या जोडीचा खरेदी-विक्रीचा उच्चांक मोडला गेला. म्हशीच्या बाजारातील जुने जाणते नाव असलेले कै. बबनराव बर्डे यांचे चिरंजीव रवींद्र बर्डे यांच्या दावणीवरून म्हसाण जातीच्या दोन म्हशींची विक्री झाली. म्हशी जातिवंत आहेत. सडाला चांगल्या आहेत. दूध ही जास्तच आहे. रंग काळाकुट्ट, कुठेही डाग नाही. कुठल्याही प्रकारची खोड नसल्याने व धष्टपुष्ट शरीरयष्टी आणि सर्वगुणी असल्याने विक्रमी किमतीला विक्री झाली असल्याचे बर्डे यांनी सांगितले.
नगर जिल्ह्यातील नेवासा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा घोडेगाव उपबाजार जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे. या बाजारासाठी महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, चंदीगड, हरियाना, दिल्ली, गुजरात, आंध्र, कर्नाटक, केरळ येथून व्यापारी व खरेदीदार येतात.
विक्रमी दरात म्हशींची विक्री झाल्याचे समजताच बर्डे यांनी खरेदी केलेल्या या म्हशी पाहाण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. म्हशींचे खरेदीदार रवींद्र बर्डे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संदीप बर्डे, दादा पा. दरंदले, बबनराव भोसले, शब्बीरभाई शेख उपस्थित होते.

मी तर लक्ष्मी जोडाच संक्रांतीच्या मुहूर्तावर घरी चालवला आहे. आजपर्यंत माझ्याकडे असा लक्ष्मीचा जोडा नव्हता. आता माझ्या दारात या म्हशींच्या रूपाने लक्ष्मीच अवतरणार आहे.
-एकनाथ साळे, म्हशींचे खरेदीदार