भाकड जनावरांना मिळाला निवारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 04:38 AM2019-05-05T04:38:18+5:302019-05-05T04:38:35+5:30

कत्तलखान्याकडे जाणारी मुकी जनावरे सोडवून त्यांचे संगोपन करण्याचे मोठे कार्य उज्ज्वल गोरक्षण संस्थेच्या माध्यमातून भर दुष्काळात संगमनेर तालुक्यातील मांचीहिलच्या उजाड माळरानावर सुरू आहे.

 Poor animals get shelter | भाकड जनावरांना मिळाला निवारा

भाकड जनावरांना मिळाला निवारा

Next

- योगेश रातडिया
आश्वी (जि. अहमदनगर) : कत्तलखान्याकडे जाणारी मुकी जनावरे सोडवून त्यांचे संगोपन करण्याचे मोठे कार्य उज्ज्वल गोरक्षण संस्थेच्या माध्यमातून भर दुष्काळात संगमनेर तालुक्यातील मांचीहिलच्या उजाड माळरानावर सुरू आहे. या गो-शाळेत २४५ गायी, १६० कबुतर, २०० ससे ३ घोडे, ७ बदके अशी लहान, मोठ्या जनावरांना आधार मिळाला आहे.
सुमारे वीस वर्षांपूर्वी जैन साध्वी, वाणीभूषण प्रीतीसुधाजी महाराज यांच्या प्रेरणेतून गो-शाळेची निर्मिती झाली. मुक्या प्राण्यांच्या संगोपनाची कल्पना उदयास आली होती. याच कालावधीत सिंधूताई सपकाळ यांनी सुरू केलेल्या अनाथ आश्रमातील जनावरांच्या गोठ्याला अचानक आग लागली होती. यामध्ये सात ते आठ गायी होरपळल्या होत्या. या सर्व जखमी गायींवर उपचार करून सांभाळ करण्याची जबाबदारी आश्वी (ता. संगमनेर) येथील प्रतिष्ठित व्यापारी दिवगंत स्वरुपचंद गांधी यांनी स्वीकारली. यातून प्रेरणा घेऊन मांचीहिल शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अ‍ॅड. शाळीग्राम होडगर यांनी मांचीहिल येथील गो-शाळेसाठी दोन एकर जमीन दान दिली. जैन साध्वींचे आवाहन व शेकडो गोरक्षकांनी दिलेल्या दानातून गोरक्षक अमोलकचंद पारख यांच्या अध्यक्षतेखाली येथे गो-शाळेस प्रारंभ झाला. २० वर्षांत दीड हजार गायींना जीवदान दिले गेले. गोरक्षणाचे काम सुरू असताना संस्थेला आर्थिक अडचण निर्माण झाली. जैन साध्वी कैवल्यरत्नजी महाराज यांच्या प्रेरणेतून मुंबई येथील माता नाथीबाई दामोदर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुजितजी ठकरसी यांनी गोशाळेला ११ लाख ११ हजार १११ रुपये दिले आहेत. शासनाच्या मदतीविना कार्य सुरू आहे.

मुक्या जनावरांच्या चारा व पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु जैन साध्वी कैवल्यरत्नश्रीजी महाराज यांचा आशीर्वाद व दानशूर व्यक्तीच्या पुढाकारातून गो-शाळेचे काम अविरत सुरू आहे. - सुमतीलाल गांधी,
अध्यक्ष, जैन श्रावक संघ, आश्वी.

उज्ज्वल गोरक्षण संस्थेच्या माध्यमातून दुष्काळात संगमनेर तालुक्यातील मांचीहिलच्या उजाड माळरानावर सुरू असलेल्या गो-शाळेतील जनावरे. येथे जनावरांना पुरेसा चारा-पाणी दिला जातो. त्यासाठी विविध स्वयंसेवी संस्था व दाते मोकळ््या हाताने मदत करत असतात.
 

Web Title:  Poor animals get shelter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.