अहमदनगर : राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या जवखेडे खालसा (पाथर्डी) येथील तिहेरी हत्याकांड खटल्याची सोमवारी जिल्हा न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांच्या न्यायालयासमोर नियमित सुनावणी सुरू झाली आहे़ पहिल्या दिवशी या घटनेतील एका पंचाची साक्ष नोंदविण्यात आली़ पोलिसांनी माझ्या समोरच विहिरीतून मृतदेह बाहेर काढल्याची महत्त्वपूर्ण साक्ष या वेळी या पंचाने दिली़
जवखेडे खालसा येथे एकाच दलित कुटुंबातील संजय जगन्नाथ जाधव, जयश्री संजय जाधव व सुनील संजय जाधव यांची २२ आॅक्टोबर २०१४ रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने तीनही मृतदेहांचे तुकडे करून विहिरीत व बोअरवेलमध्ये फेकण्यात आले होते. याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपास करून प्रशांत उर्फ काळू जाधव, अशोक जाधव व दिलीप जाधव यांना अटक करून त्यांच्याविरोधात जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र केले होते़
हत्याकांड उघडकीस आल्यानंतर पोलीस प्रथम घटनास्थळी दाखल झाले तेव्हा तेथे गावातील पंच आत्माराम घटुळ यांची अ‍ॅड़ यादव यांनी साक्ष घेतली़ या वेळी साक्षीदाराने पोलिसांनी जप्त केलेल्या वस्तुंची ओळख पटविली़ खटल्याची नियमित चार दिवस सुनावणी सुरू राहणार आहे़ (प्रतिनिधी)