राळेगणसिद्धी येथील महाआरोग्य शिबिरातील ३६० रुग्णांवर शिरूर येथे नेत्रशस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 04:36 PM2018-01-16T16:36:36+5:302018-01-16T17:13:36+5:30

राळेगणसिद्धी येथील महाआरोग्य शिबिरातील तपासणी झालेल्या ३६० रुग्णांवर प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली मोतीबिंदू शस्रक्रिया शिरूर (जि. पुणे) येथील ग्रामीण रुग्णालयात दोन दिवसांत करण्यात आल्या.

The ophthalmolary surgery at the Shirur in 360 patients of Ralegansiddhi Medical College | राळेगणसिद्धी येथील महाआरोग्य शिबिरातील ३६० रुग्णांवर शिरूर येथे नेत्रशस्त्रक्रिया

राळेगणसिद्धी येथील महाआरोग्य शिबिरातील ३६० रुग्णांवर शिरूर येथे नेत्रशस्त्रक्रिया

googlenewsNext

राळेगणसिद्धी : राळेगणसिद्धी येथील महाआरोग्य शिबिरातील तपासणी झालेल्या ३६० रुग्णांवर प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली मोतीबिंदू शस्रक्रिया शिरूर (जि. पुणे) येथील ग्रामीण रुग्णालयात दोन दिवसांत करण्यात आल्या. त्यातील १७ जणांवर दोन्ही डोळ्यांवर मोतीबिंदू शस्रक्रिया करण्यात आल्याने त्यांना नवीदृष्टी मिळाली.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मातुश्री कै. लक्ष्मीबाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राळेगणसिद्धी येथे राज्य सरकारच्या आरोग्य विभाग व राळेगणसिद्धी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिर राळेगणसिद्धी येथे गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आले. शिबिरात पारनेर, श्रीगोंदा व नगर तालुक्यातील हजारो रुग्णांची तपासणी करण्यात आली. ११ व १२ जानेवारी या दोन दिवसात ३६० रुग्णांवर मोतीबिंदू शस्रक्रिया पार पडल्या, असे डॉ. लहाने यांनी सांगितले.
शिबिराला बुधवारी सुरुवात होऊन नेत्ररुग्णांची तपासणी करण्यात आली. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन व आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या माध्यमातून या मोतीबिंदू शस्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईच्या जे. जे. रुग्णालयातील ४० व पुण्यातील १७ डॉक्टरांचे पथक तसेच २३ मदतनीस या शिबिरात रुग्णांची देखभाल करीत होते. शिबिरात सहभागी रुग्णांवर मोतीबिंदूवर भिंगरोपणासह बिनटाक्याच्या शस्रक्रिया करण्यात आल्या, असे डॉ. रागिणी पारेख यांनी सांगितले.
शिबिरात सहभागी रुग्णांसाठी निवास, भोजन व इतर सर्व व्यवस्था मोफत करण्यात आली होती. आमदार बाबूराव पाचर्णे, आरोग्यदूत रामेश्वर नाईक, गिरीष महाजन यांचे स्वीय सहाय्यक संदीप जाधव, उपसरपंच लाभेष औटी, सहाय्यक आयुक्त डॉ. गणेश पोटे, सुनील हजारे, एकनाथ भालेकर यावेळी उपस्थित होते. शिरूरचे वैद्यकीय अधीक्षक एस. आर. रोकडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय पोटे, डॉ. तुषार पाटील, डॉ. आर. डी. शिंदे व ग्रामीण रुग्णालय शिरूर येथील कर्मचाºयांनी शिबिराचे संयोजन केले. डॉ. लहाने व डॉ. रागिणी पारेख यांनी रुग्ण व नातेवाईकांना पुढील ४० दिवसांत घ्यावयाच्या काळजीविषयी मार्गदर्शन केले. डॉ. लहाने यांच्या रूपाने दृष्टी देणारा देव माणूस भेटल्याची प्रतिक्रिया वृद्ध नेत्ररुग्णांनी व्यक्त केल्या.
सर्व डॉक्टरांचा आ.पाचर्णे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. शिबिराच्या समारोप प्रसंगी राळेगणसिद्धीचे उपसरपंच लाभेष औटी यांनी रुग्ण, डॉक्टर व शिरूर ग्रामीण रुग्णालयाच्या विशेष सहकार्याबद्दल आभार मानले.

Web Title: The ophthalmolary surgery at the Shirur in 360 patients of Ralegansiddhi Medical College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.