११ महिन्यात ३०० जणांची आॅनलाईन फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 11:34 AM2018-11-22T11:34:39+5:302018-11-22T11:34:56+5:30

बँक खातेदारांना फोन करून तसेच आॅनलाईन खरेदीच्या आॅफर्स देऊन वर्षभरात जिल्ह्यातील ३०० जणांना सायबर गुन्हेगारांनी लाखो रूपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे़

Online fraud of 300 people in 11 months | ११ महिन्यात ३०० जणांची आॅनलाईन फसवणूक

११ महिन्यात ३०० जणांची आॅनलाईन फसवणूक

googlenewsNext

अरुण वाघमोडे
अहमदनगर: बँक खातेदारांना फोन करून तसेच आॅनलाईन खरेदीच्या आॅफर्स देऊन वर्षभरात जिल्ह्यातील ३०० जणांना सायबर गुन्हेगारांनी लाखो रूपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे़ सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसवणूक झालेल्या ३०० पैकी २४२ जणांना त्यांचे पैसे परत मिळाले आहेत.
बँक खातेदारांची आॅनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळ्या मुंंबईसह बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड राज्यात मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे़ सायबर गुन्ह्याचे कॉलसेंटर चालविणाºया बहुतांशी टोळ्यांनी बँक ग्राहकांचा डेटा मिळविलेला आहे.
बँक खातेदाराला फोन केल्यानंतर समोरील व्यक्ती प्रथम त्याच्या संबंधी सर्व माहिती त्याला देते़ अगदी खाते क्रमांकही सांगितला जातो़ त्यामुळे बहुतांशी जणांचा यावर विश्वास बसून हा कॉल बँकेमधून आला आहे असा समज होतो़ तुमचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडावयाचे आहे़ एटीएम कार्ड अपडेटस् करावयाचे आहे, तुम्हाला लोन मंजूर झाले आदी कारणे सांगून सदर ग्राहकांकडून त्याचा एटीएम क्रमांक, ओटीपी विचारून घेतला जातो़
स्वस्तात वस्तू खरेदीचे आमिष
इंटरनेटवरील विविध संकेतस्थळावर तसेच व्हाटसअ‍ॅप व फेसबुकवर ब्रॅण्डेड वस्तू स्वस्तात खरेदी करता येत असल्याच्या आॅफर्स दिल्या जातात़ या आॅफरवर क्लिक केल्यानंतर आॅर्डर बुक केली जाते़ त्यासाठी आॅनलाईन पेमेंट करावे लागते़ हे पेमेंट अदा करताना सदर साईटवर आपला एटीएम कार्डवरील क्रमांक व ओटीपी टाकावा लागतो़ हा ओटीपी सायबर गुन्हेगार नोट करून घेतात़ त्यानंतर ग्राहकाच्या बँक खात्यातून गुन्हेगार त्यांच्या वॉलेटवर रक्कम वर्ग करून घेतात.

२४२ जणांना मिळाले २० लाख ४२ हजार परत
दहा ते अकरा महिन्यांत जिल्ह्यात फसवूणक झालेल्या ३०० पैकी २४२ जणांना सायबर पोलिसांनी २० लाख ४२ हजार ५६० रूपये परत मिळवून दिले आहेत़ बँक खात्यातून या आॅनलाईन चोरट्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे वर्ग करता येत नाहीत़ हे चोरटे त्यांच्या वॉलेटमध्ये हे पैसे वर्ग करतात़ फसवणूक झालेल्या ग्राहकांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर प्रथम ज्या बँक खात्यातून पैसे वर्ग झाले आहेत त्याचे डिटेल संबंधित वॉलेट कंपनीला पाठवून त्या पैशाचे पुढील व्यवहार बंद करण्याचे सांगितले जाते.


पैशाची आॅनलाईन फसवणूक करणारे गुन्हेगार बँक ग्राहकांना फोन करून वेगवेगळी कारणे सांगतात़ यामध्ये बँकेकडून येणारा ओटीपी व एटीएम कार्डवरील नंबर मिळवून पैशांची फसवणूक केली जाते़ ग्राहकांनी अशा कोणत्याही फोन कॉल्सला बळी पडू नये़ तसेच आॅनलाईन खरेदी करताना संबंधित कंपनीची विश्वासार्हता तपासूनच व्यवहार करावा- प्रतीक कोळी, पोलीस उपनिरीक्षक, सायबर पोलीस ठाणे

Web Title: Online fraud of 300 people in 11 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.