पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नगरचे पाणी पळविले : राधाकृष्ण विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 11:25 AM2019-04-22T11:25:10+5:302019-04-22T11:26:11+5:30

पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्रस्थापित नेतृत्व नगर जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळू द्यायला तयार नाही.

NCP leaders in Pune escape water from the ahmednagar : Radhakrishna Vikhe | पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नगरचे पाणी पळविले : राधाकृष्ण विखे

पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नगरचे पाणी पळविले : राधाकृष्ण विखे

Next

अहमदनगर : पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्रस्थापित नेतृत्व नगर जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळू द्यायला तयार नाही. आज हेच नेते कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, पारनेर तालुक्याबद्दल बेगडी प्रेम दाखवितात. कुकडीचे हक्काचे पाणी नगर जिल्ह्याला मिळावे यासाठी आपण पक्षविरहित लढा देणार असून त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्याची तयारी आहे, असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला दिला आहे.
विखे यांनी याबाबत रविवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपली भूमिका मांडली. त्यांनी म्हटले आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रस्थापित नेतृत्वानेच कुकडी प्रकल्पाखाली येणाऱ्या शेतकऱ्यांना हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवले आहे. राजकारणासाठी जिल्ह्यातील पाणी प्रश्नाचा त्यांनी सोयीने वापर केला. पाण्यावर त्यांनी अतिक्रमणच केले आहे.
कुकडी समूहातील ३० टीएमसी पाण्यापैकी कुकडी डाव्या कालव्याद्वारे नगर जिल्ह्याला १५ तर सोलापूर जिल्ह्याला पाच टीएमसी पाणी मिळणे अपेक्षित आहे. मात्र नगरच्या वाट्याचे हे पाणी मिळत नाही. पुणे जिल्ह्यातील नेते हे पाणी मिळू देत नाहीत. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील शेती उदध्वस्त होत आहे. लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करुन या भागाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
कुकडी प्रकल्पाच्या सर्व कालव्यांचे आवर्तन समान पध्दतीने होणे अपेक्षित आहे. परंतु नगर जिल्ह्याला पाणी येणाºया डाव्या कालव्यास कमी पाणी दिले जाते. इतर कालवे पुणे जिल्ह्यात असल्याने त्यांना जास्त पाणी दिले जाते. शिवाय धरणातील पाणी थेट नद्यांना सोडून कोल्हापूर पध्दतीचे बंधारे बेकायदेशीरपणे भरुन घेतले जातात. साठविलेले पाणी नदीत सोडण्याची प्रकल्प अहवालात तरतूद नसतानाही ते कसे सोडले जाते?
पुण्याच्या नेत्यांच्या दबावामुळे नगर जिल्ह्यातील कोणतेही नेते आज या हक्काच्या पाणी प्रश्नावर बोलायला तयार नाहीत. नगरला हक्काचे पाणी मिळणे, हा मुद्दा सत्तेच्या राजकारणापेक्षा व्यापक आणि नगरकरांच्या जीविताशी जोडलेला आहे. प्रत्येक हंगामानंतर डाव्या कालव्यात नगर जिल्ह्यातील शेतीसाठी पाणीही शिल्लक ठेवले जात नाही. उरलेले तुटपुंजे पाणी केवळ पिण्यासाठी दिले जात असल्याचे दाखवून बोळवण केली जात असतानाही या नेत्यांच्या ताटाखालचे मांजर होऊन बसलेले जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते याबाबत शब्दसुध्दा काढत नाहीत. नगर जिल्ह्याला पोलीस बंदोबस्तात पाणी आणावे लागते. ही परिस्थिती नेमकी कुणाच्या आदेशामुळे निर्माण होते हे आता लपून राहिलेले नाही. जिल्ह्यावर हा एकप्रकारे अन्यायच असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कुकडी डावा कालवा व घोड कालवा हे प्रश्न प्रलंबित असताना कर्जत, जामखेड,श्रीगोंदा, पारनेर भागात आम्ही खूप सेवा करत आहोत हे भासविण्याचा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा प्रयत्न आहे.
कृष्णा खो-यांतर्गत असलेल्या पाथर्डी तालुक्यालाही ही मंडळी पाणी मिळू देत नाहीत. त्यामुळेच विविध कारणाने जिल्ह्यात येऊन पाणी प्रश्नांवर भाष्य करणा-या नेत्यांची कृती हे बेगडी प्रेम दर्शवते. या प्रश्नाकडे आपण पक्षीय राजकारणापलीकडे पाहतो. ही स्वाभिमानाची लढाई आहे. पक्षभेद विसरुन या पाण्यासाठी एकत्रित येण्याची गरज आहे.
माझ्या राजकीय भवितव्याची कोणतीही तमा न बाळगता बाळासाहेब विखे यांनी सुरु केलेली ही पाण्याची लढाई मी पुढे नेणार आहे. पाण्याअभावी नगर जिल्हा उदध्वस्त करणा-यांना धडा शिकवू असा इशारा त्यांनी दिला.

Web Title: NCP leaders in Pune escape water from the ahmednagar : Radhakrishna Vikhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.