नगर मनपा निवडणूक : हमीपत्र मिळाले नाही तर व्हावे लागणार तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 10:49 AM2018-11-27T10:49:00+5:302018-11-27T10:49:24+5:30

हद्दपारीच्या प्रस्तावात अटी आणि शर्तीवर शहरात राहण्याची परवानगी मिळालेल्यांना राजपत्रित अधिकाऱ्याचे हमीपत्र पोलिसांना सादर करावे लागणार आहे.

 Municipal municipal election: if no warranty is received, then it may be necessary | नगर मनपा निवडणूक : हमीपत्र मिळाले नाही तर व्हावे लागणार तडीपार

नगर मनपा निवडणूक : हमीपत्र मिळाले नाही तर व्हावे लागणार तडीपार

googlenewsNext

अहमदनगर: हद्दपारीच्या प्रस्तावात अटी आणि शर्तीवर शहरात राहण्याची परवानगी मिळालेल्यांना राजपत्रित अधिकाऱ्याचे हमीपत्र पोलिसांना सादर करावे लागणार आहे. असे हमीपत्र सादर केले नाही तर पोलीस त्यांनाही शहरातून हद्दपार करणार आहेत. त्यामुळे उपद्रवींवर हद्दपारीची टांगती तलवार कायम आहे. 
महापालिका निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी शहरातील तोफखाना, कोतवाली, भिंगार कॅम्प व एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या ६६४ उपद्रवी लोकांचे प्रस्ताव प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडे सादर केले होते.  आतापर्यंत यातील ४११ जणांना हद्दपार करण्यात आले आहे़ तिघांची नावे वगळण्यात आली आहेत तर दोघांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत.
उर्वरित १७१ जणांना अटी व शर्तीवर महानगरपालिका निवडणूक काळात शहरात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. 
ज्यांना शहरात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे त्यांना राजपत्रित अधिका-याचे हमीपत्र पोलिसांना आदेश झाल्यापासून २४ तासाच्या आत सादर करावे लागणार आहे. एका राजपत्रित अधिका-याला एकाच व्यक्तीला हमीपत्र देता येणार आहे. त्यामुळे अटी आणि शर्तीवर शहरात राहणा-या १७१ जणांना राजपत्रित अधिका-याचे हमीपत्र मिळणे अवघड आहे. असे हमीपत्र मिळाले नाही तर पोलीस त्यांना शहरातून हद्दपार करणार आहेत.
तडीपारांवर वॉच ठेवण्यासाठी विशेष पथक
महापालिका निवडणूक काळात शहरातून तडीपार करण्यात आलेल्यांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. जे तडीपार झाले आहेत त्यांच्यावर हे पथक नजर ठेवणार आहे. दिलेल्या मुदतीत हद्दपार झालेले शहरात आढळून आले तर त्यांना तत्काळ अटक करण्यात येणार आहे. 
केडगावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
केडगाव येथे महापालिकेच्या पोटनिवडणुकीत दोघा शिवसैनिकांची हत्या झाल्याने पोलिसांनी दक्षता म्हणून यावेळी मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात केला आहे. तसेच रात्रीची गस्तही वाढविली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणणा-यांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश पोलीस कर्मचा-यांना देण्यात आले आहेत. 

Web Title:  Municipal municipal election: if no warranty is received, then it may be necessary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.