Lok Sabha Election 2019: Advertising on Social Media? Cyber cell watch | Lok Sabha Election 2019: सोशल मीडियावर जाहिरात करताय ? सायबर सेलची नजर
Lok Sabha Election 2019: सोशल मीडियावर जाहिरात करताय ? सायबर सेलची नजर

अहमदनगर : सोशल मीडियाला कोणतेही बंधन नसल्याने विविध माध्यमातून दररोज लाखो पोस्ट व्हायरल होतात. परंतु लोकसभा निवडणूक काळात यावर ब्रेक लागणार आहे. एखाद्या उमेदवाराच्या जाहिरातीची पोस्ट टाकण्याआधी त्याची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन माध्यम प्रमाणन आणि संनियंत्रणाबाबत माहिती दिली. उमेदवार अथवा त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या राजकीय पक्षांच्या जाहिरातींना प्रसारणपूर्व परवानगी आवश्यक राहणार आहे. उमेदवारांनी ते करणार असलेल्या जाहिरातीचा मजकूर आणि आॅडिओ/व्हिडीओ यांची सीडी माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीकडून प्रसारणासाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र घेऊनच प्रसारित करावी लागणार आहे. यासाठीचा खर्च संबंधित उमेदवारांच्या खात्यात नोंदविणे आवश्यक आहे. विनापरवानगी कोणताही जाहिरात मजकूर इलेक्ट्रॉनिक माध्यम, सोशल मीडियातून प्रसारित करण्यास प्रतिबंध असल्याचे त्यांनी नमूद केले. यावर्षी भारत निवडणूक आयोगाने माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीमध्ये सोशल मीडियातील मजकूरावर देखरेखीसाठी या क्षेत्रातील माहितगारास समितीत घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सायबर सेलचे पोलीस निरीक्षक निवडणूक काळात सोशल मीडियावर लक्ष ठेवून असणार आहेत. यावेळी सदस्य सचिव तथा प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांनी माध्यम प्रमाणिकरण व माध्यम सनियंत्रण समितीचे कार्य, प्रमाणन अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे आदी माहिती दिली.


Web Title: Lok Sabha Election 2019: Advertising on Social Media? Cyber cell watch
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.