वंचित बहुजन आघाडीत तृतीय पंथीयांना स्थान - दिशा शेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 11:07 AM2019-03-05T11:07:09+5:302019-03-05T11:07:24+5:30

बहुजन वंचित आघाडीच्या प्रवक्तेपदी श्रीरामपूर येथील दिशा पिंकी शेख तृतीयपंथी साहित्यिका आणि कार्यकर्तीची नियुक्ती करण्यात आली आहे.

Location of the third party in the deprived Bahujan frontier - Sheik | वंचित बहुजन आघाडीत तृतीय पंथीयांना स्थान - दिशा शेख

वंचित बहुजन आघाडीत तृतीय पंथीयांना स्थान - दिशा शेख

Next

शिवाजी पवार
बहुजन वंचित आघाडीच्या प्रवक्तेपदी श्रीरामपूर येथील दिशा पिंकी शेख तृतीयपंथी साहित्यिका आणि कार्यकर्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई, नाशिक, मालेगाव येथील त्यांच्या भाषणांना उपस्थितांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. बहुजन आणि वंचितांच्या आघाडीमध्ये आता तृतीय पंथीयांनाही स्थान मिळाल्याचे दिशा यांनी सांगितले. त्यांच्याशी ‘लोकमत’ने केलेली खास बातचीत..

प्रश्न : वंचित आघाडीच्या प्रवक्तेपदी झालेल्या नियुक्तीला काय महत्त्व आहे?
उत्तर : खरे तर मागील दोन महिन्यांपासूनच आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांच्या आपण संपर्कात होतो. मात्र, सध्याच्या राजकारणात मुक्तपणे विचार मांडण्याला आणि काम करायला कितपत वाव मिळेल, अशी मनात शंका होती. काहीशी भीती होती. त्यामुळे कुठल्या व्यासपीठावर जात नव्हते. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी मला मोठी संधी मिळवून दिली. आघाडीच्या सभांमध्ये आपल्याला कुठलेही निर्देश न देता मोकळेपणाने बोलू दिले जाते. राजकीय सत्तेचा विचार नंतर मात्र, सामाजिकीकरणाची प्रक्रिया यानिमित्ताने सुरू झाल्याचे समाधान आहे.
प्रश्न : लोकांची काय प्रतिक्रिया आहे?
उत्तर : तृतीयपंथी घटकातील व्यक्ती बलुतेदार, अलुतेदार, आदिवासींच्या प्रश्नावर पोटतिडकीने बोलते आहे हे पाहून सभा संपल्यानंतर बायका मला मिठी मारतात. तृतीयपंथीयांबद्दल समाजात असलेले पूर्वग्रह काही प्रमाणात दूर होण्यास त्यामुळे मदत होते आहे. याचा अनुभव मी स्वत: घेत आहे. अगदी एमआयएमनेही माझ्या नियुक्तीला जोरदार पाठिंबा दिला आहे.
प्रश्न : तृतीय पंथीय समाजाचे प्रश्न काय आहेत.?
उत्तर : मुळात तृतीयपंथीयांविषयी बोलायचे झाल्यास आम्हाला मागल्याचे (बाजारात पैैसे गोळा करणे) काम थांबविण्याचे सल्ले दिले जातात. उत्तर भारतात आमच्या काही रितीरिवाजांना बेगिंग अ‍ॅक्टखाली गुन्हा ठरविण्यात आला आहे. मात्र, सरकार जोपर्यंत आम्हाला जगण्याची साधने देत नाही, उपजिविकेचा प्रश्न सोडवत नाही, तोपर्यंत मूळ काम थांबवता येणार नाही.

काँग्रेस पक्षाने अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी अप्सरा रेड्डी या तृतीयपंथीयाची नुकतीच नियुक्ती केली. खासदार सुप्रिया सुळे यांनीही राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी उच्च शिक्षित असणाऱ्या चांदणी गोरे यांना राजकीय व्यासपीठ उपलब्ध करून दिले. मात्र, या प्रस्थापित राजकीय पक्षांमध्ये या नियुक्त्यांना केवळ जेवणातील सलाडपुरतेच महत्त्व आहे. बोलणाऱ्या प्रतिनिधीत्वाची आज खरी गरज आहे, असे दिशा पिंकी शेख यांनी सांगितले.


राजकीय व्यवस्था
मागील काँग्रेस आघाडीच्या सरकारने सन २०१३च्या अखेरीस तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळाची स्थापना केली होती. मात्र त्याचे पुढे काय झाले माहीत नाही. या सरकारनेही अखेरच्या काळात आता महामंडळ स्थापन केले. मात्र, निवडणुकीत ते हरवून जाईल. सरकार आमच्याकरिता एक प्रमाणपत्र लवकरच जारी करणार आहे. आमची ओळख त्याद्वारे निश्चित केली जाणार आहे. मात्र, आमच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घालण्याचा आणि आमची ओळख निश्चित करण्याचा यांना अधिकार दिलाच कोणी? आमच्यातील अनेक गुणी लोक शिक्षित आहेत. मात्र, शिष्यवृत्ती-आरक्षणाअभावी त्यांना आपला प्रवास थांबवावा लागत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

भाजपची बी टीम
वंचित आघाडी म्हणजे भाजपची बी टीम आहे का? यावर दिशा म्हणाल्या, खरं तर हा प्रश्न गुळगुळीत झाला आहे. राज्यात आम्ही २२ जागांवर वडार, होलार, कैकाडी, धनगर, माळी, मराठा समाजाला उमेदवारी दिली. प्रस्थापित पक्ष या वंचितांचा केवळ मतापुरता वापर करतो. मात्र, नेतृत्व द्यायला तयार नाही. तेव्हा डॉ.आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या राजकीय लोकशाहीच्या निर्मितीकरिता काँग्रेस आघाडीने आमच्याविरोधात उमेदवार देऊ नयेत. त्यांनीच ते भाजपची बी टीम नाही हे आता सिद्ध करावे.

Web Title: Location of the third party in the deprived Bahujan frontier - Sheik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.