मिलिंदकुमार साळवे
अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफी प्रमाणपत्र वाटपाच्या कार्यक्रमास २२ दिवस होऊन गेले आहेत. आणखी १० दिवसांनी कर्जमुक्ती सोहळ्याची महिनापूर्ती होईल. या सोहळ्यात व नंतरही पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी याद्या प्रसिद्ध होण्याबाबत वायदे केले. पण मंत्र्यांचे मोठे वायदे खोटेच ठरले आहेत. एवढेच नाही तर कर्जमुक्तीची प्रमाणपत्रे दिलेल्या २८ पैकी फक्त तीनच शेतक-यांची नावे आतापर्यंत सरकारच्या यादीत झळकली आहेत.
जिल्ह्यातील १४ तालुक्यातून प्रत्येक २ प्रमाणे एकूण २८ शेतकरी जोडप्यांना दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी पालकमंत्र्यांच्याहस्ते प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. या शेतक-यांपैकी धारेश्वर सेवा संस्थेचे थकबाकीदार जिजाबाई व त्रिंबक गोपाळ रणशूर (ता. कोपरगाव), पारगाव सुद्रिक सेवा संस्थेचे थकबाकीदार सुमन व संतोष तात्या खराडे (ता. श्रीगोंदा),कोंभळी सेवा संस्थेचे थकबाकीदार विठाबाई व संतराम गेणा मोरे (ता. कर्जत) या तीनच शेतकरी जोडप्यांची नावे योजनेच्या संकेतस्थळावरील यादीत झळकली आहेत. ३ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार परिषदेत पालकमंत्री शिंदे यांनी कर्जमाफी झालेल्या शेतक-यांची नावे सोमवार ६ नोव्हेंबरला जाहीर करू, असे सांगितले होते. त्यापूर्वी त्यांनी एक दोन दिवसात याद्या प्रसिद्ध होणार असल्याचे सांगितले होते. पण त्यांचे हे सर्व वायदे त्यांच्याच मंत्रालयातील माहिती तंत्रज्ञान (आय. टी.) विभागाने खोटे ठरविले आहेत.

नगरमधील शेतक-यांना का मिळाली नाही कर्जमाफी : वाचा सविस्तर

 

प्रमाणपत्र वाटप केलेल्या गावांपैकी पालकमंत्र्यांच्या चौंडी गावच्या यादीत ६६ जणांची नावे झळकली आहेत. पण त्यात प्रमाणपत्रधारक अलका व दत्तात्रय मुरलीधर शेळके, जवळा संस्थेचे सुवर्णा व धर्मा बाजीराव लेकूरवाळे या शिंदेंच्या जामखेड तालुक्यातील थकबाकीदारांची नावे नाहीत. नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवीचे एकही नाव यादीत दिसत नाही. अकोलेतील मन्याळे येथील ठकूबाई व विठोबा भुतांबरे, जवळा (ता.जामखेड) येथील ललिता व बाळू मते, देवराई (ता. पाथर्डी)येथील ताराबाई व सुधाकर विठोबा क्षेत्रे, सावळीविहीर बुद्रूकमध्ये मीना व सुभाष बाबूराव वाघमारे अशी एकेका जोडप्यांचीच नावे यादीत दिसत आहेत.

मातापूरचे झाले मालापूर

श्रीरामपूर तालुक्यातील मातापूर सेवा संस्थेचे सुनीता व भीमराज राधाकिसन दौंड यांना प्रमाणपत्र दिले आहे. पण यादीत मातापूरचे नामकरण ‘मालापूर’ असे झाले आहे. सहकार आयुक्तांच्या मार्गदर्शनाअभावी जिल्हा बँकेत कर्जमाफीचे १८ कोटी पडून आहेत.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.