A husband and wife were killed on the spot in the accident at Dhavalpuri | ढवळपुरी येथील अपघातात पती-पत्नी जागीच ठार

भाळवणी : पारनेर तालुक्यातील ढवळपुरी ते भाळवणी रस्त्यावरील ढवळपुरीच्या घोडके वस्तीनजिक ट्रक व मोटारसायकलची धडक होऊन मोटारसायकलवरील सावळेराम भिकाजी भनगडे व परिघा सावळेराम भनगडे हे पती-पत्नी जागीच ठार झाले. अपघातानंतर ट्रक चालक ट्रक घेऊन फरार झाला.
ढवळपुरी येथील भनगडे दाम्पत्य भाळवणीहून ढवळपुरीकडे शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकल (क्रमांक एमएच १७, सी.वाय. ९१३१) वरून जात होते. त्यांची मोटारसायकल घोडके वस्तीनजिक आली असता समोरून येणा-या ट्रकने (एमएच १२, ए.क्यू. १०८७) जोरदार धडक दिल्याने हे दोघे पती-पत्नी जागीच ठार झाले. या घटनेची माहिती ढवळपुरीचे सरपंच डॉ. राजेश भनगडे यांनी पारनेर पोलीस स्टेशनला कळविली. ही माहिती मिळताच पोलीस हेड कॉन्स्टेबल अण्णासाहेब चव्हाण व पोलीस कॉन्स्टेबल पवार हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दोन्हीही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पारनेर येथे पाठविण्यात आले. ट्रकचालक घटना घडल्यानंतर ट्रक घेऊन फरार झाला. पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल आण्णासाहेब चव्हाण व पोलीस कॉन्स्टेबल पवार हे करीत आहेत. दरम्यान या अचानक घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे ढवळपुरी येथील आठवडे बाजार दुपारी ४ वाजता बंद करून गावात बंद पाळण्यात आला.