शेततळ्यात आणखी किती बळी? : आठवडाभरात १० जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 05:33 PM2019-06-18T17:33:13+5:302019-06-18T17:33:18+5:30

पाणी साठवून शेती फुलविण्यासाठी उभारलेली शेततळी आता शेतकरी कुटुंबांसाठीच कर्दनकाळ ठरू लागली आहेत.

How many more animals? : 10 people die in the week | शेततळ्यात आणखी किती बळी? : आठवडाभरात १० जणांचा मृत्यू

शेततळ्यात आणखी किती बळी? : आठवडाभरात १० जणांचा मृत्यू

googlenewsNext

गोरख देवकर
अहमदनगर : पाणी साठवून शेती फुलविण्यासाठी उभारलेली शेततळी आता शेतकरी कुटुंबांसाठीच कर्दनकाळ ठरू लागली आहेत. गत आठवडाभरातील विविध ठिकाणच्या चार घटनांमध्ये तब्बल १० जणांना मृत्युचा सामना करावा लागला आहे. सतत घडणाऱ्या अशा घटनांमुळे शेततळ्यात बुडून आणखी किती मृत्यू होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कृषी विभागाच्या विविध योजनांमुळे जिल्हाभर मोठ्या संख्येने शेततळ्यांची निर्मिती झाली. विशेषत: अनेक शेतकऱ्यांनी पदरमोड करून मोठ-मोठी शेततळी उभारली. काहींनी या शेततळ्यांच्या सुरक्षेसाठी कुंपण उभारले. काहींनी मात्र कोणत्याही प्रकारचे कुंपण उभारले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी शेततळ्यात कुत्रे, जनावरे पडून मरण्याच्या घटना सर्रास घडतात. यामध्ये अनेकदा प्लॅस्टिकचा कागद फाटतो. मात्र तरीही काही शेतकरी कुंपण उभारण्यास टाळाटाळ करतात. आता तर शाळकरी मुले, मुली, महिला शेततळ्यात बुडून मृत्यू पावल्याचा घटना घडू लागल्या आहेत. गत आठवड्यात चार घटनांमध्ये शेततळ्यात बुडून १० जणांचा मृत्यू झाला आहे. ६ जूनला ढवळपुरी (ता. पारनेर) येथे पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा तर १५ जूनला अरणगाव (ता. नगर) येथे दोन मुलांचा शेततळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला.
१६ जूनला घुमरी (ता. कर्जत) येथे धुणे धुण्यासाठी आईसह दोन मुली शेततळ्यावर गेल्या होत्या. त्यावेळी एक मुलगी पाय घसरून शेततळ्यात पडली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसरी मुलगी व आईचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. १७ जूनला घारगाव (ता. श्रीगोंदा) येथे आईसह मुलगी जनावरांना पाणी पाजण्यासाठी शेततळ्यावर गेली होती. आई दोरीच्या सहायाने शेततळ्यातून हंड्याने पाणी काढत होती. त्यावेळी दोरी तुटून आई पाण्यात पडली. आईला वाचविण्याच्या प्रयत्नात मुलगीही पाय घसरून पाण्यात पडली. दोघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या लागोपाठच्या घडलेल्या घटनांनी शेततळ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कृषी विभागाकडून शेतकºयांमध्ये शेततळ्याच्या सुरक्षेबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे.


शेततळे पोहण्यासाठी नाहीच. त्यामुळे त्यामध्ये पोहणे टाळायला हवे.
शेततळ्यावरून जपून चाला. प्लॅस्टिकच्या कागदावरून पाय घसरण्याची शक्यता असते.
प्लॅस्टिकमुळे पाण्यात पडल्यानंतरही बाहेर येणे अवघड होते. बाहेर निघण्याचा प्रयत्न केला तरी प्लॅस्टिकवरून हात, पाय घसरतो.
शेततळ्याच्या बाजूला खुंट्या ठोकून अथवा खांब रोवून पाण्यात दोरी टाकून ठेवावी. शेततळ्याच्या दोन बाजूला दोन मोठी लाकडे ठेवा.
एकट्याने शेततळ्यातून बादलीच्या सहायाने पाणी काढू नये, तसेच शेततळ्याच्या भिंतीवर धुणे धुऊ नये़
शेततळ्यावर लहान मुलांना सोबत घेऊन जाऊ नये़
शेततळ्यात तरंगते ड्रम, भोपळे, ट्यूब सोडून ठेवाव्यात़

शेततळ्याला कुंपण आवश्यक आहे. शेतकºयांना कुंपणाचा खर्च परवडत नसेल तर ते शेततळ्याच्या बाजूने बोराटीच्या काट्याही ठेऊ शकतात. त्यामुळे शेततळ्यावर कोणी जाऊ शकत नाही. सुरुवातीला कृषी विभागाकडून संपूर्ण शेततळ्यासाठी निधी दिला जात असे. त्यावेळी कुंपण केले जायचे. त्यानंतर आता निधीमध्ये कपात झाली. त्यामुळे काही शेतकरी कुंपण उभारत नसल्याचे दिसते. -अशोक आढाव, तालुका कृषी अधिकारी, कोपरगाव

Web Title: How many more animals? : 10 people die in the week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.