मुख्याध्यापकाने सूक्ष्म नियोजन करून डोंगरी शेतीत फुलविल्या फळबागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:21 PM2018-12-12T12:21:21+5:302018-12-12T12:21:49+5:30

यशकथा : डोंगरी शेतीत सुमारे बारा एकरांत त्यांनी विविध फळबागा फुलविल्या असून याद्वारे लाखो रुपये उत्पन्न ते मिळवित आहेत.

The headmaster develops fruit farming on hill by micro-planning | मुख्याध्यापकाने सूक्ष्म नियोजन करून डोंगरी शेतीत फुलविल्या फळबागा

मुख्याध्यापकाने सूक्ष्म नियोजन करून डोंगरी शेतीत फुलविल्या फळबागा

Next

- चंद्रकांत गायकवाड (अहमदनगर) 

फळबागांचा स्मार्ट शेतीचा उपक्रम निवडुंगे (ता. पाथर्डी) येथील कानिफनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक भास्कर मरकड यांनी राबविला आहे. डोंगरी शेतीत सुमारे बारा एकरांत त्यांनी विविध फळबागा फुलविल्या असून याद्वारे लाखो रुपये उत्पन्न ते मिळवित आहेत.

भास्कर मरकड यांची निवडुंगे गावात सतरा एकर शेती आहे. मात्र, ही शेती डोंगरी असल्याने त्यांना पारंपरिक पद्धतीने त्यातून नाममात्र उत्पन्न मिळत होते. पारंपरिक शेती करून उन्नती शक्य नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे ठरविले. या शेतीत जर व्यवस्थित नियोजन केले, तर फळबागा चांगल्याच यशस्वी होऊ शकतात. असा आत्मविश्वास वाटल्याने त्यांनी डोंगरशेत असलेल्या या सतरा एकर कोरडवाहू हलक्या बरड जमीन क्षेत्राचे नैसर्गिक उतारानुसार दक्षिणोत्तर समान दहा भाग करीत प्रथम सपाटीकरण केले. मध्यभागी साठ गुंठे क्षेत्रावर चार कोटी लिटर क्षमतेचा शेततलाव केला. एक विहीर व बोअरवेलच्या माध्यमातून पावसाळी ऋतूत तो भरून संचित जलसाठा ठिबकच्या तंत्राने आगामी काळात काटकसरीने वापरायचा. असा क्रम ते पाच वर्षांपासून करीत आहेत. मरकड यांनी अडीच एकरामध्ये ७५० डाळिंबाची झाडे लावली. 

दुसऱ्या वर्षी त्यातून सहा लाखांची अर्थप्राप्ती झाली. अडीच एकरांमधील चारशे सीताफळांच्या झाडांपासूनही अत्यंत कमी पाण्याच्या वापरातून दीड लाख रुपये मिळाले, तर प्रत्येकी दोन एकरांतील २०० आंबा ४५० मोसंबी व ४०० संत्रीचे झाडे यावर्षी फळधारणेच्या योग्य होत आहेत. चिंच, साग, शिवणी, नारळ, सुपारी, अशी नित्य गरजेच्या झाडांची बांधावर लागवड केल्याने या शेतमळ्याची शोभा वाढली आहे. शिवाय पूरक उत्पादनांचे स्रोतही वाढले आहेत. कपिला आणि बकुळा या दोन गावरान गायी दावणीला असल्याने घरच्या दुधाचे गरजेसह डाळिंबाचे स्लरीसाठी दही, ताक, शेण व गोमूत्राची उपलब्धता घरच्या घरीच होत आहे, असे भास्कर मरकड यांच्या पत्नी भामाबाई मरकड यांनी सांगितले. विविध झाडांच्या लागवडीचे हे तिसरे वर्ष आहे. प्रति झाड कमीत कमी फळे धरण्याचे तंत्र ठेवल्याने चांगले वजन व प्रतवारी मिळत आहे. पुढे हेच उत्पन्न किमान वीस लाखांपर्यंत जाईल, असा विश्वास मरकड दाम्पत्याने बोलून दाखविला. 

त्यांनी शेतात तयार केलेले शेततळे त्यांच्यासाठी वरदान ठरले आहे. यंदा पाणीटंचाईने ग्रासले असताना शेततळ्यातील संचित जलसाठा या विविध झाडांच्या वनराईला तारणहार ठरले आहे, तर घरच्या जनावरांचे शेणखत व रासायनिक एनपीके खतांची संतुलित मात्रा झाडांच्या सावलीच्या घेरात दोन्ही बाजूला छाटणीनंतर खड्डे घेऊन बुजविले की, वार्षिक खत नियोजन पूर्ण होते. बाकी फवारणीसाठी सप्ताह पंधरवडा अंतराने सुटीच्या दिवशी एका मजुराचे मदतीने या दाम्पत्याने कामाचे वेळापत्रक ठरलेले आहे. तीसगाववरून पाथर्डीला जाताना निवडुंगे गावच्या पुढे पूर्वेला महामार्ग सोडून एक कि.मी. आत गेले की, मरकड यांचा वनराईने नटलेली विविध फळबागांचा मळा दृष्टिक्षेपात येतो.

Web Title: The headmaster develops fruit farming on hill by micro-planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.