‘लोकमत’चा ग्राऊंड रिपोर्ट : विमान उडाले, पण निळवंड्याचे पाणी पोहोचेना

By सुधीर लंके | Published: April 9, 2019 11:59 AM2019-04-09T11:59:38+5:302019-04-09T12:00:12+5:30

संगमनेर, राहाता,श्रीरामपूर या तालुक्यातील १८२ गावे गत ४६ वर्षांपासून निळवंडे धरणाच्या पाण्याकडे डोळे लावून बसले आहे.

Ground Report of 'Lokmat': Airplane flies, but to reach the water of the Nilvand | ‘लोकमत’चा ग्राऊंड रिपोर्ट : विमान उडाले, पण निळवंड्याचे पाणी पोहोचेना

‘लोकमत’चा ग्राऊंड रिपोर्ट : विमान उडाले, पण निळवंड्याचे पाणी पोहोचेना

Next

सुधीर लंके
अहमदनगर : संगमनेर, राहाता,श्रीरामपूर या तालुक्यातील १८२ गावे गत ४६ वर्षांपासून निळवंडे धरणाच्या पाण्याकडे डोळे लावून बसले आहे. आता उमेदवार या गावांकडे प्रचाराला निघाले आहेत. मात्र, आमच्या पाण्याचे बोला? असा या गावांचा सवाल आहे. काही गावांनी उमेदवार व नेत्यांना गावबंदीच केली आहे.
अकोले तालुका सोडून संगमनेर तालुक्यात प्रवेश केला की मंगळापूर फाट्यावर काही म्हातारी मंडळी बसलेली होती. हा काहीसा सधन पट्टा आहे. प्रवरा नदीमुळे हा परिसर बागायती झाला. मात्र, या गावाच्या उत्तरेकडील बाजूचा वडगाव लांडगा, जवळेकडलग, निमगाव भोजापूर हा परिसर पाण्याच्या समस्येचा सामना करत आहे. अकोले तालुक्यात निळवंडे धरणाचे कालवे या भागातून जातात. मंगळापूरची मंडळी त्यांच्यासह या भागाबाबतही चिंता करत होती. खाली पाणी पळविले जाते. नदीला पाणी सुटले की सात-आठ तास वीज घालविली जाते. आम्ही शेती कशी करायची? हा या शेतकऱ्यांचा प्रश्न होता.
संगमनेर शहर ओलांडले की निळवंडे, कोठे कमळेश्वर मार्गे शिर्डीकडे जाता येते. निळवंड्याच्या शिवारात बाबासाहेब पवार हे एक टँकरचालक टँकरचे पाणी डाळिंबाच्या बागेत सोडत होते. त्यांनी टँकरचे गणितच मांडले. एका टँकरचा एक हजार रुपये खर्च आहे. या बागेत ते दररोज दहा टँकर सोडतात. म्हणजे दहा हजार हा दररोजचा बाग जगविण्याचा खर्च आहे.
अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाचा कालवा या भागातूनच पुढे राहाता, श्रीरामपूरकडे जातो. १९७२ पासून या धरणाची चर्चा सुरु आहे. प्रत्यक्षात धरणाचे काम १९९३ साली सुरु झाले. धरणावर दोन कालवे आहेत. त्यातील एक कालवा थेट श्रीरामपूर तालुक्यातील दिघीपर्यंत येतो. धरण पूर्ण झाले. मात्र, कालव्यांची कामे अद्याप पूर्ण नाहीत. त्यामुळे कौठे कमळेश्वर व धरणावर अवलंबून असलेल्या १८२ गावांचा पट्टा तहानलेला आहे.
कौठे कमळेश्वरच्याच शिवारात सारंगधर हे मेंढपाळ भर उन्हात मेंढ्या चारत होते. ओसाड माळरानावर मध्येमध्ये खडकाचे टपरे व उरलेल्या मातीवर सुकून गेलेले खुरटे गवत. हे गवत मेंढ्यांच्या तोंडात देखील येत नव्हते. ‘अशाच गवतावर अजून दोन महिने ही जित्राब जगवायची आहेत. कधीकधी दोन-दोन दिवस त्यांना पाणीसुद्धा मिळत नाही’, असे तो मेंढपाळ सांगत होता. निवडणुकीचे उमेदवार कोण हेही त्याला ठाऊक नव्हते. त्यांना मेंढ्या जगविण्याची चिंता दिसत होती.
कौठे कमळेश्वरच्या मंदिरात भर दुपारी काही ग्रामस्थांसोबत गप्पा मारल्या. त्यात महिलाही होत्या. या सर्वांचे एक प्रमुख गाºहाणे होते की नेते फक्त निवडणुकीपुरते येतात. गावात निवडणुकीचा काहीच माहोल दिसत नव्हता. सकाळीच खासदार प्रचारासाठी येऊन गेले होते. येथेही पिण्याचे पाणी नाही. गावाजवळ विमानतळ आले (शिर्डी विमानतळ). पण पाणी नाही. विद्यमान खासदारांनी निळवंडेच्या पाण्यासाठी प्रयत्न केले, असे हे लोक सांगतात. पण, खासदार फारसे गावात येत नाही, अशी तक्रारही लगेच करतात. येथे विड्या बनविण्याचा कारखाना आहे. त्यात महिलांना रोजगार मिळतो. त्यातील लिपिक आरती दुस्सम सांगत होत्या की गावातील काही महिलांकडे आधारकार्ड नाही. आजकाल आधार लिंक केल्याशिवाय कामगारांना वेतन, भविष्य निर्वाह निधी हे काहीच देता येत नाही. त्यामुळे आधारकार्ड नसलेल्या महिलांना कामावर ठेवता येत नाही. डिजिटल इंडियाची अशी दुसरीही एक बाजू आहे. शिर्डी हा राखीव मतदारसंघ आहे. निवडणुकीत देशपातळीवर पुलवामा हल्ला, डिजिटल इंडिया, चौकीदार हे सगळे मुद्दे गाजताहेत. स्थानिक पातळीवर मात्र लोकांना वेगळी चिंता आहे.
पुढाऱ्यांना का केली गावबंदी?
शिर्डीच्या काकडी विमानतळाकडे जाताना कासारे गाव लागते. या गावात रस्त्यावरच फलक दिसला. ‘पुढाऱ्यांना गावबंदी’. दर निवडणुकीत निळवंडे धरणाचे पाणी आणण्याची घोषणा होते. पण, प्रत्यक्षात काही मिळत नाही म्हणून आम्हाला आता भाषणेच ऐकायची नाहीत, असे येथील गावकºयांचे म्हणणे होते. या फलकाजवळ उभे असताना पाच-सहा गावकरी काही क्षणात जमा झाले. प्रत्येकजण पाण्याबाबत संतापून बोलत होता. शिर्डीला विमानतळ व्हावे ही अलीकडची मागणी. विमानतळ झाले व विमानेही झेपावली. पण, विमानळाच्या परिसराला पाणी मात्र मिळू शकलेले नाही.
कासारे सोडले की राहाता तालुक्यातील गोगलगाव लागले. तेच चित्र. रस्त्यावर माणसे टँकरचे पाणी भरत होते. कित्त्येक निवडणुका आल्या नी गेल्या, पण आम्हाला पाणी मिळेना, असे या लोकांचेही म्हणणे होते.

Web Title: Ground Report of 'Lokmat': Airplane flies, but to reach the water of the Nilvand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.