वाळकी येथील पियुश शुगर कारखान्यासमोर नेवासा तालुक्यातील ऊस उत्पादकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 05:35 PM2017-12-18T17:35:51+5:302017-12-18T17:37:37+5:30

नगर तालुक्यातील वाळकी येथील पियुश शुगर या साखर कारखान्याने फसवणूक केल्याचा आरोप करीत नेवासा तालुक्यातील ऊस उत्पादक, शेतकरी संघटना व मराठा महासंघाच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. १८) सकाळपासून कारखान्यासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.

In front of the Puyush Sugar Factory in Valki, movement of sugarcane growers in Nevasa taluka | वाळकी येथील पियुश शुगर कारखान्यासमोर नेवासा तालुक्यातील ऊस उत्पादकांचे आंदोलन

वाळकी येथील पियुश शुगर कारखान्यासमोर नेवासा तालुक्यातील ऊस उत्पादकांचे आंदोलन

Next

केडगाव : नगर तालुक्यातील वाळकी येथील पियुश शुगर या साखर कारखान्याने फसवणूक केल्याचा आरोप करीत नेवासा तालुक्यातील ऊस उत्पादक, शेतकरी संघटना व मराठा महासंघाच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. १८) सकाळपासून कारखान्यासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.
शेतकरी संघटनेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष सचिन चोभे यांनी आंदोलनाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, पाण्याअभावी नगर तालुक्यात उसाचे क्षेत्र कमी आहे. त्यामुळेच येथील पियुश शुगर हा खासगी साखर कारखाना नेवासा, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, राहुरी व पाथर्डी आदी तालुक्यातील उसावर चालविला जातो. मात्र, यंदा या कारखान्याने मागील वर्षी २५०० रुपयांचा भाव दिला होता. यंदाही मागील वर्षीपेक्षा किमान ५० रुपये जादा भाव देण्याचे आश्वासन देऊन ऊस आणला होता. मात्र, आता फक्त २२०० रुपये प्रतिटन भाव देण्याचे कारखाना प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तसेच ४८ दिवसांपासूनचे पेमेंटही कारखान्याने जमा केलेले नाही. त्यामुळेच १५ दिवसांत पैसे जमा न करून या कारखान्याने शेतकरी बांधवांची फसवणूक केली आहे. याच फसवणुकीमुळे साखर संचालनालयाने या कारखान्यावर नियमानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करणे अपेक्षित आहे. मात्र, सत्ताधारी भाजपा नेत्यांच्या वरदहस्ताने चालणा-या या कारखान्यालाच साखर आयुक्तालयाने अभय दिले आहे. सरकारी कृपेने मोकळे रान मिळाल्यानेच हा कारखाना शेतक-यांची पिळवणूक करीत आहे. याविरोधात उग्र आंदोलन पुकारतानाच प्रसंगी गव्हाणीत आत्मदहन करण्याचीही शेतकरी बांधवांची भावना आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून त्यांच्या पक्षाच्या छत्रछायेखाली सुरू असलेल्या कारखान्याच्या फसवणुकीबद्दल कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी रविंद्र आगळे यांनी केली आहे. यावेळी शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे, विजय निकम, संदीप लंघे, अनिल पोटे, सतिश पोटे, महेश कदम, दत्तात्रय लांडे, विनोद पोटे, अरुण देशमुख, बाबासाहेब निकम, बाबासाहेब वाकळे, आंबादास घुले यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.


...तर आंदोलन पेटेल : दहातोंडे

संभाजी दहातोंडे म्हणाले, शेतक-यांवर अन्याय होत असतानाही सरकार व प्रशासन ढिम्म आहे. परिणामी पियुश शुगर कारखान्याकडून शेतक-यांची लूट केली जात आहे. त्यामुळे शेतकरी संतापले आहेत. यावर तातडीने न्याय न दिल्यास हेच आंदोलन हिंसक होईल. याची जबाबदारी कारखाना प्रशासनाची राहील.

कारखान्यावर गुन्हा दाखल करा : चोभे

सचिन चोभे म्हणाले की, कारखाना प्रशासन उतारा कमी येत असल्याचे कारण देऊन लूट करीत आहे. या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. तसेच १५ दिवसांत पेमेंटही जमा केलेले नाही. त्यामुळेच याप्रकरणी साखर आयुक्तांनी कमी उतारा येण्याच्या प्रकरणाची चौकशी करावी व शेतक-यांची फसवणूक केल्याप्रकरणी कारखान्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा.

Web Title: In front of the Puyush Sugar Factory in Valki, movement of sugarcane growers in Nevasa taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.