farmers in self-determination tomorrow in Loni Opposition leader's vikhe village; Administration denied the permission | विरोधी पक्षनेते विखे यांच्या लोणीत शेतक-यांचा उद्यापासून आत्मक्लेश; प्रशासनाने परवानगी नाकारली

अहमदनगर : जिल्ह्यातील साखर कारखानदारांचा २३०० रुपये दराचा प्रस्ताव धुडकावून लावत आत्मक्लेष करणारच आणि तोही पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या लोणी येथील पुतळ्यासमोरच, असा इशारा देत ऊस उत्पादक शेतकरी संषर्घ समितीने सरकारसह कारखानदारांना आव्हान दिले आहे. त्यामुळे ऐन हिवाळी अधिवेशन काळातच ऊसदराचा पुन्हा भडका उडण्याची शक्यता आहे.
प्रभारी जिल्हाधिकारी विश्वजित माने यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जिल्हा नियोजन भवनात साखर कारखानदारांचे प्रतिनिधी आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिका-यांची संयुक्त बैठक पार पडली. प्रादेशिक साखर सहसंचालक संगीता डोंगरे, निवासी जिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, शिर्डीचे प्रांतअधिकारी रवींद्र ठाकरे आदी बैठकीला उपस्थित होते. ऊसाला ३५०० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी उपोषण करण्याबाबत ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने यापूर्वीच निवेदन दिलेले आहे. यापार्श्वभूमीवर जिल्हाधिका-यांनी ही संयुक्त बैठक बोलविली होती. मात्र बैठकीत ऊसदराबाबत तोडगा न निघाल्याने संघर्ष समिती आंदोलनावर ठाम आहे. संघटनांनी आत्मक्लेष करण्यासाठी सहकाराची मुहूर्तमेढ रोवणारे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोरील जागा निवडली आहे. या जागेत कुणीही आंदोलन करू नये, असा ठराव ३१ मार्च २०१४ मध्ये लोणी ग्रामपंचायतीने केलेला आहे. याची कल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी बैठकीच्या शेवटी समितीच्या पदाधिका-यांना दिली. मात्र जागेच्या मुद्यावर कोणतीही चर्चा होणार नाही, असे डॉ. अजित नवले यांनी शेतक-यांच्या वतीने प्रशासनाला ठणकावून सांगितले. सभागृहातून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना नवले म्हणाले, आत्मक्लेष करण्याबाबत प्रशासनाला रितसर निवेदन दिलेले आहे. उपोषणाला परवानगी नाकारली असली तरी आम्ही सर्वचजण गुरुवारी सकाळी तिथे जाणार आहोत. तिथे गेल्यानंतर पोलिसांनी अटक केल्यास जेलमध्येही आत्मक्लेष केले जाईल. उपोषणाला राज्यातील ११ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर इतर जिल्ह्यातील दररोज किमान ४०० ते ५०० शेतकरी उपोषणाला हजेरी लावतील, असे नवले यांनी यावेळी सांगितले. ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे बाळासाहेब पटारे, कॉ़ बन्सी सातपुते, अजय महाराज बारस्कर, संतोष वाडेकर, अनिल देठे, हरिभाऊ तुवर, रवींद्र मोरे, अनिल इंगळे, विलास कदम, रुपेंद्र काले, चांगदेव विखे, अशोक पठारे, शिवाजी जवरे, युवराज जगताप, अनिल औताडे, रावसाहेब लवांडे, बच्चू मोढवे, ताराभाऊ लोंढे, खंडू वाकचौरे, अशोक सब्बन आदी बैठकीला उपस्थित होते.


Web Title: farmers in self-determination tomorrow in Loni Opposition leader's vikhe village; Administration denied the permission
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.