महाराष्ट्र बलात्काराच्या घटनेत तिस-या स्थानी - खुशालचंद बाहेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 07:19 PM2018-03-03T19:19:25+5:302018-03-03T19:19:25+5:30

महिला विषयींच्या कायद्याचे सक्षमीकरण व प्रभाविपणे अंमलबजावणी करण्यासाठी राज्य महिला आयोग व स्त्री आधार केंद्राच्या संयुक्त विद्यमाने कोपरगावच्या सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या पुढाकारातून महिला कायदेविषयक कार्यशाळेचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते.

In the event of Maharashtra rape, the third place - Khushalchand Baheti | महाराष्ट्र बलात्काराच्या घटनेत तिस-या स्थानी - खुशालचंद बाहेती

महाराष्ट्र बलात्काराच्या घटनेत तिस-या स्थानी - खुशालचंद बाहेती

Next

शिर्डी : गेल्या दहा वर्षांत बलात्काराचे प्रमाण दुप्पट झाले असून, बलात्काराच्या घटनेत महाराष्ट्र देशात तिस-या स्थानावर असल्याचे सांगत महिला विषयक कायदे कडक करूनही गुन्हे घडण्याच्या प्रमाणात घट होत नसल्याबद्दल व गुन्हे सिध्द होण्याचे प्रमाण कमी असल्याबद्दल औरंगाबादचे निवृत्त पोलीस उपायुक्त खुशालचंद बाहेती यांनी चिंता व्यक्त केली.
महिला विषयींच्या कायद्याचे सक्षमीकरण व प्रभाविपणे अंमलबजावणी करण्यासाठी राज्य महिला आयोग व स्त्री आधार केंद्राच्या संयुक्त विद्यमाने कोपरगावच्या सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या पुढाकारातून महिला कायदेविषयक कार्यशाळेचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. आमदार डॉ. नीलम गो-हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्घाटन सत्रासाठी राज्य महिला आयोगाच्या सदस्य विंदा किर्तीकर, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. सतिष पाटील, उद्योजिका सुप्रिया बडवे, संगमनेरच्या दुर्गाताई तांबे, सावित्रीबाई प्रतिष्ठानच्या संगीता मालकर, शिर्डीच्या माजी नगराध्यक्षा अनिता जगताप, स्वाती किशोर बोरावके, शितल दीपक वारूळे आदींसह मोठ्या प्रमाणावर महिलांची उपस्थिती होती.
महिलांसाठीच्या स्वंयसेवी संस्थांना कायदेशीर करावे, गुन्ह्यांच्या तपासाची पद्धत निश्चित करावी, असेही बाहेती यांनी सांगितले. अध्यक्षस्थानावरून आमदार गो-हे यांनी कार्यशाळेच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट करीत महिला विषयींच्या कायद्याच्या कठोर व निर्दोष अंमलबजावणीसाठी सुरू असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. या घटनातील गुन्हेगारांना नक्की शिक्षा होतील, असा फॉर्म्युला तयार करण्याची आवश्यकताही गो-हे यांनी व्यक्त केली.
यावेळी महिला विषयक कायद्यांची अंमलबजावणीची कार्यपद्धती यावर सरकारी वकील अ‍ॅड. सतिष पाटील, कायद्याची अंमलबजावणी व महिला आयोगाची भूमिका यावर विंदा किर्तीकर, महिला उद्योग धोरणावर सुप्रिया बडवे यांनी आपली मते मांडली.
दुपारच्या सत्रात भारतीय दंड संहिता, सायबर क्राईम, कौटुबिंक हिंसाचार, प्रसूतिपूर्व लिंग निदान, कौटुंबिक न्यायालयातील कार्यपद्धती, तिहेरी तलाक, हिंदू वारसा, बालक लैंगिक कृत्ये सरंक्षण, कामाच्या ठिकाणी महिलांचा छळ, बलात्कार पीडित महिलांसाठी मेडिकल प्रोटोकॉलची आवश्यकता आदी बाबींवर गट चर्चा करण्यात आली. यासाठी अ‍ॅड. संभाजी बोरुडे, अ‍ॅड. निशा शिऊरकर, अ‍ॅड. पूनम गुजराती, अ‍ॅड. जयंत जोशी, जेहलम जोशी, डॉ. दर्शना धोंडे आदी वक्त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. संगीता मालकर यांनी सूत्रसंचालन केले. अनिता शिंदे, ज्योती कोटकर, रमेश शेलार, अश्विनी शिंदे, विभावरी कांबळे, भाऊसाहेब मंडलिक, भाऊसाहेब वाकचौरे आदींनी या कार्यक्रमासाठी योगदान दिले.

Web Title: In the event of Maharashtra rape, the third place - Khushalchand Baheti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.