भूकंपाचे पूर्वानुमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 10:37 AM2019-02-16T10:37:47+5:302019-02-16T10:38:01+5:30

पृथ्वीवर घडणाऱ्या अनेक नैसर्गिक बदलांचे सर्वांना नेहमीच कुतूहल वाटत असते. यामध्ये नैसर्गिक आपत्ती हा महत्वाचा भाग असतो.

Earthquake Forecast | भूकंपाचे पूर्वानुमान

भूकंपाचे पूर्वानुमान

googlenewsNext

अनिल लगड
अहमदनगर : पृथ्वीवर घडणाऱ्या अनेक नैसर्गिक बदलांचे सर्वांना नेहमीच कुतूहल वाटत असते. यामध्ये नैसर्गिक आपत्ती हा महत्वाचा भाग असतो. ही आपत्ती मानव आपल्या चुकांमुळेच ओढून घेत आहे. या चुकांमुळे निसर्गचक्र बदलून गेले आहे. त्यामुळे भूकंप, पूर, वादळ, सुनामीसारखी नैसर्गिक आपत्ती कधी, केव्हा, कशी येईल याचा अंदाज बांधणे कठीण आहे. यातून आजकाल जीवित हानीही मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. भूकंपाच्या बाबतीत अचूक अंदाज बांधणे आजही कठीण आहे. परंतु संशोधनातून किंवा प्राणी, पक्षी, वातावरणीय बदलातून भूगर्भातील हालचालींचे अंदाज बांधले जातात. वातावरणीय बदलावर अनेक शास्त्रज्ञ जगात अभ्यास करीत आहेत. भूकंपाचे पूर्वानुमान प्राणी, पक्षी, मासे, कीटक, मानवाच्या हालचालीवरुन कसे करता येईल याच्या संवेदना नगर शहरातील सुधाकर विठ्ठल केदारी जाणतात. त्यांना पशू-पक्ष्यांप्रमाणे भूकंपाच्या संवेदना जाणवतात.
केदारी यांनी आता वयाची ७८ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांचा जन्म १६ जून १९४० मध्ये झाला. त्यांनी प्रारंभी दूरसंचार खात्यात नोकरी केली. लाईन इन्स्पेक्टर पदावरुन ते सेवानिवृत्त झाले. त्यांचे शिक्षण केवळ सातवीपर्यंतच झाले आहे. दूरसंचारमध्ये असताना त्यांनी भूगर्भातील हालचालींविषयी अभ्यासासाठी सुरूवात केली. त्यांनी राज्यातील विविध ठिकाणी जाऊन माहिती घेतली. शेतकºयांना भूजल स्त्रोताची माहिती दिली. जमिनीतील खडकांच्या प्रकाराचा अभ्यास करुन जमिनीतील खडकांच्या थरांचा अभ्यास केला. पाऊस, हवामान याविषयीही ते माहिती सहज देतात. त्यांनी सेवानिवृत्त कृषी अधिकारी सुधीर दत्तात्रय फडके यांना या अभ्यासाविषयी माहिती दिली. फडके यांनी नांदेडचे डॉ. रवींद्र रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली केदारी यांच्या अनुभवाचे बोल ‘शोध भूकंपाचा’ या पुस्तकात शब्दबध्द केले. यातून केदारी यांना उभारी मिळाली. त्यातून त्यांनी आपल्या भूगर्भाच्या हालचालींचा अभ्यास सुरूच ठेवला. केदारी यांनी राजकीय, प्रशासकीय, शास्त्रज्ञांना देखील याची माहिती दिलीच, परंतु लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जनजागृती करण्याचे काम देखील केले. अजूनही हे कार्य सुरूच आहे. नगरमधील माध्यमांनी देखील त्यांना अनेकदा व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. आजही जगात कोठेही विनाशकारी भूकंप आला किंवा नगर जिल्ह्यातील बोटा, संगमनेरमध्ये भूकंपाचे धक्के जरी बसले तरी केदारी हे माध्यमांना ते का झाले? याची माहिती स्वत: फोनवरुन देत असतात.
मानवाने निसर्गाशी फारकत घेतल्यामुळे फार मोठ्या नुकसानीस आपण जबाबदार आहोत. निसर्गाचा अभ्यास, निसर्ग सानिध्य व निसर्गातील बदलांची, हालचालींची सतत निरीक्षणे व भूगर्भातील सूक्ष्म हालचालींची नोंद या निकषांव्दारे भूकंपाच्या संवेदना केदारी यांना आजही जाणवतात. त्यांनी याबाबत अनेक शास्त्रज्ञ, राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी यांना भेटून प्रत्यक्ष चर्चा करून याबाबत जागरुक करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याची अद्याप कोणीही गंभीरपणे दखल घेतली नाही, याची खंत केदारी हे नेहमी व्यक्त करतात. भूकंप, त्सुनामी, ग्लोबल वार्मिंग, वादळे अशा विनाशी आपत्तीच्या संदर्भातील उपाययोजनांसाठी आणि त्यातील लोकसहभागासाठी केदारी यांचे प्रयत्न मार्गी लागावेत, हीच अपेक्षा.

Web Title: Earthquake Forecast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.