आठवणीतील दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 04:05 PM2018-11-11T16:05:04+5:302018-11-11T16:05:07+5:30

धावत्या जगाशी स्पर्धा करताना आपल्याला आज प्रत्येक ठिकाणी तडजोड करावी लागते.

Diwali in the memories | आठवणीतील दिवाळी

आठवणीतील दिवाळी

Next

धावत्या जगाशी स्पर्धा करताना आपल्याला आज प्रत्येक ठिकाणी तडजोड करावी लागते. बदलत्या काळानुसार आजच्या दिवाळी सणाचे स्वरूपही बदलले आहे. पण ‘त्या बालपणीच्या दिवाळी’सारखा आजच्या दिवाळीत गोडवा नाही़ तो सुगंध नाही.
पहिली सत्र परीक्षा संपल्यावर दिवाळीची सुटी लागली की, कधी एकदाचे मामाच्या गावाला जातोय, असे वाटायचे. दिवाळीच्या सणाला घरोघर सगळे अंगण भरून शेणाचा सडा टाकला जायचा. आकाशकंदिल लागत. आई व आजी रांगोळी काढत. मी सुद्धा हौसेपोटी संपूर्ण अंगणभर रांगोळी व चित्रे काढीत असे. ‘शुभ- दीपावली’ व ‘सुस्वागतम’ हे शब्द आमच्या दारा-अंगणात माझ्याच हस्ताक्षरात रांगोळीबद्ध होत असत. ‘याचे हस्ताक्षर चांगले आहे’, असे कुणी म्हटले की, मला एखादे मोठे बक्षीस मिळाल्यासारखे वाटे. या कौतुकामुळे पुढच्या दिवाळीलाही ही शब्दांची रांगोळी काढण्याची जबाबदारी मी स्वत:हून स्वीकारत असे. तशी माझी मानसिक तयार होई. खरे तर स्वत:हून अशी मदत करण्यातला निर्भेळ आनंद मी घेत असे.
दिवाळीची मिठाई - लाडू, करंज्या, चकल्या, शंकरपाळे हे सर्व आई व आजीला करू लागायचो. त्याचवेळी हे सर्व कसे झाले? याची तपासणी करण्यासाठी चव घेऊन पहाण्याची जबाबदारीही माझ्यावर यायची. मग मी एक - एक पदार्थ खाऊन पहायचो. सभोवतालचा गोड वास व चव घेतलेले पदार्थ यांमुळे माझे पोट भरून जायचे. नीटपणे येत काहीच नव्हते. पण मध्ये-मध्ये लुडबूड करून जमेल तेवढी मदत करायचो. नवे कपडे आणण्याची लगबग असायची. टिकल्या, पिस्तुल, नागाच्या गोळ्या, लवंगी फटाके, भुईचक्र, भुईनळ व काही थोडेसे मोठे फटाके अशी आमची दिवाळीची शस्त्र सामुग्री असायची. गल्लीमध्ये एकजण फटाका वाजवायचा आणि बाकी सर्वजण त्याचा आनंद घ्यायचे़ नंतर दुसऱ्याचा नंबर यायचा़ असे आळीपाळीने फटाके वाजविण्याची मज्जा काही औरच!
पूर्वीची दिवाळी साधी होती़ पण शांतता व समाधान देणारी होती. माणसं साधी होती. साध्या साध्या गोष्टींतून आनंद मिळवणारी होती. आजोबांबरोबर मळ्यात गेल्यावर आनंदाने हंबरणारी गाय मला दिसायची. वर्षभर गोठ्यातील पाळीव प्राण्यांची मनापासून काळजी घेणारे आजोबा दिवाळ सणाला त्यांना गोडधोड खाऊ घालत. त्यांची पूजा करत. आजीच्या हातचे फराळाचे पदार्थ येता-जाता खात़ मी पुन्हा मित्रांबरोबर खेळायला जायचो. दिवसभर हुंदाडायचो. नंतर घरात थोडीशी मदत करायची, असा दिनक्रम असे.
सुटीला येणारे पाहुणे, त्यांचे आदरातिथ्य यात वेळ जायचा. आमच्या घरातले वातावरण सुशिक्षित, सुसंस्कारित असल्यामुळे घरात नेहमी वृत्तपत्रे, मासिके व पुस्तके असत. दिवाळीच्या गोड फराळाबरोबर मला नेहमीच विविध मासिकांची व विविध दिवाळी अंकांची संगत लाभली. त्यातील कविता वाचून आपणही अशी एखादी बालकविता लिहावी, असे वाटत रहायचे. योगायोगाने नंतरच्या काळात माझ्या काही कविता महाराष्ट्रातील विविध दिवाळी अंकातून प्रकाशित झाल्या.
आज आजी -आजोबा हयात नाहीत. गावाकडचं घर - अंगण ओस पडलंय. कधी काळी हिरवंगार असणारं शेत साद घालतंय़ प्रत्येक दिवाळी सणाला गावाकडची ती ‘दिवाळी’ माझ्या मनात डोकावते़ आजची दिवाळी अधिक चमचमीत, अधिक चकचकीत आहे़ पण या दिवाळीला तो सडा-सारवणाचा दरवळ नाही़ नात्यांचा तो ‘गोडवा’ नाही़ ही रुखरुख प्रत्येक दिवाळी सणात मनाला खात राहते.


प्रा. सुदर्शन धस, (लेखक रयत शिक्षण संस्थेत अध्यापक असून, साहित्यिक आहेत.)

Web Title: Diwali in the memories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.