Court sent death sentence to life imprisonment | मातापूर खून खटल्यातील आरोपीस न्यायालयाने सुनावली जन्मठेप
मातापूर खून खटल्यातील आरोपीस न्यायालयाने सुनावली जन्मठेप

श्रीरामपूर : किरकोळ कारणावरून फावड्याने मारहाण करून एकास जीवे मारल्याच्या आरोपावरून दिगंबर बाबूराव शिरोळे यास येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. यु. बघेले यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपीस एक लाख रुपयांचा दंडदेखील ठोठावण्यात आला.
सरकारी पक्षाच्या वतीने १३ साक्षीदारांची तपासणी केली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब तसेच ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश बंड यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. मातापूर येथे २० डिसेंबर २०१५ रोजी ही घटना घडली होती. मयत राजेंद्र कचरू शिरोळे याच्याकडून दिगंबर याने कांद्याच्या रोपाची मागणी केली. मात्र ते देण्यास राजेंद्र याने स्पष्ट नकार दिला. त्याचा राग आल्याने दिगंबर याने राजेंद्र याला फावड्याने जबर मारहाण केली. शेतातच घडलेली ही घटना मजूर महिला संगीता चक्रनारायण हिने बघितली. तिने राजेंद्र याच्या कुटुंबीयास याबाबत माहिती दिली.
जखमी अवस्थेत साखर कामगार रूग्णालयात नेले असता राजेंद्रला मृत घोषित करण्यात आले. या घटनेने मातापूर येथे खळबळ उडाली होती. सहायक पोलीस निरीक्षक के.बी.परदेशी यांनी गुन्ह्याचा तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.
सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. पी. बी. गटणे यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड. बी. एल. तांबे यांनी मार्गदर्शन केले. दंडाच्या रकमेतील ९० हजार रूपये मयताची पत्नी व दोन मुलांना एकत्रित देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.


Web Title: Court sent death sentence to life imprisonment
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.