संगणक अभ्यासक्रमात करिअरची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 05:51 PM2018-06-19T17:51:06+5:302018-06-19T17:51:06+5:30

संंगणक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात गेल्या दोन-तीन दशकांमध्ये लाखो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून, आगामी काळातसुद्धा विविध क्षेत्रांत असंख्य संधी उपलब्ध होणार आहेत.

Career opportunities in computer curriculum | संगणक अभ्यासक्रमात करिअरची संधी

संगणक अभ्यासक्रमात करिअरची संधी

googlenewsNext

डॉ.भास्कर झावरे
संंगणक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात गेल्या दोन-तीन दशकांमध्ये लाखो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून, आगामी काळातसुद्धा विविध क्षेत्रांत असंख्य संधी उपलब्ध होणार आहेत. सार्वजनिक, शासकीय व खासगी आस्थापनामध्ये वेगाने होणारे संगणकीकरण, भ्रमणध्वनी यामुळे झालेली क्रांती, ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा, ई-कॉमर्स, आॅनलाईन मार्केटिंग, डिजिटल इंडिया, नेट-बँकिंग, मोबाईल अ‍ॅपद्वारे एका क्लीकवर उपलब्ध सुविधा, सायबर सिक्युरिटी, नेटवर्किंग, नेटवर्क अ‍ॅडमिनिस्ट्रेशन आणि मॅनेजमेंट व वाढते सेवाक्षेत्र यांच्या गरजेनुसार संगणक प्रणाली विकसित करणे व त्यांचे व्यवस्थापन करणे अशा विविध संधी उपलब्ध आहेत. परंतु या उपलब्ध संधीचा फायदा घेण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी योग्य अभ्यासक्रमाची निवड करणे अपेक्षित आहे.
संगणक अभ्यासक्रमाच्या निवडीला सध्या मोठा वाव आहे. राष्टÑीय पातळीवर पदवीस्तरावर ५३ पेक्षा जास्त अभ्यासक्रम उपलब्ध असून, पदव्युत्तर स्तरावर संगणक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित २७ च्या वर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. येत्या शैक्षणिक वर्षात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेऊन संगणक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थी व पालकांनी विचारपूर्वक अभ्यासक्रमाची निवड करणे आवश्यक आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये पदवी व पदव्युत्तर स्तरावर विज्ञान, वाणिज्य आणि व्यवस्थापन तसेच अभियांत्रिकी विद्याशाखांमध्ये विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विहीत प्रवेश पद्धती निश्चित केलेली आहे.
बारावी (विज्ञान) किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ अनुदान आयोग मान्यताप्राप्त पदवी अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये उपलब्ध आहेत. पदवीस्तरावर श्रेयांक पद्धती (क्रेडिट बेस्ड सिस्टिम) द्वारे अभ्यासक्रम रचना व मूल्यांकन उपलब्ध असणारा बी.सी.ए. हा अभ्यासक्रम विज्ञान शाखेमध्ये उपलब्ध आहे. पदवी स्तरावर श्रेयांक पद्धती म्हणजे औद्योगिक क्षेत्रांची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांद्वारे तांत्रिक शिक्षण देण्यावर भर दिला गेला आहे. थेअरी आणि प्रॅक्टीकल्सद्वारे अभ्यासक्रमातील टक्केवारी बरोबरीची आहे.
विज्ञान शाखेमधून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बी.सी.ए., बी.एस्सी. (संगणक) व बी.एस्सी. (अ‍ॅनिमेशन) हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. तसेच कला व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना संगणक क्षेत्रात करिअर करण्याच्या दृष्टीने बी.बी.ए. (कॉम्प्युटर अ‍ॅप्लीकेशन) हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
बºयाचशा महाविद्यालयांचे प्रवेश आॅनलाईन पद्धतीने करण्यात येत आहेत. प्रवेशासंबंधित सविस्तर माहिती स्थानिक वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित करण्यात येते.
विद्यार्थी व पालकांनी अभ्यासक्रमाची निवड करताना सजगता दाखविली पाहिजे. आपल्या पाल्याची शैक्षणिक गुणवत्ता, आवड आणि अभ्यासक्रमात अंतर्भूत केलेल्या विषयांची माहिती करून घेणे आवश्यक आहे. विशेषत: पालकांनी लक्षात घेतले पाहिजे की आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी उच्च शिक्षणावरील आर्थिक भार खर्च म्हणून न पाहता त्याकडे गुंतवणूक म्हणून पाहिले पाहिजे. यासाठी महाविद्यालय व अभ्यासक्रम निवडीसाठी पालक व विद्यार्थी यांनी समक्ष भेट देऊन उपलब्ध शैक्षणिक सुविधा, प्रयोगशाळा, प्रशिक्षित मार्गदर्शक याबद्दलची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. पदवी स्तरावरील प्रथम वर्ष हे आपल्या पाल्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा कालखंड आहे असे समजून पालकांनी आपल्या पाल्याची आवड, बौद्धिक कुवत या बाबींवर विचारपूर्वक चर्चा करून निर्णय घेणे संयुक्तिक आहे. आवश्यकता भासल्यास संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून मार्गदर्शन घेण्यास हरकत नाही.शेवटी प्रवेशित विद्यार्थ्याने स्वत:चे उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी कठोर परिश्रम, निरंतर अभ्यास व कौशल्य प्राप्त करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक आहे.

 

Web Title: Career opportunities in computer curriculum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.