भाजप- सेना साथ-साथ - प्रकाश जावडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 03:00 PM2018-06-23T15:00:14+5:302018-06-23T15:00:24+5:30

महाराष्ट्रात शिवसेना व भाजप सरकारमध्ये एकत्र आहेत. त्यामुळे दोघेही साथ-साथच आहेत आणि पुढेही राहतील, असा विश्वास केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले.

BJP - Army together - Prakash Javadekar | भाजप- सेना साथ-साथ - प्रकाश जावडेकर

भाजप- सेना साथ-साथ - प्रकाश जावडेकर

Next

अहमदनगर : महाराष्ट्रात शिवसेना व भाजप सरकारमध्ये एकत्र आहेत. त्यामुळे दोघेही साथ-साथच आहेत आणि पुढेही राहतील, असा विश्वास केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले.
मंत्री जावडेकर यांनी शनिवारी खा. दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, भ्रष्टाचारमुक्त सुशासनाचा अनुभव लोकांना येत आहे. म्हणूनच कोणत्याही निवडणुकीमध्ये भाजपला यश मिळत आहे. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर झाले होते, त्यावेळी भाजपची सत्ता सहा राज्यात होती, तर काँग्रेसची सत्ता १७ राज्यात होती. आता भाजपची सत्ता २० राज्यात असून काँग्रेस तीन ठिकाणी राहिली आहे. यावरून पंतप्रधान मोदी यांचा कारभार जनतेला आवडला आहे, हे स्पष्ट होते. त्यामुळेच अनेक निवडणुकांमध्ये पक्षाला यश येत असून नाशिक शिक्षक मतदारसंघातही भाजपचा उमेदवार निवडून येईल. सर्वांची महाग शिक्षणापासून सुटका करण्यासाठी खासगी संस्थांमध्ये डोनेशनवर बंदी असून डोनेशन घेणाऱ्यांवर सरकार कडक कारवाई करेल, असा इशाराही जावडेकर यांनी दिला. ‘पवित्र’ हे अ‍ॅप केंद्र शासनाच्याच धोरणाचा भाग असून त्याची राज्यातही अंमलबजावणी केली जाईल. सर्वच ठिकाणचे दलाल हद्दपार केले असून भ्रष्टाचार मुक्त शासन देण्याचा प्रयत्न आहे. केंद्रातील एकाही मंत्र्यांवर आतापर्यंत भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर आरोप होतात, याकडे लक्ष वेधले असता जावडेकर म्हणाले, खोटे बोलून पण रेटून बोल अशी विरोधकांची स्थिती आहे. देवस्थानावर सरकारचे नियंत्रण आणण्यामागे भक्तांच्या हिताचा विचार केला आहे. यामागे देवस्थानावर सत्ता मिळविण्याचा अजिबात हेतू नाही, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले. वन विभागाच्या जमिनीवर कार्पोरेट प्रोजेक्ट उभारण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. छावणी मंडळाच्या अखत्यारीत रस्ते लोकांसाठी खुले केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या कामगिरीचीही आकडेवारी सादर केली. जावडेकर यांनी शिक्षक मतदार संघाच्या प्रचाराचाही सारडा महाविद्यालयात आढावा घेतला.

 

Web Title: BJP - Army together - Prakash Javadekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.