दहशतवादविरोधी दिन : विशेष नगरच्या पार्सल बॉम्बस्फोटाचे गूढ वर्षभरानंतरही कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:50 PM2019-05-21T12:50:51+5:302019-05-21T12:51:26+5:30

: नगर शहरात कुरिअर कार्यालयात झालेल्या पार्सल बॉम्बस्फोटाच्या घटनेला एक वर्ष होऊन गेले आहे़ या घटनेचे गूढ मात्र अद्यापही कायम असून, हा स्फोट कुणी घडवून आणला हे समोर आलेले नाही़

Anti Terrorism Day: The mystery of the special city parcel bomb blast remains intact even throughout the year | दहशतवादविरोधी दिन : विशेष नगरच्या पार्सल बॉम्बस्फोटाचे गूढ वर्षभरानंतरही कायम

दहशतवादविरोधी दिन : विशेष नगरच्या पार्सल बॉम्बस्फोटाचे गूढ वर्षभरानंतरही कायम

googlenewsNext

अरुण वाघमोडे
अहमदनगर : नगर शहरात कुरिअर कार्यालयात झालेल्या पार्सल बॉम्बस्फोटाच्या घटनेला एक वर्ष होऊन गेले आहे़ या घटनेचे गूढ मात्र अद्यापही कायम असून, हा स्फोट कुणी घडवून आणला हे समोर आलेले नाही़ नाशिकच्या एटीएस (दहशतवादविरोधी) पथकाकडे या घटनेचा तपास आहे़ तपासी यंत्रणा मात्र अद्यापपर्यंत घटना घडविणाऱ्या सूत्रधारापर्यंत पोहोचू शकलेली नाही़
शहरातील माळीवाडा परिसरात असलेल्या कौठीची तालमीजवळ मारुती कुरिअर कार्यालय आहे़ या ठिकाणी २० मार्च २०१८ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पार्सलमधील वस्तुचा स्फोट झाला़ या घटनेत कुरिअर कार्यालयातील कर्मचारी संदीप भुजबळ व संजय क्षीरसागर हे जखमी झाले़ या घटनेत संजय यांच्या डाव्या हाताच्या बोटांना इजा झाली होती तर भुजबळ हे किरकोळ जखमी झाले होते़ ज्या पार्सलचा स्फोट झाला ते पार्सल पुणे येथील सरहद्द संस्थेचे संस्थापक संजय नहार यांच्या नावे पाठविण्यात आले होते़ कुरिअरमधील कर्मचाऱ्यांनी ते हातात घेतल्यानंतर त्याचा स्फोट झाला़
या घटनेचा तपास एटीएसकडे देण्यात आलेला आहे़ घटनेनंतर एटीएसने स्थानिक पोलिसांच्या मदतीने सर्व बाजू तपासून पाहिल्या़ सीसीटीव्ही फुटेज, संशयित आरोपीचे रेखाचित्र, मोबाईलचे कॉल रेकॉर्ड मात्र त्यांना अद्यापपर्यंत काहीच धागेदोरे हाती लागले नाही़ त्यामुळे हा स्फोट कुणी घडवून आणला, त्या मागचा उद्देश काय होता आणि पार्सल पाठविण्यासाठी नगर शहरातील कुरिअर कार्यालयच का निवडण्यात आले हे सर्व प्रश्न वर्षभरानंतरही अनुत्तरित आहेत़ या घटनेनंतर मात्र नगरचे दहशतवादीविरोधी पथक अलर्ट झाले असून, संवेदनशील ठिकाणाची त्यांच्याकडून नियमित तपासणी केली जात आहे़

घटना टाळण्यासाठी व्यावसायिक, नागरिकांनी खबरदारी घ्यावी : नितीन पाटील
व्यावसायिक, नागरिकांनी खबरदारी घेतली तर बॉम्बस्फोटासारख्या घटना टळू शकतात अथवा पोलिसांना त्याबाबत माहिती मिळू शकते़ यासाठी सीम कार्ड खरेदी करताना ग्राहक म्हणून आपण जे आयडी प्रूफ देतो तेव्हा त्या झेरॉक्सवर ही प्रत केवळ सीमकार्ड खरेदीसाठीच देत आहोत असे नमूद करावे तसेच त्याखाली सही करून तारिख टाकावी़ यामुळे आपल्या कागदपत्रांचा गैरवापर
होणार नाही़ नागरिकांनीही संशयित व्यक्ती अथवा संशयित वस्तुबाबत पोलिसांना तत्काळ माहिती
द्यावी़
नगर शहरातील सर्व कुरिअरचालकांनी कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत़ कुरिअर घेऊन येणाºयांचे ओळखपत्र घ्यावे़ सायबर कॅफेचालकांनीही सीसीटीव्ही कॅमेरे लावून ओळखपत्र घेऊनच ग्राहकांना प्रवेश द्यावा, हॉटेल व लॉजचालकांनी ग्राहकांचे ओळखपत्र पाहूनच त्यांना रुम द्याव्यात़ याबाबत दहशतवादीविरोधी कक्षाकडून पडताळणी केली जाणार आहे़ जे व्यावसायिक याबाबत दक्षता घेणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा नगरच्या दहशतवादविरोधी सेलचे प्रमुख नितीन पाटील यांनी दिला आहे़

जखमीला मदत नाही
पार्सल बॉम्बस्फोटाच्या घटनेत संजय क्षीरसागर हे गंभीर जखमी झाले होते़ त्यांच्यावर नगरमधील खासगी रुग्णालयात सहा ते सात दिवस उपचार करण्यात आले़ शासनाकडून मात्र त्यांना अद्यापही काहीच मदत मिळालेली नाही़ क्षीरसागर हे सध्या त्याच कुरिअर कार्यालयात काम करत आहेत़

Web Title: Anti Terrorism Day: The mystery of the special city parcel bomb blast remains intact even throughout the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.