जामखेड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यातून महागाई भत्त्याची रक्कम गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 07:45 PM2018-04-26T19:45:51+5:302018-04-26T19:45:51+5:30

जामखेड नगरपालिकेच्या चतुर्थ श्रेणीतील १२० कर्मचारी व ४० तृतीय श्रेणी कर्मचा-यांना सरकारकडून मिळालेल्या महागाई भत्त्याची रक्कम बँक खात्यात वर्ग झाल्यानंतर तासाभरातच या कर्मचा-यांच्या खात्यातील प्रत्येकी ६ ते १५ हजार रूपये काढल्याचा संदेश या कर्मचा-यांना मोबाईलद्वारे मिळाला. अशाप्रकारे जवळपास १३ लाख रूपयांच्या रकमेस पाय फुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

The amount of Dearness allowance disappeared from the accounts of employees of Jamkhed Municipal Corporation | जामखेड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यातून महागाई भत्त्याची रक्कम गायब

जामखेड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यातून महागाई भत्त्याची रक्कम गायब

Next
ठळक मुद्दे१३ लाख रूपयांना पाय फुटले

जामखेड : जामखेड नगरपालिकेच्या चतुर्थ श्रेणीतील १२० कर्मचारी व ४० तृतीय श्रेणी कर्मचा-यांना सरकारकडून मिळालेल्या महागाई भत्त्याची रक्कम बँक खात्यात वर्ग झाल्यानंतर तासाभरातच या कर्मचा-यांच्या खात्यातील प्रत्येकी ६ ते १५ हजार रूपये काढल्याचा संदेश या कर्मचा-यांना मोबाईलद्वारे मिळाला. अशाप्रकारे जवळपास १३ लाख रूपयांच्या रकमेस पाय फुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही रक्कम कर्मचा-यांच्या खात्यातून कोणी व कशी काढली? याचीच पालिका वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
काही कर्मचा-यांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्वीच्या जामखेड ग्रामपंचायतीचे १६० कर्मचारी नगरपालिकेत सामावून घेतल्यानंतर त्यांना सरकारकडून अठरा महिन्यांच्या महागाई भत्ता फरकापोटी प्रत्येकी ५४ हजार रूपये असे एकूण ८६ लाख ४० हजार रूपये मिळाले. महिनाभरापूर्वी पालिकेच्या महाराष्ट्र बँकेतील खात्यात ही रक्कम जमा झाली. पालिकेने १९ एप्रिलला ही रक्कम संबंधित कर्मचा-यांच्या खात्यात वर्ग केली. १८ एप्रिलला पालिकेच्या काही कर्मचा-यांनी दोनशेहून अधिक विड्रॉल स्लिप महाराष्ट्र बँकेतून आणल्या होत्या. १९ एप्रिलच्या पहाटे सहाच्या सुमारास दोन कर्मचा-यांनी सफाई कामगारांना बोलावून ‘साहेबांनी तुम्हाला एवढे पैसे मिळवून दिले आहे. तुम्ही या स्लिपवर सह्या करा, अन्यथा पैसे परत जातील’, असे सांगितले. त्यामुळे कर्मचा-यांनी विड्रॉल स्लिपवर सह्या केल्या. कर्मचा-यांच्या महाराष्ट्र बँकेतील खात्यात १९ तारखेस प्रत्येकी ५४ हजार रुपये जमा झाल्यानंतर एका तासातच १२० कर्मचा-यांचे सहा हजार रूपये व ४० कर्मचा-यांच्या खात्यातील १५ हजार रूपये असे एकूण १३ लाख २० हजार रूपये खात्यातून काढल्याचा संदेश संबंधित कर्मचा-यांना मोबाईलद्वारे प्राप्त झाला.
हा संदेश मिळताच कर्मचा-यांमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणातील तो ‘साहेब’ नेमका कोण? याविषयी चर्चा होत आहे. दरम्यान नगरपालिकेच्या मुख्याधिका-यांसह पदाधिकारी, अधिकारी याबाबत बोलण्यास तयार नसल्याने पालिका प्रशासनाचे याबाबतचे म्हणणे समजू शकले नाही. मुख्याधिका-यांना विचारले असता याबाबत आपणास काही माहिती नाही. चौकशी करून सांगतो, असे ते म्हणाले. पण दोन दिवसानंतरही त्यांच्याकडून याविषयीची माहिती मिळू शकली नाही.

 

 

 

Web Title: The amount of Dearness allowance disappeared from the accounts of employees of Jamkhed Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.