स्रेहांकूरमधील बेवारस, अंध ओजसला मिळाले अमेरिकेतील आई-बाबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:04 PM2017-11-24T12:04:21+5:302017-11-24T12:05:57+5:30

स्वत:च्याच जन्मदात्यांनी तिला नाकारले अन् आणून सोडले नगरमधील स्रेहांकुरच्या दारात असलेल्या पाळण्यात. अकाली जन्माली आलेल्या तिच्यावर स्रेहांकुरच्या टीमने उपचार केले. नगरच्या आनंदऋषीपासून ते हैदराबादपर्यंतचे दवाखाने धुंडाळून तिला वाचविले. मात्र, तिला दत्तक घेण्यासाठी भारतभरातून नकार आला.

ahmednagar Snehankur blind ojas got America's parents | स्रेहांकूरमधील बेवारस, अंध ओजसला मिळाले अमेरिकेतील आई-बाबा

स्रेहांकूरमधील बेवारस, अंध ओजसला मिळाले अमेरिकेतील आई-बाबा

Next

अहमदनगर : स्वत:च्याच जन्मदात्यांनी तिला नाकारले अन् आणून सोडले नगरमधील स्रेहांकुरच्या दारात असलेल्या पाळण्यात. अकाली जन्माली आलेल्या तिच्यावर स्रेहांकुरच्या टीमने उपचार केले. नगरच्या आनंदऋषीपासून ते हैदराबादपर्यंतचे दवाखाने धुंडाळून तिला वाचविले. मात्र, तिला दत्तक घेण्यासाठी भारतभरातून नकार आला. अखेरीस १९ महिन्यांच्या प्रयत्नानंतर ओजसला (नाव बदललेले आहे) स्वीकारण्यासाठी अमेरिकेतील आई-बाबा सरसावले आहेत. हे दाम्पत्य संगणक क्षेत्रात कार्यरत आहेत.
भारतात दत्तकविधानासाठी विविध संस्थामधून आजमितीस केवळ २०० बालके उपलब्ध आहेत. तर दत्तकविधानाच्या प्रतीक्षेतील पालकांची संख्या सुमारे १९ हजारावर पोहचली आहे. तरीही मागील वर्षी स्नेहांकुर दत्तकविधान केंद्रात दाखल झालेल्या बेवारस आणि अंध ओजसला (बदललेले नाव) दत्तक घेण्यासाठी एकही भारतीय पालक पुढे आला नाही. अखेरीस १९ महिन्यांच्या प्रयत्नानंतर अमेरिकेतील संगणक अभियंता असलेल्या दाम्पत्याने ओजसला स्वीकारले आहे. ओजसच्या दत्तकविधानाचा कार्यक्रम रविवारी (दि़ २६) होणार असल्याचे स्नेहालयाचे सचिव राजीव गुजर आणि संचालक अनिल गावडे यांनी सांगितले.
१७ एप्रिल २०१६ रोजी पहाटे ४ वाजता बालिकाश्रम रस्त्यावरील स्नेहांकुरच्या दारात असलेल्या पाळण्यात अज्ञात व्यक्तीने एक बाळ सोडले. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून स्नेहांकुर टीमने या बालिकेला त्वरित ताब्यात घेतले व उपचार सुरु केले. श्वास घेण्यास अडचण येत असल्याने अजय वाबळे आणि संतोष धर्माधिकारी यांनी या बालिकेस तातडीने आनंदऋषी रुग्णालयात दाखल केले. तर बाळासाहेब वारुळे हे पोलीस ठाणे आणि बाल कल्याण समिती आदी यंत्रणाकडे कायदेशीर पूर्तता करण्यात गुंतले. आनंदऋषी रुग्णालयात डॉक्टरांनी ब-याच तपासण्या केल्या. त्यातून निष्पन्न झाले की, बाळाचा जन्म गर्भावस्थेची सात महिने पूर्ण होण्यापूर्वीच झाला आहे. त्याचे हृदय, फुप्फुसे अत्यंत दुबळे असून त्यास जंतूसंसर्ग झालेला आहे. बाळाची जगण्याची शाश्वती डॉक्टरांच्या मते खूपच कमी होती. उपचार बरेच खर्चिक होते. परंतु या बालिकेच्या उपचारासाठी स्रेहांकूर टीमने समाजातून उभी केली़ उपचारांना वेग आला. पुढील २ महिने ही बालिका उष्ण काच कक्षात, व्हेनटीलेटर अशा उपकरणांवर जगण्याची धडपड करीत होती. ओजसचा उपचारांचा खर्च वाढल्याने समाजातून निधी संकलन करण्यात आले. उपचार झाल्यानंतर बाळाला रुग्णालयातून स्नेहांकूरमध्ये आणण्यात आले़
सप्टेबर महिन्यात स्नेहांकुरमधील परिचारिकेला ओजसच्या दृष्टीत कमतरता असल्याचे जाणवले. त्याच दिवशी तिला पद्मश्री विखे पाटील रुग्णालयात डॉक्टर स्नेहल भालसिंग यांनी तपासले. त्यांनी ओजसच्या डोळ्याचा रेटीना (पडदा) पूर्ण खराब झाल्याचे सांगितले़ त्यानंतर स्रेहांकूरचे नाना बारसे, विशाल अहिरे, सीमा गंगावणे हे त्वरीत जालना येथील गणपती नेत्रालयात पोहोचले. येथील नेत्रतज्ज्ञ गिरीश राव यांनी ओजसला हैदराबादला नेण्याचा सल्ला दिला़ १५ आॅक्टोबर २०१६ रोजी सकाळी ८ वाजता स्रेहांकूरची टीम हैदराबाद येथील एल. व्ही. प्रसाद रुग्णालयात पोहोचली़ तेथील डॉक्टर सुभद्रा जलाली यांनी तातडीने ओजसला तपासून दृष्टी गेल्याचे सांगितले़ लेजर शस्त्रक्रिया केल्यास बाळाला अंधुक दिसण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले़ त्यामुळे स्नेहांकूर टीमने शस्त्रक्रिया करण्याचा आग्रह धरला. डॉक्टर जलाली यांना विनती केल्यावर त्यांनी ओजसची शस्त्रक्रिया विनामूल्य करण्याचे मान्य केले. स्नेहांकूर टीम हैदराबादमध्ये तळ ठोकून बसली. ओजसची २३ आॅक्टोबर २०१६ रोजी शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे तिला अंधुक दिसण्याची शक्यता तयार झाली. आज अखेर ती दृष्टीहीनच असली तरी काही शब्द, वाक्य बोलायला शिकली आहे. तिचा परिपूर्ण बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक विकास व्हावा म्हणून स्नेहांकूरने परिश्रम घेतले. आता ओजसला अमेरिकेतील आई-बाबा मिळाले असून, ओजसचे अंधकारमय जीवन प्रकाशमान होणार आहे.

Web Title: ahmednagar Snehankur blind ojas got America's parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.