काश्मिरमध्ये राबविणार आदर्शगाव योजना : सरहद संस्थेचा पुढाकार

By साहेबराव नरसाळे | Published: November 15, 2018 12:04 PM2018-11-15T12:04:59+5:302018-11-15T12:34:46+5:30

साहेबराव नरसाळे अहमदनगर : लोकसहभागातून काश्मिरमधील तीन जिल्ह्यांत आदर्श गाव योजना राबविण्याचा निर्णय सरहद संस्थेने घेतला असून, त्याबाबत बुधवारी ...

Adarshogan scheme implemented in Kashmir: Initiative of border district | काश्मिरमध्ये राबविणार आदर्शगाव योजना : सरहद संस्थेचा पुढाकार

काश्मिरमध्ये राबविणार आदर्शगाव योजना : सरहद संस्थेचा पुढाकार

Next

साहेबराव नरसाळे
अहमदनगर : लोकसहभागातून काश्मिरमधील तीन जिल्ह्यांत आदर्श गाव योजना राबविण्याचा निर्णय सरहद संस्थेने घेतला असून, त्याबाबत बुधवारी काश्मिरमधील तरुणांच्या टीमने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आदर्शगाव कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांची भेट घेऊन चर्चा केली.
काश्मिरमधील अनंतनाग, कुपवाडा, बारामुला या जिल्ह्यात आदर्श गाव योजना राबविण्याबाबत ५० संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे सर्व्हे सुरु करण्यात आला आहे़ सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांनी काश्मिरमधील तरुणांची हजारे व पवार यांची भेट घडवून आणली़ बुधवारी या टीमने राळेगणसिद्धी व हिवरेबाजारमधील कामांची पाहणी केली़ गाव विकासात लोकसहभाग कसा वाढविता येईल, याबाबत हजारे व पवार यांच्याशी चर्चा केली़ या टीममध्ये जाहीद भट, ओवैसी वाणी, फिराज खान, इलियास खान, तुफेल भट, मुस्ताक ख्वाजा यांचा समावेश आहे़ ही सर्व टीम सरहद संस्थेअंतर्गत काश्मिरमधील विविध प्रश्नांवर काम करीत आहे.
अण्णा हजारे जाणार काश्मिरला
काश्मिरमध्ये दूध उत्पादन, गाव विकासासाठी कोणत्या योजना राबविण्यात येतील, याबाबत तरुणांनी हजारे यांच्याशी चर्चा केली़ ‘काश्मिरमध्ये लोकसहभागातून काम करण्यास मोठा वाव आहे़ तुम्ही गावांची निवड करुन कळवा़ मी येतो,’ असे आश्वासन हजारे यांनी दिल्याची माहिती भट यांनी दिली़
यापूर्वीही झाला होता प्रयत्न
नोव्हेंबर २००० साली सरहद संस्थेने काश्मिरमध्ये आदर्शगाव योजना राबविण्याबाबत पुढाकार घेतला होता़ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काश्मिरमध्ये बैठकाही घेतल्या होत्या़ अनेक संस्था एकत्र येऊन काम करीत होत्या़ मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे ते काम रखडले होते.
पुढील आठवड्यात बैठक
लोकांमध्ये एकात्मता निर्माण करुन मातीशी जोडलेल्या माणसांना एकत्र केल्यास काश्मिरमध्येही आदर्श गाव योजनेला चांगला प्रतिसाद मिळेल, असे पोपटराव पवार यांनी काश्मिरमधील तरुणांना आश्वासित केले़ पुढील आठवड्यात गाव विकासाच्या मुद्यावर एकत्र येणाऱ्यांची बैठक घेऊन तेथील टीम पुन्हा राळेगणसिद्धी व हिवरेबाजारला आणणार असल्याचे भट यांनी सांगितले़

युवकांना सोबत घेऊन पूर्वीच्याच गाव विकासाच्या आराखड्याला मूर्त स्वरुप देण्याचे नियोजन सुरु आहे़ लोकसहभागातून आदर्श गाव योजना काश्मिरमध्ये राबविण्याबाबत अण्णा हजारे व पोपटराव पवार यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. -संजय नहार, संस्थापक अध्यक्ष, सरहद संस्था, पुणे

 

 

Web Title: Adarshogan scheme implemented in Kashmir: Initiative of border district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.