‘आरारा राSS राSS... खतरनाक’!

By साहेबराव नरसाळे | Published: December 11, 2018 05:16 PM2018-12-11T17:16:19+5:302018-12-11T19:25:15+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या गाडीने नगरच्या गांधी मैदानात येणार होते, त्या गाडीचे टायर आज या रस्त्यांना लागणार होते.

'Aaraa raSS raSS... dangerous'! | ‘आरारा राSS राSS... खतरनाक’!

‘आरारा राSS राSS... खतरनाक’!

Next

अहमदनगर शहरातील चितळे रोड.. वेळ भल्या पहाटेची. सुस्तावलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अचानक जाग येते. सगळे धावत सुटतात. कोणी चितळे रोडवर, कोणी गांधी मैदानात तर कोणी चित्रा टॉकीजसमोरच्या रोडवर. सगळे झपाझप झाडून कामाला लागले. रस्ते चकाचक होत होते. पाहतापाहता अशी जादू झाली की तोंडातली गुळणीही लोकं गिळून घेऊ लागले. त्यांना भीती होती की आपण जर येथे थुंकलो तर रस्ता खराब तर नाही ना होणार? किती हा सुज्ञपना? किती ती प्रतिष्ठा? ‘आरारा राSS राSS... खतरनाक’!
एरव्ही सगळ्या शहरातला कचरा याच रस्त्यांवर वाहून आला की काय असे वाटावी अशी परिस्थिती. पण शुक्रवारी, ७ डिसेंबर रोजीची सकाळ उजाडली तीच एकदम चकाचक. रस्त्यावर कुठे साधं चिठुरं दिसेना की साधा झाडांचा उडून आलेला पालाही सापडेना (कदाचित वाऱ्यानंही दिशा बदलली असावी) अशी अद्भुत सकाळ चितळे रोडवरचे, गांधी मैदान परिसरातले लोक पहिल्यांदाच अनुभवत होते. कारणही तसेच होते.


छत्रपतींच्या महाराष्ट्राचे लाडले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या गाडीने नगरच्या गांधी मैदानात येणार होते, त्या गाडीचे टायर आज या रस्त्यांना लागणार होते. मग या रस्त्यांचे पावित्र्य जपणार नाही तो नगरकर कसला?
सगळी दुकानं झाडून बंद होती. ही दुकाने कोणी सक्तीने बंद केली नव्हती़ तर आपल्या दुकानातला कचरा रस्त्यावर येऊन नगरची पर्यायाने मुख्यमंत्र्यांचीच अप्रतिष्ठा कोणालाही सहन होणारी नव्हती (म्हणजे दुकानदारांना) म्हणून हा सारा खटाटोप. चक्क एका दिवसाच्या व्यवसायावरच पाणी सोडणारा आमचा नगरकर म्हणूनच ग्रेट.


मी फेरफटका मारायला मारायला निघालो होतो. हे सारे पाहून अवाक् झालो. तोंडात चिंगम कोंबले तेही थुंकायचेच नाही या इराद्याने. त्याचे कागदही खिशात ठेवले (ते आत्तापर्यंत होते). पुढे निघालो. ठिकठिकाणी पोलीस कर्तव्य बजावत होते. काहींच्या तोंडात मावा होता. पण थुंकत कुणीच नव्हते़ तिथे माझीच काय बिशाद! चकाचक झालेला हा रस्ता डोळ्यात साठवत मी पुढे जात होतो़ इतक्यात एक कर्तव्यनिष्ठ पोलिसाने माझ्या मार्गात काठी आडवी टाकून रस्ता अडवला. इकडे नाही; तिकडून जा, असा इशारा केला. पण बोलला काहीच नाही. मीही त्याचा आब राखत मार्ग बदलला तर पुढे दुसरा पोलीस तत्परच! इकडून हात घाल, तिकडून चाचप, असे करीत माझी झाडाझडती घेतली. काखेतली बॅग तपासली आणि म्हणाला, ‘जा हिला घरी ठेवून ये़’ घर लांब. आता काय करायचे? एका मित्राची रुम गाठली. बॅग आत टाकली आणि पुन्हा निघालो. नाष्टा करायचा होता. पण एकही दुकान, हातगाडी नव्हती. म्हटले चला चहा तर घेऊ. तो नक्कीच मिळेल (आपले पंतप्रधान चहावाले आहेत हा अभिमान नसानसात होताच). चहाच्या, वडापावच्या टपऱ्यांची जिथे नेहमी रांग लागते, त्या गांधी मैदानातील चौकात पोहोचलो. पण तिथे तर चिटपाखरुही नाही. चहाचा घोट दिवास्वप्नच ठरले. तेथील स्वच्छता डोळे दिपवत होती. ज्या मैदानावर शेळ्या, कुत्र्यांच्या विष्ठा साठलेल्या, दुधवाल्यांच्या सांडलेल्या दुधाचा वास खमंग भज्यात मिसळलेला असायचा आणि परिसरातला सारा कचरा याच चौकात वळाटून आल्यासारखा भासायचा तो हाच चौक का प्रश्न मनाला चावून गेला. सगळीकडे लाल गालीचे अंथरलेले. मला हेवा वाटू लागला या भागाचा, नगर शहराचा. तसा अभिमान मुख्यमंत्र्यांनाही वाटला असेलच. उगाच का त्यांनी नगर शहराला (जिल्ह्याला नाही) दत्तक घेण्याची घोषणा केली? 


आजचं हे नगर पाहून कोणालाही विश्वास पटला नसता (मलाही नाही पटला) की रोज हे नगर कचऱ्यानं कोंडलेलं असतं़ भटक्या कुत्र्यांनी वेढलेलं असतं़ कोंडलेल्या गटारांनी बदबदलेलं असतं़ पण याला तरी कसं खोटं ठरवायचं की जिथे रोज कचऱ्याच्या, गटाराच्या फोटो आणि बातम्यांनी वर्तमानपत्रांची पान दुर्गंधलेली असतात? नाकाला रुमाल लावून वर्तमानपत्र वाचावित असं बटबटीत नगर रोज भेटत राहतं वर्तमानपत्रांतूऩ मुख्यमंत्र्यांच्या आगमनाची पहिल्या पानावरची जाहीरात उलटली की आतही त्याच अस्वच्छ नगरच्या बातम्या होत्याच की. मग त्यांचाच मार्ग स्वच्छ, चकाचक, खड्डेमुक्त कसा झाला एका रात्रीत? लोकं इतकी सुज्ञ, समंजस आणि प्रतिष्ठा जपणारी कशी निजपली एका रात्रीत? अशा प्रश्नांचा घोळ घोंगावत राहिला दुपारपर्यंत. टळटळीत दुपार टळली त्यावेळी गांधी मैदान भरले होते़ लोकं शिस्तीत येऊन बसत होते. मुख्यमंत्री साहेब आले. त्यांचा जयजकार झाला आणि त्यांनी नगरचे चकाचक रस्ते, शिस्तप्रिय जनता पाहून नगरला दत्तक घेण्याची घोषणाही केली.


‘‘मुख्यमंत्र्यांनी रोज नगरच्या एका वॉर्डात सभा घ्यावी. म्हणजे किमान तो तो भागही असाच स्वच्छ, चकाचक, शिस्तप्रिय होईल,’ अशी कुजबूज उपस्थितांमध्ये रंगली होती. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांचे भाषण संपले. ते आल्या मार्गीच गेले. ते जाताच पुन्हा हातगाड्या लागल्या. रस्त्यांचे श्वास कोंडले. कुणीकडून तरी वाव्हळट यावी तसा एकाने सकाळपासून झाकून ठेवलेला कचरा दुसऱ्या मजल्यावरुन रस्त्यावर फेकला आणि अन् चकाचक झालेला रस्ता पुन्हा कळकटला. पोलीस ते पाहत होते. कदाचित दिवस-रात्री कर्तव्य बजावून ते थकले असावेत. ते काहीच बोलले नाहीत़ अधिकारीही घरांच्या ओढीने निघाले होते़ तेव्हढ्यात वाऱ्याची एक चक्री आली अन् अधिकाऱ्यांच्या अंगावर तो सारा खकाना फेकून गेली. ते पाहून चितळे रोडवर रोज धुळकटणारा एक व्यावसायिक ओरडला, ‘आरारा राSS राSS... खतरनाक’!


- साहेबराव नरसाळे
(लेखक अहमदनगर लोकमत आवृत्तीत उपसंपादक आहेत.)

Web Title: 'Aaraa raSS raSS... dangerous'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.