१०० गुंठ्यात दहा लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 11:50 AM2018-05-25T11:50:44+5:302018-05-25T11:50:44+5:30

श्रीक्षेत्र धामणगाव देवीचे (ता.पाथर्डी) येथील रामकिसन काकडे व प्रयागाबाई काकडे यांनी वयाच्या साठीनंतरही अथक परिश्रम, हायटेक तंत्राची कास धरीत सेंद्रीय शेणखत आणि विद्राव्य खतांव्दारे शंभर गुंठे जमीन क्षेत्रावर केवळ पाचशे संत्रीचे झाडांची लागवड केली होती.

100 million in one million | १०० गुंठ्यात दहा लाख

१०० गुंठ्यात दहा लाख

googlenewsNext

चंद्रकांत गायकवाड
पाथर्डी : श्रीक्षेत्र धामणगाव देवीचे (ता.पाथर्डी) येथील रामकिसन काकडे व प्रयागाबाई काकडे यांनी वयाच्या साठीनंतरही अथक परिश्रम, हायटेक तंत्राची कास धरीत सेंद्रीय शेणखत आणि विद्राव्य खतांव्दारे शंभर गुंठे जमीन क्षेत्रावर केवळ पाचशे संत्रीचे झाडांची लागवड केली होती. दुसऱ्या वर्षी सुमारे ३१ टन संत्री फळाचे उत्पादन घेतले. लहान, मोठे फळाचे आकारमान व प्रतवारीनुसार तीस ते चाळीस रुपये प्रतिकिलोचा दर मिळाल्याने यातून या पती-पत्नीला सुमारे दहा लाख साठ हजार रुपयाची अर्थप्राप्ती झाली.
२०१२ मध्ये काकडे यांनी धामणगावच्या पूर्वेला गावकुसाला उत्तरमुखी वाहणा-या जमनागिरी नदीच्या किना-यालगतच्या सोमाचा मळा या क्षारपड पोयटा जमिनीत १५ बाय १५ फूट अंतरावर पाचशे संत्रीची झाडे लावली. खोल खड्डे घेवून ती लिंबाचा पाला, शेणखताने भरली. काही दिवस सरळ सरीओरंबा करून पाणी दिले. त्यामुळे रोपे निरोगी व कसदार वाढली. पुढे पाणी व विद्राव्य खते देण्यासाठी आधुनिक फिल्टर टाकी ठिबक सिंचन संच बसविला. आंतरमशागती ट्रॅक्टरने करीत असल्याने आंतरपिके टाळली. त्यामुळे झाडांचा चौफेर परीघ तणरहित राहून २०१६ साली चौथ्या वर्षीच झाडे डेरेदार होऊन बहरली.
१५ मे २०१८ अखेर अखेरची बारीक सारीक फळे तोडून २० किलो वजनाचे ७० कॅरेट भरले गेले. या महिन्यात पंधरा दिवसांपासून झाडांना पाणीच पुरले नसल्याने सुकलेली फळे वजनदार झाली नसल्याचे वास्तव नजरेस आले. काकडे यांना अजित व अतुल अशी दोन विवाहित मुले आहेत. मोठा अजित कृषी पदवीधारक असून नामांकित बियाणे कंपनीत सेवेत आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली अतुलच्या मदतीने फळशेतीचे काम कमी मजुरीत जमिनीत मुबलक शेणखत टाकून तर ठिबकद्वारा विद्राव्य खते देत ट्रॅक्टरने अंतरमशागत करीत आहे, असे रामकिसन काकडे यांनी सांगितले.
पहिल्या वर्षी पाच लाख पदरी पडले. यावर्षी बहार धरणे खते देणे व अचूक वेळा मशागत व सेंद्रिय पद्धतीची खते फवारणी अशी त्रिसुत्री जमली. त्यामुळे फळांचे आकारमान व संख्या यांनी झाडे वाकून गेली. बांबूचा आधार द्यावा लागला. सुरुवातीची काही फळे थेट बाजारात नेऊन विकली. तर आता प्रतवारी परिचित झाल्याने व्यापारी जागेवरच येवून खरेदी करीत आहेत. त्यामुळे दर कमी मिळत असला तरी तोडणी वाहतूक हमाली आडत खर्च लागत नाही.त्यामुळे पदरी समाधान आहे, असे प्रयागाबाई म्हणाल्या. चार गायी, तीन म्हशींची दावण असल्याने फळशेतीला मुबलक प्रमाणात शेणखत मिळते. गरज पडेल तेव्हा नत्र म्हणून याच पशुधनाचे मूत्र देखील मजुराद्वारा आम्ही झाडांना देतो. जनावरांच्या चारा, पाणी यांचा दुष्काळात त्रास होतो. पण हा फळशेतीचा सुप्त फायदा होतो, असे संत्रा उत्पादक शेतकरी रामकिसन काकडे यांनी सांगितले.

 

 

 

 

 

 

Web Title: 100 million in one million

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.