Yogi is pure mind. | योगी पावन मनाचा।

- प्रा. डॉ. संदीप ताटेवार

संत ज्ञानेश्वर नेहमीप्रमाणे कोरान्न घेऊन घराच्या अंगणात आले होते. ज्ञानेश्वरांनी निमूटपणे आपली झोळी मुक्तेच्या हाती दिली पण त्यांचा चेहरा लालबुंद झाला होता. नेहमीच्या त्यांच्या हसतमुख चेह-यावर क्रोध होता, उद्विग्नता होती; उदासीनता होती. लहानशी मुक्ता हिरमुसली. तिने दादा...म्हणून हाक मारली मात्र काही न उत्तर देता ज्ञानेश्वर झोपडीत जाऊन त्याने ताटी बंद केली. मुक्ता म्हणाली, दादा काय झालं? कुणी बोललं का तुला? कुणी अपमान केला काय? निवृत्ती शांतपणे म्हणाला, लोक बोलतात बोलू द्यावे. मान अपमान दोन्ही आम्हा समान आहे. अरे ज्ञानदेवा, निंदास्तुती आम्हा समान आहे ? ज्ञानदादा दार उघडतच नाही म्हणून मुक्ताई म्हणाली,
योगी पावन मनाचा । साही अपराध जनाचा ।।
विश्व राग झाले वन्ही । संतसुखी व्हावे पाणी ।।
शब्द शास्त्र झाले क्लेश । संती मानावा उपदेश ।।
विश्व पर ब्रम्ह दोरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।
दादा, अरे जो दुसºयांचा अपराध पोटात घालतो तोच योगी. जगाचा क्र ोधाग्नी भडकला तर संतांनी पाणी बनून वर्षाव करावा आणि तो विझवून टाकावा. लोभ, अहंकार, क्र ोध ज्याच्या मनाला कधी शिवित नाहीत तेच खरे विरक्त. लोकनिंदेला संतांनी आदेश मानावा आणि त्यापासून आत्मबोध घ्यावा.
हे जग ब्रह्माच्या धाग्याने विणलेला एक विश्वपट आहे. आपण सुद्धा जीवन जगात असताना लोकांच्या धारधार शब्दांनी दु:खी होत असतो. थोडं कुणी काही म्हंटल तर नाराज होतो. जीवाला लावून घेतो. वारंवार काटेरी शब्द आठवून आठवून स्वत:लाच जखमा करून घेतो. कधी कधी तर रक्तबंबाळ होतो ! एकदा घडलेली वाईट घटना उठता बसता आठवून वारंवार दु:ख निर्माण करतो व शक्तीहीन बनतो. खरंतर, लोकांकडून दु:ख घ्यायचे की नाही हे आपल्याच हातात असते तरी सुद्धा आपण घेत असतो. काही लोक तर वाईट घटना आयुष्याच्या शेवटपर्यंत विसरत नाही. लोकांना बदलविणे महाकठीण ! म्हणूनच संत मुक्ताबाईनी सांगितल्याप्रमाणे योगीराजाची लक्षणे आपल्यात रुजवून दु:खाला आपल्या अंत:करणात शिरकाव करण्यापासून आजपासून, नाही नाही, या क्षणापासूनच रोखू या !


Web Title: Yogi is pure mind.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.