जेथे जातो तेथे तू माझा सांगाती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 12:56 AM2018-07-19T00:56:20+5:302018-07-19T13:24:00+5:30

. Where you go, you tell me. Dindi walking | जेथे जातो तेथे तू माझा सांगाती...

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती...

Next

इंद्रजित देशमुख

प्रेमसूत्र दोरी।
नेतो तिकडे जातों हरी।। १।।
मनेंसहित वाचा काया।
अवघे दिले पंढरीराया।।धृ।।
सत्ता सकळ तया हातीं।
माझी कींव काकुळती ।।३।।
तुका म्हणे ठेवी तैसें
आम्ही राहो त्याचे इच्छे ।।४।।
ते उत्तर म्हणजे निव्वळ आणि निव्वळ प्रेम हेच आहे असं तुकोबाराय म्हणतात. प्रेम हेच सगळ्यात महत्त्वाचं सूत्र आहे की, ज्या सूत्रामुळेच संसारातील आणि परमार्थातील सर्व जिवलगांना आपलसं करता येतं. वारीत चालणाऱ्या वारकºयांच्या जवळील सगळ्यात मोठं भांडवल म्हणजे प्रेमचं आहे. मुळात प्रेम हेच आयुष्याच्या सर्व संपादनाचं मूळ आहे, असा अधिष्ठित भाव ज्या संप्रदायात जोपासला जातो तो संप्रदाय म्हणजे ‘वारकरी संप्रदाय’ होय. इथे सर्वांवर प्रेमाचाच संस्कार केला जातो. अगदी देवाला सुद्धा प्रेमाच्या बंधनात अडकवून यांनी आपलसं केलेलं आहे. हे देवावर कधी लालन प्रेम करतात, वात्सल्य प्रेम करतात, कधी सख्यत्वाचं प्रेम करतात, तर कधी माधुर्य प्रेम करतात. तसं पाहिलं तर देवालाही प्रेमचं लागतं. त्याला दुसºया कशाचीच गरज नसते.
लालन याचा अर्थ देवाचं पालकत्व घेऊन त्याच्यावर प्रेम करणं होय. याचा अर्थ देवावर आपलं लेकरू समजून प्रेम करणं. आमच्या संतांनी कितीतरी गौळणी लिहीत असताना त्यामध्ये कृष्ण परमात्म्याला बाळ समजून जे लिहिलंय ते सगळं या लालन प्रेमातून व्यक्त झालंय. म्हणून तर नाथराय एका गौळणीत लिहितात,
‘बाळ सगुण गुणांचं तान्हं गं।
बाळ दिसतंय गोजिरवाणं गं।
तुम्ही सांगता गाºहाणं गं।
गोकुळच्या नारी।’
हे देवावर वात्सल्य प्रेमही करतात. वात्सल्य याचा अर्थ देवावर वत्सवत भावाने, देवाचे अपत्य होऊन, देवालाच आपला माता-पिता समजून प्रेम करणं होय. आणि तसं पाहिलं तर देवच आपला खरा माता-पिता असतो. जन्मदाते आई-वडील जन्म देतात आणि देव आपल्याला जगवतो म्हणून तर महाराज एके ठिकाणी म्हणतात, ‘तू माय माउली सकळ जिविचा जिव्हाळा।’
हे देवावर सख्यत्वाचं म्हणजे मैत्रीचं प्रेमही करतात. जे अजुर्नाने केलं होतं ते. जे सुदाम्यानं केलं होतं. ज्यामध्ये ‘तू प्रेमाचा पुतळा। मैत्रियेची चितकला।।’ असा भाव ओतप्रोत भरलेला असतो.
आणि हे देवावर माधुर्य प्रेमही करतात म्हणजे जे गोपिकांनी केलं होतं ते प्रेम. म्हणून तर त्या ‘श्रीरंगा वाचुनी आन ने घे’ या अवस्थेत जगत होत्या. वरील ज्यांनी ज्यांनी ज्या प्रकारचं प्रेम केलं त्या सर्वांना तो त्या त्या स्वरूपात प्राप्त झाला. आणि खरं सांगायचं तर देवाला प्राप्त करायचा सगळ्यात जवळचा मार्ग म्हणजे प्रेमच होय. प्रेम हेच सूत्र आहे. नव्हे देवाला आपल्या प्रेमळ बंधात बांधून ठेवायची दोरी म्हणजे प्रेम की, ज्या योगे प्रभूला आपल्याला हवं तिकडं नेता येतं.
इथं वारीत देव आपल्यासोबत चालत असल्याची धारणा मनी धरून वारकरी चालत आहेत. त्या धारणेपाठीमागील भाव हा,
‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती।
चालविसी हाती धरुनिया।।’
हाच आहे. मात्र, त्यासाठी या वैष्णवांनी मन, वाचा, काया हे सगळं त्या पंढरीरायाला दिलेलं असतं. आपल्या जीवनाची सर्व सत्ता त्या परम सत्ताधीशाकडे दिलेली असते. आणि
‘काय घडेल ते घडो या शेवटी।
लाभ आणि तुटी देव जाणे।।’
या तुकोबारायांच्या म्हणण्याप्रमाणे आयुष्यातील प्रत्येक क्षण, प्रसंग आणि त्यातून उमटणारा परिणाम मग तो अनुकूल असो वा प्रतिकूल त्याबद्दल कोणत्याच तºहेची तक्रार न करता ही सगळी भगवंतांची इच्छा व प्रसाद समजून जगण्याची वृत्ती त्यांनी अंतर्यामी धारण केलेली असते, आणि मगच अशी वृत्ती जोपासणाºया भक्तांच्या आयुष्यातील सर्व आपदा आणि विपदा तो हरी हरवून टाकतो आणि मग त्यांच्या जीवनात जो उरतो तो निव्वळ आनंदच असतो. जो या वारीत आम्ही नित्य अनुभवतो.
(लेखक संत साहित्याचे अभ्यासक तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

Web Title: . Where you go, you tell me. Dindi walking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.