अवंतीनरेश राजा म्हणाला हवं ते माग..... काय मागावं ? कसं मागावं ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 07:12 PM2019-07-19T19:12:33+5:302019-07-19T19:12:53+5:30

एकदा अंधा-या रात्री सामान्य माणसासारखे कपडे घालून राज्याच्या सीमा भागात फिरत असताना विक्रमसेन रस्ता चुकला.

What to ask? How to ask? adhyatmik - spiritual | अवंतीनरेश राजा म्हणाला हवं ते माग..... काय मागावं ? कसं मागावं ?

अवंतीनरेश राजा म्हणाला हवं ते माग..... काय मागावं ? कसं मागावं ?

googlenewsNext

रमेश सप्रे

अवंती हे छोटंसं, पण आदर्श राज्य होतं. राजा विक्रमसेन हा प्रजेवर मुलासारखं प्रेम करणारा होता. ‘यथा राजा, तथा प्रजा’ या न्यायानं सारी प्रजाही आपल्या राजाला माता-पिता-सखा-स्वामी अशा सर्व नात्यांनी जणू देवच मानत होती. राज्यातील कायदा, सुव्यवस्था नीट राहावी यासाठी विक्रमसेन अत्यंत दक्ष असे. विविध वेषांतरं करून तो आपल्या राज्यातून वेळी अवेळी फिरत असे. त्यामुळे केवळ मंत्री व त्यांनी दिलेलं राज्यातील परिस्थितीबद्दलचे अहवाल (रिपोर्टस) यावर तो अवलंबून नसे. 

एकदा अंधा-या रात्री सामान्य माणसासारखे कपडे घालून राज्याच्या सीमा भागात फिरत असताना विक्रमसेन रस्ता चुकला. भटकत तो एका झोपडीवजा घराकडे पोचला. त्याला दार, खिडक्या होत्या; पण दरवाजे नव्हते. म्हणजे रात्रंदिवस घर उघडंच असायचं. इतकी सुरक्षितता आपल्या राज्यात लोक अनुभवतात हे पाहून राजा मनोमन खुश झाला; पण लगेचच त्याला प्रचंड भूक नि तहान याची जाणीव झाली. समोरच्या झोपडीत डोकावून पाहिलं तर खोलीच्या मध्यभागी गवत जमिनीवर पसवून नि हातांची उशी करून एक शेतक-यासारखा दिसणारा माणूस शांत झोपला होता. दुसरं कोणीही तिथं नव्हतं. आपण आल्याचं कळावं म्हणून राजा जोरात खाकरला. त्या आवाजानं झोपडीत शांत झोपलेला तो माणूस जागा झाला. त्यानं आलेल्या व्यक्तीची विचारपूस केली. 

एक व्यापारी असलेली ती पाहुणी व्यक्ती एका रात्रीसाठी आस-याला आली होती. राजानं आपला परिचय एक वाट चुकून भरकटलेला व्यापारी अशी करून दिली होती. सगळा माल खपल्यामुळे त्याच्याजवळ कोणतंही सामान नव्हतं. त्याची ती परिस्थिती पाहून झोपडीतल्या माणसानं गवत पसरून त्याला बसायला सांगितलं. प्यायला खापरातून पाणी दिलं. यानंतर भोजनासाठी काही फळं, कंदमुळं आणायला तो बाहेर गेला. थोडय़ाच वेळात मिळतील ती फळं वगैरे घेऊन आला. अतिशय प्रेमानं त्या व्यापा-याला खायला देऊन त्याच्याशी बोलत बसला. दुसरे दिवशी सकाळी तो व्यापारी (म्हणजेच राजा विक्रमसेन) जायला निघाला. जाताना तो झोपडीत राहणा-याला म्हणाला, ‘इतकं रूचकर भोजन नि एवढी गाढ झोप मी कधीही अनुभवली नाही. मी प्रसन्न झालोय. पाहिजे ते माग.’ यावर त्या झोपडीत राहणा:याला हसू आलं. तो म्हणाला, ‘अंगावरच्या कपडय़ानिशी तू माझ्या आश्रयाला आला होतास तू काय देऊ शकणार आहेस मला?’ दोघांचा संवाद चालू असताना राजाच्या शोधासाठी आलेल्या सैनिकांनी राजाला पाहून त्यांचा जयजयकार केला. तेव्हा त्या झोपडीत राहणा-याला कळलं की आपल्याकडे आश्रयाला आलेली व्यक्ती कोणी व्यापारी नसून प्रत्यक्ष अवंतीनरेश विक्रमसेन आहे. तेव्हा त्याच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. सेवकांनी आणलेल्या पालखीत बसताना राजा त्या माणसाला म्हणाला, ‘उद्या दरबारात येऊन तुला हवं ते माग. मी ते तुला देईन.’ राजा गेल्यावर तो माणूस काय मागायचं यावर विचार करू लागला. ‘मी एक हजार सुवर्णमुद्रा (सोन्याची नाणी) मागितल्या नि राजा म्हणाला बस इतक्या?’ तर आपल्या मनाला चुटपुट लागेल की अजून जास्त का नाही मागितल्या. जर मी शंभर एकर जमीन मागितली अन् राजा म्हणाला, ‘पुरे एवढीच?’ तर पुन्हा मला रुखरुख. मी जर दहा घरं मागितली त्यावर राजा म्हणाला, ‘बस इतकीच’ तर आपल्या मनाला कायम चुटपुट लागून राहणार. 
‘काय मागावं?’ या विचारात असताना त्याला एका साधूची आठवण झाली. लगेच तो साधूकडे जाऊन आपली अडचण सांगतो. यावर प्रसन्नपणो हसून साधू उद्गारतो, ‘तू राजाकडे जाऊन माग की त्याला (राजाला) शोभेल असं काहीतरी द्यावं.’

दुस-या दिवशी दरबारात येऊन त्या माणसानं साधूनं सांगितल्याप्रमाणे मागितलं. राजा विचारात पडला. त्याला वाटलं ‘आपण दहा हजार मोहरा, शंभर एकर जमीन आणि दहा घरं देऊ केली आणि या माणसानं जर ‘बस इतकंच, एवढंच?’ असं म्हटलं तरी लोकांसमोर आपली लाज काढली जाईल. त्यानं आपली ही अडचण मंत्र्याला सांगितली. मंत्री म्हणाला, ‘तुमच्याकडे अधिकाधिक देण्यासरखं काय आहे तर सर्व सैन्य, वैभवासह तुमचं राज्य ते सर्व देऊन टाका. त्यापेक्षा जास्त काही तुम्ही देऊच शकणार नाही.’ राज्य कसं द्यायचं? हा प्रश्न राजाच्या चेह-यावर पाहून मंत्री म्हणाला, ‘राजेसाहेब घाबरू नका हा माणूस अविवाहित आहे नि आपली राजकन्या लग्नाच्या वयाची झाली आहे. राज्याबरोबर तीही देऊन टाका. म्हणजे हा माणूस घरजावई बनून आपलंच राज्य आपल्याकडेच राहील. यात सर्वाचं कल्याण आहे. राजाला ही कल्पना खूप आवडली. त्यानुसार सारं घडून सुद्धा आलं. 

खरंच कुणालाही अगदी देवाला सुद्धा काही मागताना आपलं काही मागण्यापेक्षा त्यालाच शोभेल, योग्य वाटेल ते त्यानं द्यावं. एवढंच मागावं, यात एक महत्त्वाचा लाभ आहे. देव देईल ते आपल्या हिताचं, कल्याणाचंच असेल. कारण आपण फक्त वर्तमानात राहून मागत असतो तर सद्गुरु देव देतात ते अंतिम परिणामाचा म्हणजेच भूत-वर्तमान तसंच भविष्याचा विचार करूनच देतात. म्हणून जीवनात बरे वाईट जे काही घडेल ती परमेश्वराची किंवा संत सद्गुरुंची इच्छा समजून ताणमुक्त, भयमुक्त, चिंतामुक्त अन् आनंदयुक्त जीवन जगू या. 

Web Title: What to ask? How to ask? adhyatmik - spiritual

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.