कर्मनिष्ठा आणि श्रमप्रतिष्ठेतूनच कल्याण साध्य होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 06:04 PM2019-04-06T18:04:56+5:302019-04-06T18:06:23+5:30

निष्काम कर्म ही संकल्पना अत्यंत विरळ झाली आहे.

Welfare will be achieved through communion and labor | कर्मनिष्ठा आणि श्रमप्रतिष्ठेतूनच कल्याण साध्य होईल

कर्मनिष्ठा आणि श्रमप्रतिष्ठेतूनच कल्याण साध्य होईल

Next

कामे सर्वचि मूल्यवान | त्यांची योग्यता समसमान ||
श्रीकृष्णे सिध्द केले उच्छिष्टे काढून | ओढिले ढोरे विठ्ठले ||

केल्या जाणाऱ्या सर्व विकासोन्मूख कामांची योग्यता सामाजिकदृष्टया सारखीच असून विकास कामांत त्यांचा वाटा हा कमी किंवा जास्त नसतो असे राष्ट्रसंत तूकडोजी महाराज ग्रामविकासाचे महत्व सांगतांना नमुद करतात. कोणीही सर्व विद्या आत्मसात करित नाही. परिस्थितीनुसार व श्रमपरत्वे माणूस कला अवगत करतो. जो तिन्ही जगाचा स्वामी, ब्रम्हांड रचेता पांडवाचे सारथ्य करितो ही देखील मानवी रुपात महानता आहेच. एकदा का एखादया कार्यास स्वत: होऊन वाहून घेतले की त्यात समर्पणाची भावना ओतप्रोत भरलेली असावी. स्वत:च्या विकासासाठी आणि पर्यायाने देशाच्या विकासासाठी आपल्या वाटयाला आलेली कामे तन्मयतेने, सचोटीने व कार्यकूशलतेने करणे म्हणजेच राष्ट्रभक्ती आहे.

कार्य ही परंपरा नसून ध्येय असावे लागते. बहूतांश वेळेस कामे न करताच श्रेयवादात माणसे अडकतात आणि नामोहरम होतात. “कर्मण्ये वाधिकारस्ये मा फलेषु कदाचन” असे गीतेत श्रीकृष्णाने अर्जूनाला सांगितले आहे. काम करीत राहणे व फळाची अपेक्षा करु नये असे असतांना देखील काम न करता फलप्राप्ती कशी होईल ही प्रवृत्ती बळावत आहे. काम न करिता दाम, नाम आणि पदाची अपेक्षा हया विकृती बळावल्या आहेतच. प्रत्येक क्षेत्रात आत्मचिंतन होण्याची गरज असून कर्म हीच पूजा आहे यांचा विचार ठासून रुजविण्याची गरज आज निर्माण झाली आहे.
            खरे नाम विष्काम ही ग्रामसेवा |
            झटू सर्वभावे करु स्वर्ग गावा ||
            कळो हे वळो, देह कार्यी पडू दे |
            घडु दे प्रभो ! एवढे हे घडू दे ||

कार्यासक्ती कशी असावी याचे हे ज्वलंत भाष्य आहे आपल्या हातून असे कार्य घडणे गरजेचे आहे जे निष्काम स्वरुपाचे असावे. आपण जेथे वावरतो तेथे स्वर्गासम भास झाला पाहीजे. असे मागने काय असावे तर मरावे परी किर्तीरुपी उरावे, पण असे घडतांना दिसते का? याचा फार विचार करण्याची गरजच नाही कारण निष्काम कर्म ही संकल्पना अत्यंत विरळ झाली आहे.

व्यक्ती कर्म करण्यासाठी स्वतंत्र आहे. कर्म-फळ संबंध नैतिकतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे. यालाच कर्मवादाचा सिध्दांत म्हणतात. संत मीराबाई, सूरदास, कबीर इत्यादी कवींनी कर्माची धारणा सूस्पष्ट करित असताना ”कर्मगति टारे नही टरै | जो जस करै सो फल चाखा” असे सांगितले आहेच. कर्माची व फळाची प्राप्ती एकाच वेळी शक्य नसते अर्थात दोहोत खूप अंतर असते. कर्मावस्थेत कर्ता आणि फळावस्थेत भोक्ता असे असेल तर कर्मावस्थेतील कर्त्यास त्याची फलप्राप्ती होत नाही. जर कर्म करणारा फलप्राप्तीवेळी बदलला तर फलप्राप्तीचा उपभोक्ता कोण ? अशा परिस्थितीत दोन दोष निर्माण होण्याची शक्यता असते. एक कृत प्रणाश म्हणजे केलेले कर्म नष्ट होणे आणि दूसरे अकृताभ्यूगम म्हणजे अकृत कर्माचे फळ. यावरुन असे स्पष्टपणे जागवते की कर्मफळ हे निश्चित प्राप्त होतेच.

कर्म फळ संबंध कर्त्याच्या इच्छेवर नसून कर्माच्या स्वरुपावर अवलंबून असते. जसे कर्म तसे फळ या उक्तीशी साधर्म्यता निष्पण होते वर्तमानात केलेले सदाचरण प्रत्येकाच्या भावी सूखी आयूष्याची उपलब्धी असते. कर्म करित असतांना व्यक्तीस अहंभाव अर्थात कर्ताभा असता कामा नये. कोणतेही कर्म हे विकार रहित असणे गरजेचे आहे. आचारभाव व इतरांच्या कल्याणाच्या दृष्टीने केलेले कर्म हे पूण्य मानले जाते. ज्या विचारामूळे व कर्मामूळे मनूष्य निसर्ग, पशू, पक्षी यांची हानी होते हे पापकर्म म्हणतात. कर्म उपासना आणि ज्ञान “त्रिकांड वेद हे प्रमाण ज्ञानाचे होते विज्ञान, परब्रम्ही” असे समर्थांनी म्हटले आहे. आपले कर्म, आणि ज्ञान याचा संगम होऊन परोपकारी क्रियानिर्मीती होणे ही काळाची गरज आहे. परंतू कर्म हे विज्ञाननिष्ट व समवर्ती विचाराचे असणे गरजेचे आहे. कर्मनिष्ठा ही सर्वश्रेष्ट तर आहेच कारण त्यातूनच मानवाच्या विकासाची बीजे पेरली जातात. सूकर्माधिष्टीत व्यक्ती स्वत:चा विकास तर करतोच त्यासोबतच जनकल्याणास देखील तो पूरक असतो.

आजच्या कालावधीत कर्मनिष्ठा आणि श्रमप्रतिष्ठा आवश्यक झाल्या आहेत. ज्यांच्याकडे हया गोष्टी आढळतात त्यांच्या हातून मानव कल्याण होणे शक्य आहे म्हणूनच प्रार्थना केली आहे की, “तूझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो सकळांचे लक्ष तूजकडे वळो, मानवतेचे तेज झळझळो विश्वामाजी या योगे”.

- डॉ भालचंद्र ना. संगनवार

( लेखक लातूर येथे वरिष्ठ भूवैज्ञानिक आहेत )

Web Title: Welfare will be achieved through communion and labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.