निर्लेप मनाचे कर्म

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 04:28 AM2019-01-24T04:28:38+5:302019-01-24T04:28:50+5:30

पार्था, तुला मी एकच निखळ सत्य सांगतो की, आपण जेव्हा कर्म करीत असतो,

Unhealthy minded karma | निर्लेप मनाचे कर्म

निर्लेप मनाचे कर्म

Next

- वामन देशपांडे
भगवंतांनी मोठ्या प्रेमाने महत्त्वाचा विचार दिला की, गहना कर्मणो गति:।।गीता : ४ :१७।। पार्था, तुला मी एकच निखळ सत्य सांगतो की, आपण जेव्हा कर्म करीत असतो, तेव्हा करीत असलेल्या कर्मापासून मनाने अलिप्त होत, कर्म पूर्ण करणे हाच खरा, कर्माचे तत्त्व जाणून घेत, कर्म करीत राहण्याचा सर्वोेत्तम मार्ग आहे. थोडक्यात सांगायचे झाले, तर निर्लेप मनाने कर्म करणे म्हणजे अकर्माला जाणून घेणे आहे. कमलपत्र जसे पाण्यावर तरंगत असतानासुद्धा पाण्याचा एक थेंबसुद्धा स्वत:ला स्पर्शू देत नाही ना, त्याप्रमाणे कर्म करूनही, कर्तेपणापासून अलिप्त होत कर्मात दंग होणे, हेच निष्काम कर्मयोगाचे रहस्य आहे. पार्था, कुठले कर्म मानवी असित्वाला मुक्त करणारे आहे आणि कुठले कर्म बंधनात अडकविणारे आहे. याचा निर्णय करणे खूपच कठीण आहे. म्हणून निष्काम कर्मयोगाचे तत्त्व जाणून घेणे खूपच गहन आहे. मनातल्या कामना एकदा का संपल्या की, कर्मे अकर्मे होतात आणि मनात कामनांचा पिंगा सुरू झाला की, करीत असलेले कर्मे विकर्मे, म्हणजे पापकर्मे होतात. म्हणून प्रत्येक साधक भक्ताने प्रथम कामनांचा आणि वासनांचा नि:पात करून, मगच कर्म करण्यासाठी उद्युक्त व्हावे. भगवंत अर्जुनाला फार महत्त्वाचा संदेश देतात की,
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते सद्दो स्त्वकर्मणि।।गीता : २:४७।।
पार्था, वर्णाश्रम धर्मानुसार आपली जी कर्तव्यकर्मे असतात ना, ती आपण पार पाडणे, हा प्र्रत्येकाचा अधिकार आहे, परंतु त्या कर्माचे जे फळ असते ना, त्या फळावर कर्त्याचा अधिकार नाही. म्हणून पार्था, तू प्राप्त होणाऱ्या फळाचा हेतू चुकूनही होऊ नकोस आणि मला कर्म करायचे आहे, या भावनेतसुद्धा तू गुंतू नकोस. मनात कर्माची वा कर्मफलाची आसक्ती बाळगू नकोस. प्राप्त कर्माचे पालन करणे एवढेच फक्त तुझ्या हातात आहे. तू कायम लक्षात ठेव की, परमेश्वराने हा नरजन्म जो दिला आहे ना, तो तुझा उद्धार व्हावा, म्हणून दिला आहे. कर्मफळ हा हेतू उद्भवता कामा नये. थोडक्यात, कर्मावर अधिकार आहे, कर्मफळावर तुझा अधिकार नाही. सुख दु:खांनी लेपटलेले आयुष्य माणूस आयुष्यभर जगत असतो. पूर्व प्रारब्ध जसे आणि जेवढे असेल, तेवढे हे दोन्ही भोग हे भोगावेच लागतात. कारण प्रारब्धाचा नाश करण्याचे सामर्थ्य कोणापाशीही नाही, परंतु माणूस या जगत असलेल्या मानवी योनीचा विवेकाच्या साहाय्याने सदुपयोग करू शकतो. ही किमया तेव्हा घडते, जेव्हा मन आपले चंचलत्व पूर्णपणे आसक्त, परमेश्वरी अस्तित्वाची जाणीव पूर्णांशाने करून घेऊन मर्त्य संदर्भ दूर सारत, समभावाने विचार करू लागते. साधकाने सुखाचा वा दु:खाचा संदर्भ आपल्या आत्मतत्त्वाने जगत असलेल्या आयुष्याशी कदापिही जोडू नये. भगवंत म्हणतात,
सुखदु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ।
ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ।।
ऐन युद्धप्रसंगी पार्था, तुला असे वाटू लागले आहे की, हे कौरव आमचे कुटुंबीयच आहेत आणि त्यांना ठार मारले तर पाप लागेल. म्हणून हे युद्धच नको. पार्था, तू एक प्रथम लक्षात घे की, पापाची कारणमीमांसा युद्ध नसून, तुझी ही कामना पापाची जननी आहे. जय-पराजय, लाभ-हानी, सुख-दु:ख यांचा तू प्रथम समान समज. ही सर्व मनातील द्वंद्वे आहेत. मनात कुठल्याही स्वरूपाचे भावविश्व निर्माण न करता तू फक्त युद्ध कर. तेच तर तुझे विहित कर्म आहे. कारण तू क्षत्रिय आहेस. या युद्धामुळे तुला पाप लागणार नाही.

Web Title: Unhealthy minded karma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.