आज रविवार, २४ सप्टेंबर, आश्विन शुक्ल चतुर्थी आहे. आज अपरान्हकाळी पंचमी असल्यामुळे आजच ललिता पंचमी आहे. आज देवीची पूजा करून देवीसमोर चौथी माळ बांधावयाची आहे.

मित्रांनो, हे कलियुग आहे. कलियुगाच्या एकंदर वर्षातून ५,११८ वर्षे मागे पडली असून, अजून ४ लक्ष २६ हजार ८८२ वर्षे शिल्लक आहेत. कलियुगापूर्वी देवी उपासकांची प्रार्थना ऐकून उपासकांना उलट प्रश्न विचारत नव्हती, परंतु हे कलियुग आहे. त्यामुळे भक्तांच्या प्रार्थना ऐकून देवी प्रश्न विचारू शकते.
उपासक देवीची पूजा करून देवीची प्रार्थना करतात. काही उपासक प्रार्थना केल्यावर देवीकडे काही ना काही मागणे मागीत असतात. देवी, तू मला संपत्ती दे. मला नोकरी व्यवसायात यश दे. माझे आरोग्य चांगले राहू दे. माझा आजार दूर होऊ दे. मला राहायला घर मिळवून दे. लग्न लवकर होऊ दे. घरात पाळणा हलू दे, अशा प्रकारच्या एक नाही, तर अनेक प्रकारच्या मागण्या देवीपुढे करीत असतात. काही भक्त तर देवीला नवस बोलत असतात. माझे हे काम झाले, तर अमुक पैसे मी तुझ्यापुढील पेटीत टाकीन, मी तुला तमुक नैवेद्य दाखवीन वगैरे वगैरे.
परंतु लगेचच देवी भक्ताला काही प्रश्न विचारत असते. तू मेहनती आहेस का? तू नीतिमान आहेस का? तू निर्व्यसनी आहेस का? तू समाजातील गरीब, दीन-दुबळ्यांना मदत करतोस का? तू महिलांचा आदर करतोस का? तू राष्ट्रभक्त आहेस का? तू सकाळी लवकर उठतोस का? तू आर्थिक बचत करतोस का? असे अनेक प्रश्न देवीही विचारत असते.
भक्त जसे बोलतो, तसे करतो का? हे देवीला नीट कळत असते. मगच देवी काय करायचे, ते ठरवीत असते. देवी स्वत: श्रीमहालक्ष्मी असल्यामुळे तिला तुमच्या पैशांची आवश्यकता नसते. ती स्वत: अन्नपूर्णा असल्याने, तिला तुमच्या मोठ्या नैवेद्याचीही गरज नसते. त्यामुळे भक्ताने फलप्राप्तीसाठी केवळ पूजा करणे पुरेसे ठरणार नाही, तर स्वत: देवीच्या इच्छेप्रमाणे कृती करण्याची खरी गरज आहे.
आज समाजात आळस, अंधश्रद्धा, अविचार, भ्रष्टाचार, अनीती, अस्वच्छता, अज्ञान इत्यादी राक्षस थैमान घालत आहेत. या राक्षसांना ठार मारण्यासाठी देवी आता अवतार घेणार नाही. हे काम प्रामाणिक भक्तांनीच करावयाचे आहे.
घरातील देवता
नवरात्रात मंदिरातील आणि देव्हाºयातील देवीची पूजा व आरती जोरात केली जात असते, पण घरात चोवीस तास, तीनशे पासष्ट दिवस वावरणाºया देवीकडे काही लोक दुर्लक्ष करतात, हे योग्य नाही. कारण मंदिरातील किंवा देव्हाºयातील देवीपेक्षा घरात वावरणारी देवी जास्त महत्त्वाची आहे. आजी, आई, पत्नी, बहीण, मुलगी, नात या महान देवता आहेत.
देवी नवसाला पावते, हा एक मोठा गैरसमज आहे. ती नवसाला पावत नसते. ती पावत असती, तर खूप बरे झाले असते. आतंकवाद्यांना नवस बोलून नष्ट करता आले असते. त्यासाठी आपण सर्वांनी देवीची प्रार्थना करू या, हे देवी मला नेहमी सद्बुद्धी लाभो!
या देवी सर्व भूतेषु,
बुद्धिरूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै
नमस्तस्यै नमो नम: ।।


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.