प्रकाशित चिंतन नि प्रज्ज्वलित मन हाच आनंदाचा चिंतामणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 05:51 PM2019-05-21T17:51:08+5:302019-05-21T17:51:15+5:30

काही वर्षापूर्वी दूरदर्शनवर मार्च महिन्याच्या आसपास एक मजेदार जाहिरात यायची.

The thought of illuminated mind and the illuminated mind | प्रकाशित चिंतन नि प्रज्ज्वलित मन हाच आनंदाचा चिंतामणी 

प्रकाशित चिंतन नि प्रज्ज्वलित मन हाच आनंदाचा चिंतामणी 

Next

- रमेश सप्रे
काही वर्षापूर्वी दूरदर्शनवर मार्च महिन्याच्या आसपास एक मजेदार जाहिरात यायची. ‘चिंतामणी, चिंता मनी! चिंतामणी योजना! एका बँकेची जाहिरात होती ती. चिंतामणी नावाचा एक माणूस मार्च संपण्यापूर्वी पैसे कुठे कुठे गुंतवायचे या चिंतेत असतो. त्याच्या मनी (मनात) चिंता असते ‘मनी’ची (पैशाची) त्यासाठी करमुक्त गुंतवणुकीची चिंतामणी योजना होती ती. यातील शब्दांवरती कसरत जाहिरातीचा भाग म्हणून सोडली तरी मुद्दा महत्त्वाचाच आहे. 
आपण सारे ‘चिंतातूर जंतू’ असतो ‘चिंता मृत देहाला एकदाच जाळते, पण चिता जिवंत माणसाला जन्मभर जाळत असते.’ ‘चिता नि चिंता फरक फक्त अनुस्वाराचा. पण परिणाम?’ असे अनेक विचार, सुविचार आपण वाचत असतो, म्हणत असतो. ‘चिंतामणी’ या जादुई मण्याबद्दल आपण ऐकलेलं असतं. हा असा चमत्कार घडवणारा मणी आहे की हा हातात धरून मनात चिंतन करू ती वस्तू प्रत्यक्षात साकारते. तो एकदा मिळाला की सा-या चिंताच मिटल्या असं आपण समजतो. 
चिंता मिटल्या म्हणजे संपल्या असं नव्हे तर त्या वेळेपुरत्या पु-या झाल्या. पुन्हा नव्या चिंता निर्माण होतातच. आपल्या चिंताचं एक वैशिष्टय़ म्हणजे त्या सर्व नकारात्मक, भयावह, जीवनातील आनंदाला ग्रहण लावणा-या अशा असतात. महाभारतात ‘यक्षप्रश्न’ नावाच्या प्रसंगात पिता यम (यक्ष बनून) आपला पुत्र युधिष्ठिर याला काही प्रश्न विचारून अज्ञातवासाच्या वर्षात सर्वानी लपून राहण्याची युक्ती किंवा योजना सुचण्यासाठी त्याची बुद्धी तेजस्वी करतो. त्यातलं एक प्रश्नोत्तर या संदर्भात महत्त्वाचं आहे. यक्ष विचारतो, ‘जगात गवतापेक्षा विपुल काय आहे?’ त्याला युधिष्ठिर उत्तर देतो, मानवाच्या मनातील चिंता’. किती खरंय हे उत्तर! एकवेळ पृथ्वीच्या पाठीवरचं गवत संपेल किंवा संपवून टाकता येईल; पण माणसांच्या चिंता काही नष्ट होणार नाहीत. 
या चिंतांवर उपाय काही आहे का? निश्चितच आहे चिंतन! तेही नकारात्मक नव्हे तर सकारात्मक चिंतन (पॉझिटिव्ह थिंकिंग). आनंदाच्या चिंतामणीचा अशा सकारात्मक चिंतनाशी संबंध आहे. सकारात्मकसाठी दुसरा शब्द आहे भावात्मक. साहजिकच त्याच्याविरुद्ध अभावात्मक (निगेटिव्ह) चिंतन, आनंदासाठी चिंतनाची याहून वरची पायरी गाठणं आवश्यक असतं. नुसतं भावात्मक नव्हे तर प्रभावात्मक चिंतन (इफेक्टिव्ह थिंकिंग).
असं भविष्याबद्दलचं भावी संकल्प प्रकल्पाबद्दलचं, येऊ घातलेल्या ब-या वाईट घटना संबंधातलं प्रभावात्मक चिंतन हीच खरी आनंदाची खाण आहे. 
एकाच प्रसंगाकडे पाहताना एकाला ‘अंधार’ दिसतो तो निराश होतो. खचून जातो. तर त्याच परिस्थितीकडे दुसरा प्रकाशाच्या दृष्टीनं पाहतो. हेच पाहा ना!
एका गावात दोन पादत्राणं तयार करणा-या कंपन्यांचे प्रतिनिधी येतात. निरीक्षणानंतर दोघांच्याही लक्षात येतं की पाच हजार लोकवस्ती असलेल्या या गावात एकही जण चप्पल, बूट वगैरे काहीही वापरत नाहीत. सारे अनवाणी फिरतात हे पाहून एका प्रतिनिधीनं आपल्या कंपनीला कळवलं, ‘या गावात आपली पादत्राणं विकायला बिलकुल संधी नाहीये कारण इथं कुणीही पादत्राणं वापरत नाहीत.’
याचवेळी दुस-यानं कळवलं होतं आपल्या कंपनीला इथं योग्य प्रचार नि जाहिरात केल्यास पादत्राणं विकायला पूर्ण संधी आहे. पाच हजार पादत्राणांचे जोड (पेअर्स) निश्चित खपवता येतील. या दुस-या प्रतिनिधीला खरा चिंतामणी म्हणता येईल. पहिला प्रतिनिधी ‘फक्त चिंता मनी’ धरून ठेवणाराच आहे. 
‘पेला अर्धा भरलाय, अर्धा सरलाय’ या म्हणण्यात विरोधाभास नाहीये. उलट अर्धा कुणीतरी वापरलाय कुणाची तरी गरज (तहान) भागवलीय, निदान अर्धा पाण्यानं किंवा दुधानं भरलेला असेल तर उरलेला अर्धा हवेनं तरी भरलेला आहेच की! अन् हवा ही कोणत्याही पेयापेक्षा अधिक जीवनदायी आहे. खरं ना?
समर्थ रामदास ‘मनाचे श्लोक’मध्ये म्हणतात 
करीं सार चिंतामणी, काचखंडे। तया मागतां देत आहे उदंडे।।
म्हणजे हातात चिंतामणी असताना मनात काचेचे तुकडे (काचखंडे) असले तर तसेच उदंड तुकडे चिंतामणी तुम्हाला प्रत्यक्ष देणार आहे. 
‘आनंदाचा चिंतामणी’ ही कविकल्पना नाही. सतत सर्व घटनाप्रसंगांबद्दल, वस्तू गोष्टीबद्दल प्रसन्न, प्रभावी चिंतन करत राहणं हाच आनंदाचा राजमार्ग आहे. ‘तुम्ही मार्ग शोधा, मुक्काम (मंजिल) तुम्हाला शोधत येईलच’ या वाक्यात हेच सुचवलं आहे. मनात, विचारात सतत भाविकालाबद्दलची प्रकाशित चित्रं असतील, तसंच बुद्धीत चिंतनात नेहमी प्रसन्न स्वप्नं  असतील, नवनवीन उत्कटभव्य ध्येय असतील तर जीवन आनंदानं ओतप्रोत भरून जाईल यात शंका नाही. लक्षात ठेवू या प्रकाशित चिंतन नि प्रज्ज्वलीत मन (इग्नायटेड माईंड) हाच सतत तेजोमय चिंतामणी आहे, आनंदाचा!

Web Title: The thought of illuminated mind and the illuminated mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.