- प्रा.डॉ. संदीप ताटेवार

आपले विचार हेच आपल्या मनाचे अन्न असते. आपले शरीर सुदृृढ राहण्यासाठी जसे आपण पौष्टिक व सकस अन्न घेतो तसे आपल मन सशक्त राहण्यासाठी आपले विचार हे उच्च दर्जाचे असणे आवश्यक असते. अध्यात्मामध्ये विचारांना साधारणपणे चार भागात विभागल्या जाते. पहिले म्हणजे उच्च दर्जाचे विचार, दुसरे म्हणजे साधारण विचार, तिसरे म्हणजे नकारात्मक विचार व चौथे म्हणजे अनुपयोगी विचार. जीवन जगताना आपले जास्तीत जास्त विचार उच्च दर्जाचे असणे आवश्यक आहे.
असे म्हणतात की सामान्य मानसिक अवस्थेत आपल्या मनात साधारणपणे ३० ते ४० हजार प्रतिदिन विचार येत असतात. रात्री झोपेत आपल्या विचारांची गती खूप कमी असते.
जेव्हा मन चिंतेत असते तेव्हा विचारांची संख्या जास्त असते मात्र जेव्हा मन शांत असते तेव्हा ती कमी असते. आपल्या मनात बहुदा नकारात्मक विचार येण्याची संख्या जास्त असते तर सकारात्मक विचार येण्याची संख्या कमी असते. त्यामुळेच सकारात्मक विचार मनात जाणीवपूर्वक निर्माण करावे लागतात. कोणतीही क्रिया करण्यापूर्वी आपल्या मनात प्रथम विचार निर्माण होतात व तसे भाव निर्माण होतात नंतर मेंदू विचारांचे विश्लेषण करतो. त्यानंतर तो योग्य निर्णय घेतो व घेतलेला निर्णय आपल्या इंद्रियांकडे पोहचवितो. त्याप्रमाणे आपले इंद्रिय कार्य करतात.
जर आपले विचार उच्च दर्जाचे असतील तरच आपले इंद्रिय कर्म चांगले करतील. त्यामुळे जर आपण नियमित उच्च दर्जाचे विचार करू लागलो तर निरंतर आपले कर्म चांगले होऊन आपले भाग्य उदयास येईल.
बरेचदा आपल्या स्वभावामुळे, संस्कारामुळे व सवयीमुळे मेंदूचा विचारांचे विश्लेषण करून निर्णय घेणारा टप्पा गाळला जातो मग जसे आपले विचार तसे आपण इंद्रियामार्फत कार्य करत जातो. त्यामुळे सकारात्मक विचारांचे जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. राजकुमाराचा बुद्ध, वाल्याचा वाल्मिकी, राम्या माधुकरीचा रामशास्त्री, मानवाचा महामानव हे उच्च दर्जाच्या विचारांचेच फलित होय.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.