म्हणून तू आता हे पापाचे बीजच नष्ट करून टाक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 04:56 AM2019-05-30T04:56:25+5:302019-05-30T04:56:36+5:30

हे अग्निदेवते, तू आम्हाला शुभ्र आणि सुंदर अशा मार्गाने त्या परम कल्याणरूप तेजोमय परमेश्वराकडे घेऊन जा.

So now, destroy the seed of sin | म्हणून तू आता हे पापाचे बीजच नष्ट करून टाक

म्हणून तू आता हे पापाचे बीजच नष्ट करून टाक

Next

- शैलजा शेवडे
अग्ने नय सुपथा राये
अस्मान विश्वानि देव वयुनानि विद्वान।
युयोध्यस्मज्जुहुराणमेनो भूयिष्ठां ते नम उिक्तं विधेम ॥
ईशोपनिषदातील हा शेवटचा श्लोक. याचा अर्थ आहे, हे अग्निदेवते, तू आम्हाला शुभ्र आणि सुंदर अशा मार्गाने त्या परम कल्याणरूप तेजोमय परमेश्वराकडे घेऊन जा. वाकड्या मार्गाने नेणाऱ्या पापांशी यशपूर्वक झगडता येईल, इतके तू कर, इतकी शक्ती आम्हाला दे. तुला आमची सर्व कर्मे ठाऊक आहेत. आमचे हे भ्रमरूप पाप नाहीसे कर. स्वसरूपाविषयी अज्ञान, हेच मूळ पाप होय. म्हणजे आपण हे शरीर मन इ. आहोत, असे मानणे हे पाप. या अज्ञानातूच सर्व पापांची उत्पत्ती होते. म्हणून तू आता हे पापाचे बीजच नष्ट करून टाक. (स्वामी विवेकानंद म्हणतात की, वेदांतात अज्ञानालाच पाप म्हणले आहे.) तुला परत परत नम्रतेने प्रार्थना करत आहोत. हे विश्व जणू उभ्या आडव्या धाग्याने विणलेले वस्त्र आहे, अशी कल्पना करून साधक म्हणतात, हे धागेही तू आम्हाला उकलून दाखव. म्हणजे आम्हाला सर्व कर्माचे रहस्य समजेल, कर्माला कारणीभूत होणारी तत्त्वे कळतील, जीवनाची वाटचाल करत असताना चुकूनमाकून आमच्या हातून दुष्कर्म किंवा पाप होण्याचा संभाव दिसू लागला, तर ते दूर करण्यास आम्हाला सामर्थ्य दे. परमेश्वर मार्ग दाखवतोच... प्रेरणा देऊन योग्य मार्गाने जाण्यास प्रवृत्त करतो, पण केव्हा, तर साधक त्याला पूर्ण शरण गेल्यावरच म्हणून आपण नम्र भावाने प्रार्थना करायची.
या श्लोकाचा मी केलेला काव्यानुवाद,
अग्निदेवा, तुला ज्ञात आमुची सर्व कर्मे, ने परमात्म्याकडे प्रकाशमान पथाने, नष्ट कर आमुचे भ्रमरूप पाप, नमस्कारीतो तुला आम्ही परत परत।

Web Title: So now, destroy the seed of sin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.