श्रीरंगात रंगले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 06:36 AM2019-03-20T06:36:41+5:302019-03-20T06:36:54+5:30

हे मुरारी, श्रीहरी, तुझ्याच रंगात माझ्या जीवनाचे वस्त्र रंगव अशी आळवणी करावीशी वाटतेय. कोण तो श्रीहरी? खरंच असा कुणी आहे? मुळात मी कोण आहे? खरंच कोण आहे मी?

 Shringered | श्रीरंगात रंगले

श्रीरंगात रंगले

Next

- शैलजा शेवडे

रंगले रंगात कितीदा, पुसून गेले ते परी,
रंगवी तुझ्याच रंगी, रंगपंचमी ती खरी।
अनंगरंगा मागणे हे, हे मुरारी श्रीहरी,
रंगवी तुझ्याच रंगी, रंगपंचमी ती खरी।
जीवनाचे वस्त्र हे, भक्तिभाव हा उरी,
श्रीरंगात रंगले, रंगपंचमी ती खरी।
हे मुरारी, श्रीहरी, तुझ्याच रंगात माझ्या जीवनाचे वस्त्र रंगव अशी आळवणी करावीशी वाटतेय. कोण तो श्रीहरी? खरंच असा कुणी आहे? मुळात मी कोण आहे? खरंच कोण आहे मी? गोकुळातली कोणी गवळण? कोण होत्या गोकुळातल्या गवळणी आणि त्या श्रीकृष्णाकडून रंगवून घेण्यात का स्वत:ला धन्य मानीत? एकनाथ महाराज म्हणतात, त्या जाण वेदगर्भीच्या श्रुती। होय! त्या श्रुती होत्या. नेती नेती म्हणत माघारी फिरलेल्या गोपींच्या रूपाने गोकुळात आल्या. रासक्रीडेच्या निमित्ताने त्या कृष्णाच्या सुखप्राप्तीचा अनुभव घेऊ लागल्या. रंगपंचमी खेळू लागल्या. त्यांनी लोकांना भक्तीची परमसीमा, मधुरा भक्ती दाखविली. निसर्गाशी एकरूप होत सण, आनंदसोहळा कसा बनवून टाकायचा ते दाखविले.

श्रीकृष्ण गोपींवर आनंदाचे नवे नवे रंग टाकायचा. त्याच्याखेरीज आनंदाची इतकी सुंदर रंगपंचमी कोण खेळणार? बघता बघता सर्व गोपगोपिकांना एकमेकांमध्ये कृष्ण दिसू लागायचा. त्याला आपल्या रंगाने ते रंगवू बघायचे आणि त्याच्याकडून आपल्याला रंगवू बघायचे इतकी सुंदर रंगपंचमी...

हे आनंदघना, त्या रंगपंचमीची आस लागलीय तशी रंगपंचमी अनुभवायचीय..!
क्षणैक रंगी रंगणे, क्षणैक ते आनंदणे,
क्षणैक तो जल्लोष अन् क्षणैक सुख पाहुणे।
शाश्वताची ओढ ती, अशी मनास लागली,
लुटुपुटीत रंगणे, हौस आता भागली।
एकदाच रे हरी, ओती रंग मजवरी
रंग रंग रंगू दे, अंतरी निरंतरी..।

Web Title:  Shringered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.