उसापेक्षा शेवरीच जास्त माजते !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 11:39 AM2018-10-24T11:39:10+5:302018-10-24T11:39:35+5:30

नारळाप्रमाणे उसाचा प्रत्येक भाग मानवाच्या उपयोगाला येत असतो. उसाच्या रसापासून साखर- गुळाची गोडी प्राप्त होते. पाचटापासून निवारा, बुंध्यापासून अग्नी, ...

Shewri more grow than sugarcane! | उसापेक्षा शेवरीच जास्त माजते !

उसापेक्षा शेवरीच जास्त माजते !

googlenewsNext

नारळाप्रमाणे उसाचा प्रत्येक भाग मानवाच्या उपयोगाला येत असतो. उसाच्या रसापासून साखर- गुळाची गोडी प्राप्त होते. पाचटापासून निवारा, बुंध्यापासून अग्नी, खत, चोपटापासून कागद, मळीपासून मद्य आदि मिळते. पण उसाच्या शेतात उसासाठी दिल्या जाणाऱ्या खत पाण्यावर वाढून ऊसाला मारक ठरणाऱ्या शेवरीपासून मात्र ना फुल, ना फळाची प्राप्ती होते. सर्वांगाने उपयोगाला येणारा ऊस मातला जावा, त्याची उत्तम वाढ व्हावी म्हणून दिले जाणारे खत-पाणी शेवरीच मोठ्या प्रमाणावर सहजपणे शोषून घेत असते. ती उसापेक्षा वेगाने वाढून आपली मान उसाच्यावर काढते. अशी उसाला मारक असणारी शेवरी वाढल्यानंतर ती खोदून काढणेही अवघड जाते. कारण तिला खोदताना ऊसही आपोआप खोदला जातो. एवढेच नाही तर उसाचे नुकसानही होते. अर्थात, शेवरी लहान आहे, तेव्हाच तिच्याकडे लक्ष देणे योग्य असते. जाऊ द्या, याच्याने काय होणार आहे, म्हणून दुर्लक्ष केले की पुढे ती उसाला हानीकारक होते.


उसातील शेवरीप्रमाणे मानवी जीवनात आपणाला अमानवतेच्या बऱ्याच शेवऱ्या वाढलेल्या पहायला मिळतात. स्वार्थापोटी चांगल्या लोकांच्या सहवासाचा, त्यांच्या नावाचा शेवरीप्रमाणे उपयोग करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. कष्ट करणाऱ्यांना फळ मिळते हे जरी सत्य असले तरी कष्ट करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या कष्टाचे फळ दुसरेच जास्त लाटतात हेही तेवढेच सत्य आहे. अर्थात, स्वत:चा कसलाही सहभाग नसताना दुसऱ्याच्या आयत्या पीठावर रेघा ओढण्याची, ते पीठ खाण्याची सवय अनेकांना असते. बैलगाडी खालून चालणाऱ्या कुत्र्याला, शेळीला आपणच बैलांसह गाडी ओढत आहोत, असे वाटत असावे, म्हणूनच की काय ते अधून मधून बैलगाडी खालून बैलांच्याही पुढे मागे पळत असतात. त्याप्रमाणे चांगल्याच्या, मोठ्यांच्या सहवासात राहणाऱ्या अनेक स्वार्थी लोकांना हे सर्व कांही आपल्यामुळेच घडत आहे असे वाटत असते. विशेष म्हणजे हे लोक न लाजता बेशक आपणच सर्वस्व आहोत, असे दाखवतही असतात. थोडी जरी संधी मिळाली की त्याचा फायदा घेतल्याशिवाय राहत नाहीत.


अनेक अधिकारी, पदाधिकारी कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी दौरे करतात. पण त्यांच्यासोबत असणाऱ्या अनेकांचे लक्ष कामाऐवजी दामाकडे व स्वत:च्या सेवेकडेच जास्त असते. अधिकारी पदाधिकाऱ्यांपेक्षा सोबतच्यांचाच जास्त रुबाब असतो. अशा स्वार्थी लोकांच्या वर्तनाचा अनिष्ट परिणाम निश्चितच त्यांच्या वरिष्ठावर होत असतो. तरीपण असे लोक त्यांच्या सहवासात पुन्हा-पुन्हा दिसतच असतात. पिंडीवरच्या विंचवाप्रमाणे, आपले स्थान पक्के करणाऱ्यांची त्यांच्या वरीष्ठांकडून हकालपट्टी का केली जात नाही ? अनेकवेळा असा प्रश्न उभा राहतो. तेव्हा असे उत्तर सापडते की, वरिष्ठांना यांच्या वर्तनाची जाणिव नसावी किंवा वरिष्ठांच्या कांही गोपनीय बाबी, त्यांची कमजोरी यांना माहिती असावी. आपला भंडाफोड होउ नये तसेच यांनी आपणाला अडचणीत आणू नये म्हणून यांचे लाड चालू असावेत असेही वाटते. बऱ्याचवेळा वरिष्ठ आणि संबंधित यांच्यातील संवादाचा अभाव हेही कारण यामागे असते. ज्यांना अधिकार आहे किंवा ज्यांच्यासाठी सर्वकांही घडवून आणले जात आहे, त्यांच्यापेक्षा सोबतचे अधिकार नसलेलेच लोक सर्व प्रकारचे अवास्तव अधिकार गाजवतात. लग्नात जावयापेक्षा सोबतीच्यांचाच जास्त गाजावाजा असतो, अगदी त्याप्रमाणे या लोकांचे असते. स्थानिक स्वराज संस्थांमध्ये महिलांना आरक्षण आहे. या आरक्षणावर निवडून आलेल्या अनेक महिलांचे पतीच अधिकार गाजवत असतात. अध्यात्मिक क्षेत्रात महाराज, कीर्तन, प्रवचनकारांपेक्षा त्यांच्या सोबत राहणारेच जास्त सेवा करुन घेतात. असे करा, तसे करा, असे हवे ते सल्लेही देत असतात. सामाजिक क्षेत्रातही हीच अवस्था आहे. खरे समाजसुधारक दूर राहतात आणि त्यांच्या कार्याचे फळ लाटण्यासाठी सोबतचे लोकच पुढे येत असतात. स्वार्थापोटी पुढे पुढे करणारे हे स्वार्थी व कर्मशून्य लोक चांगल्यांच्या बदनामीस कारणीभूत ठरतात. चांगल्यांच्या बदनामीला, नाशाला हे कसे कारणीभूत ठरतात हे वाल्मिकी रामायणातील एका संस्कृत सुभाषितातून आपल्या लक्षात येईल.


दुर्मंत्री राज्य नाशाय ग्रामनाशाय कुंजर: ।
शालको गृहनाशाय सर्वनाशाय मातुल:।।


अर्थात, वाईट मंत्री राज्याचा नाश करतो. मोकाट हत्ती गावाचा नाश करतो. लाडावलेला बायकोचा भाऊ घराचा खेळखंडोबा करतो. अहंकार व स्वार्थाने परिपक्व झालेला मामा सर्वनाशास कारणीभूत ठरतो. चांगल्यांच्या, मोठ्यांच्या सहवासात राहणारे अनेक लोक अशा मंत्र्यांची, मोकाट हत्तीची, लडिवाळ मेव्हण्याची तसेच स्वार्थी मामांची भूमिका बजावत असतात. अशा लोकांचा माज चांगल्यांच्या विनाशाला कारणीभूत ठरत असतो. म्हणून चांगल्यांनी अशा लोकांची वेळीच दखल घेतली पाहिजे. शेवरी ऐवजी ऊस मातला तर शेतकऱ्यासाठी ते जास्त सुखावह होईल. त्याप्रमाणे चांगल्यांच्या विनाशाला कारणीभूत होणारे मातण्याऐवजी चांगले मातले तर त्यांचा मात सर्वांसाठी आनंदावह होईल. आपल्या देशाला निस्वार्थी व चांगल्या नागरीकांची खूप गरज असल्याने तुकाराम महाराजांच्या


वर्णाभिमान विसरलीं याति। एक एका लोटांगणीं जाती रे ।।
होतो जय जय कार गर्जत अंबर। मातले वौष्णव वीर रे ।।


या अभंगाप्रमाणे स्वार्थ, व्देष, मत्सर, दंभ, अहंकार, वर्णभेद नष्ट होउन समता, शांती, नम्रता, प्रेम, बंधूत्वाच्या आचार-विचाराने सर्वजन मातले जावेत, उन्नत व्हावेत. हा मात, ही उन्नता आपल्या, कुटुंबाच्या, समाजाच्या आणि पर्यायाने देशाच्या सर्वांगिण विकासाच्या कामी येऊ शकेल.

                                                                                                                   - डॉ. विजयकुमार पं फड , श्री माऊली निवास, श्री माऊलीनगर औरंगाबाद.

Web Title: Shewri more grow than sugarcane!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.