आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतनातून आत्मसुख 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 11:17 AM2019-02-11T11:17:34+5:302019-02-11T11:18:41+5:30

आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतनातून आत्म सुखाच्या मार्गावर व्यक्ती आपोआप चालू लागेल व मनात असणारे राग, लोभ, मद, मोह, मत्सर यांपासून मुक्त होऊन व्यक्ती चिरकाल आत्मसुखाचा आनंद घेऊ शकेल.

Self-Examination and Self-Sufficiency leads towards Self-Succinct | आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतनातून आत्मसुख 

आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतनातून आत्मसुख 

googlenewsNext

प्रत्येक व्यक्तीची जीवन जगण्याची एक पद्धत असते. बोलण्याची लकब असते, विचारांची पद्धत असते आणि राहणीमानाची सुद्धा एक पद्धत असते. या गोष्टींमुळे प्रत्येक व्यक्तीला आपण जे बोलतो, ज्या पद्धतीने वागतो, तेच बरोबर आहे असे वाटत असते. आपलेच विचार बरोबर, आपलीच वागण्याची पद्धत योग्य असे प्रत्येक व्यक्तीला वाटत असते. कळतनकळतपणे व्यक्ती आपले विचार दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न करत असते. एखाद्या गोष्टीवर आपलेच मत योग्य, असे प्रत्येकाला वाटत असते. आपल्या विचारांच्या चष्म्यातून प्रत्येक व्यक्ती स्वतः चे मत योग्य असल्याचे दुसऱ्याला पटवून देण्याचा प्रयत्न करत असते. हे मत समोरच्या व्यक्तीला पटले तर व्यक्तीला चांगले वाटते. हेच विचार समोरच्याला पटले नाही तर व्यक्तींमध्ये वाद होतात. एकमेकांमध्ये वैरभाव निर्माण होतात. 

व्यक्तीच्या विचार करण्याच्या पद्धतीवर त्याचे इतरांशी असणारे संबंध मैत्रीचे आहेत की दुराव्याचे हे लक्षात येते. परंतु जीवन जगत असतांना व्यक्तीचा अनेक विचारांच्या लोकांशी संबंध येत असतो. काहींच्या विचारांचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर निश्चित पडत असतो. या सर्व गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी जीवन जगत असतांना प्रत्येक व्यक्तीने स्वत: आत्मचिंतन करायला हवे. आज कुणीही हे आत्मचिंतन नात्यांमध्ये करतच नाही. त्यामुळे नात्यांमध्ये फार दुरावा निर्माण होत आहे. प्रत्येकाला आपण जे बोलतो, जे करतो, ज्या पद्धतीने वागतो तेच योग्य वाटत असते. 

प्रत्येक नात्यांमध्ये आज निर्माण होणारा दुरावा हे व्यक्तीने आत्मचिंतन न केल्याचा परिणाम आहे. आपलेच ते खरे मानून व्यक्ती आपले विचार दुसऱ्याला बळजबरी पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो. समोरच्या व्यक्तीने एखद्या घटनेच्या वेळी घेतलेला निर्णय कशा परिस्थितीत घेतला ? त्या मागचे कारण काय होते ? हे समजून न घेता व्यक्ती समोरच्या व्यक्तीला एकतर बावळट ठरवते किंवा चूक ठरवते. परंतू अशा परिस्थितीत आपण जर त्या व्यक्तीच्या जागी असतो, तर कदाचित आपल्या वर ही तशीच वेळ आली असती हे व्यक्तीला लक्षात येत नाही. कारण व्यक्ती आत्मचिंतनच करत नाही. त्यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. 
    
पती-पत्नीचे नाते असो की; सासू-सुनेचे किंवा आई-वडिलांचे आणि मुलांचे प्रत्येक व्यक्तीने नात्यांच्या ओलाव्यासाठी आत्मचिंतन करण्याची आज खूप गरज आहे. काळानुसार नात्यांमध्ये निर्माण होणारे दुरावे, हे एकमेकांना समजून न घेतल्यामुळे वाढत आहेत. नात्यांचा विचार करतांना आत्मचिंतन यासाठी की, प्रत्येक व्यक्तीचे समोरच्या व्यक्तीला समजून घेतांना चुकत असते. उदा. प्रत्येक स्त्रीला वाटत असते की तिच्या मनाप्रमाणे तिच्या पतीने वागावे. तसेच पतीलाही वाटत असते की आपल्या पत्नीने आपल्या मता प्रमाणे वागावे. जर दोघेही एकमेकांच्या मताप्रमाणे वागले नाही तर दोघांमध्ये वाद होतात आणि साताजन्माच्या बांधलेल्या गाठी ढिल्या होऊ लागतात. कधी कधी या गाठी कायमच्या सुटतात. 

परंतू या ढिल्या होणाऱ्या गाठी घट्ट होण्यासाठी दोघांनी आत्मचिंतन केले आणि घेतलेल्या आणाभाका आठवल्या तर निश्चित ढिल्या होणाऱ्या गाठी घट्ट होतील. पण त्यासाठी प्रत्येकाने आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. आत्मचिंतन केल्याने व्यक्तीला स्वतःची ओळख होते, स्वतः मध्ये असणारे चांगले गुण कळतात, स्वतः मध्ये असणारी कमतरता ओळखता येते. ज्या वेळी व्यक्ती स्वतः मधले गुण दोष ओळखेल, त्या वेळी तो समोरच्या व्यक्तीला समजून घेऊ शकेल. नुसते समोरच्या व्यक्तीवर आपले विचार लादून नात्यांमध्ये दुरावे निर्माण करण्यापेक्षा स्वतः आत्मचिंतन करून, स्वतः तील गुण-दोष ओळखून, आपल्याप्रमाणेच समोरच्या व्यक्ती मध्ये काही चांगले- वाईट गुण असतील याचा प्रत्येक व्यक्तीने विचार केला पाहिजे. तेंव्हा कुठे नात्यांमधील ओलावा टिकून राहील आणि ऋणानुबंध घट्ट होतील. 

तसेच आत्मचिंतनातून व्यक्तीला स्व विकास, व्यक्तिमत्व विकास आणि व्यक्ती म्हणून आपण जे करतोय, वागतोय, जगतोय याचे आत्मिक समाधान प्राप्त होईल. आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतनातून आत्म सुखाच्या मार्गावर व्यक्ती आपोआप चालू लागेल व मनात असणारे राग, लोभ, मद, मोह, मत्सर यांपासून मुक्त होऊन व्यक्ती चिरकाल आत्मसुखाचा आनंद घेऊ शकेल.

- सचिन व्ही. काळे (9881849666) 

Web Title: Self-Examination and Self-Sufficiency leads towards Self-Succinct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.