अत्त दीप भव...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 05:38 PM2018-11-01T17:38:26+5:302018-11-01T18:57:39+5:30

- धर्मराज हल्लाळे महात्मा गौतम बुद्ध यांनी मानवाला स्वयंप्रकाशित होण्याचा संदेश दिला आहे. अत्त दीप भव... अर्थात स्वत: स्वयंप्रकाशित बना. ...

self encouragement message by gautam buddha | अत्त दीप भव...

अत्त दीप भव...

googlenewsNext

- धर्मराज हल्लाळे

महात्मा गौतम बुद्ध यांनी मानवाला स्वयंप्रकाशित होण्याचा संदेश दिला आहे. अत्त दीप भव... अर्थात स्वत: स्वयंप्रकाशित बना. आई-वडील आपल्या अपत्याला सांगतात, आम्ही तुला आयुष्यभर साथ देणार आहोत. आमचे आयुष्य संपले की आम्ही निघून जाऊ, पुढचे आयुष्य तुलाच जगायचे आहे. त्यामागे भावना असते ती आपल्या मुलाने अथवा मुलीने स्वत:च्या जीवनाचा मार्ग स्वत: निवडावा आणि तो स्वत: समृद्घ करावा. आई-वडील नक्कीच मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत. परंतु, त्यांची सावली मुलांसाठी आयुष्याच्या अखेरपर्यंत नाही. हे जीवनमूल्य महात्मा गौतम बुद्घांनी जगाला दिले आहे. तुम्ही इतरांकडे पाहू नका. कोणीतरी मदत करेल या भावनेने विसंबून राहू नका. स्वत:चे आयुष्य घडविण्यासाठी सज्ज व्हा. मानवकल्याणाची दृष्टी सदोदित ठेवा. अर्थात, गौतम बुद्घांनी सम्यक दृष्टी सांगितली आहे. प्रत्येकाला दु:खापासून मुक्ती हवी असते. आपण सदैव सुखाचा शोध घेत असतो. त्यासाठी एखादे छत्र आपल्याला हवे असते. आई-वडील, शिक्षक, मार्गदर्शक यांचे जीवनात नक्कीच मोल आहे. मात्र, एका विशिष्ट वेळेनंतर स्वत:चे प्रश्न सोडविण्यासाठी स्वत: पुढे आले पाहिजे. ध्येय ठरवून आयुष्य जगा. मात्र, आपले ध्येय हे उदात्त असावे. म्हणजेच सम्यक संकल्प अभिप्रेत आहे. आपले बोलणे सत्य आणि योग्य असले पाहिजे, हे सांगताना गौतम बुद्घांनी सम्यक वाणी सांगितली आहे. कर्मसिद्घांत तर प्रत्येक धर्मात सांगितला आहे. गौतम बुद्घांनीही सम्यक कर्म अर्थात जीवनमूल्यांशी निगडित सद्मार्गावरील आचरणाची अपेक्षा केली आहे. जे काही आपण मिळवतो, तेही योग्य मार्गाने मिळविले पाहिजे. संत तुकाराम म्हणतात, जोडूनिया धन, उत्तम व्यवहारे...अगदी तोच विचार बुद्घ काळापासून सांगितला जात आहे. आपली उपजीविकासुद्घा सम्यक म्हणजेच चांगल्या मार्गाने असली पाहिजे. त्याचप्रमाणे सम्यक स्मृती, सम्यक व्यायाम आणि सम्यक समाधी सांगितली आहे. ज्याद्वारे आचरणातील दोष निघून जातील. माणूस परिपूर्ण होईल. सुख-दु:खाच्या फेऱ्यात न अडकता आनंदी जीवन जगू शकेल. अर्थात अत्त दीप भव... हे जीवनाचे मर्म असून, महात्मा गौतम बुद्ध यांनी सांगितल्याप्रमाणे आपण  स्वयंप्रकाशित होऊन स्वत:च्या जीवनातील अंधकार दूर करावाच; त्याचबरोबर समाजालाही प्रकाशमान करावे.

Web Title: self encouragement message by gautam buddha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.