अखंड आनंदाचं रहस्य... विसरून जाल दुःख 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 04:51 PM2018-11-20T16:51:47+5:302018-11-20T16:52:15+5:30

सच्चा वारकरी विठोबा रखमाईचं किंवा ग्यानबा तुकारामचं नाम घेत पंढरीच्या वाटेवर ‘आनंदात’ चाललेला असतो. तो आनंदात असतो कारण त्याला कुठंही पोचायचं नसतं.

The secret of eternal happiness | अखंड आनंदाचं रहस्य... विसरून जाल दुःख 

अखंड आनंदाचं रहस्य... विसरून जाल दुःख 

Next

>> रमेश सप्रे

‘आनंदायन’ या दोन शब्दात आहेत ‘आनंद’ आणि ‘अयन’, अयन शब्दाचा एक अर्थ आहे प्रवास. आपण दक्षिणायन, उत्तरायण, रामायण असे शब्द वापरतो तेव्हा हा ‘प्रवास’ अर्थच बरोबर असतो. रामाचा अयोध्येपासून लंकेपर्यंतचा वनवासातील प्रवास ते रामायण.

‘अयन’ शब्दाचा दुसरा अर्थ आहे निवास म्हणजे वसतीस्थान. जेव्हा आपण नारायण हा शब्द उच्चारतो तेव्हा हा ‘निवास’ अर्थच बरोबर असतो. ‘नार’ हे नर या शब्दाचं अनेकवचन आहे. म्हणून ‘नार’ याचा अर्थ झाला नरांचा समुदाय म्हणजेच मानवजात. सारे मानव हे ज्याचं वसतीस्थान (अयन) आहेत तो नारायण. गंमत म्हणून पाहूया ‘नार’ या शब्दाचा दुसरा अर्थ आहे ‘पाणी’ म्हणजे पाणी हे ज्याचं निवासस्थान आहे तो नारायण. सागराच्या तळाशी शेषशय्येवर आरामात पहुडलेला (शांताकांर भुजगशयन) असा भगवान विष्णू-नारायण हा असा नार (पाणी) हेच अयन (निवासस्थान) असलेला भगवंत आहे असो.

आनंदायन म्हणजे आनंदाचा आनंददायी केलेला प्रवास नाही. कारण सर्वत्र गच्च भरून, ओसंडून वाहणारा आनंद जो मिळवण्यासाठी कोठेही जावे वा यावे लागत नाही. जिथं, जेव्हा जी कृती करताना, ज्या व्यक्ती वा वस्तूच्या सहवासात आपण असता त्यावेळी आपण सदैव आनंद अनुभवू शकतो.

इथं एक गोष्ट ध्यानात ठेवायला हवी. सच्चा वारकरी विठोबा रखमाईचं किंवा ग्यानबा तुकारामचं नाम घेत पंढरीच्या वाटेवर ‘आनंदात’ चाललेला असतो. तो आनंदात असतो कारण त्याला कुठंही पोचायचं नसतं. पावलापावलाला प्रत्येक श्वासावर जे नाम चालू असतं तोच त्याचा विठ्ठल असतो नि तेच त्याचं पंढरपूर असतं. म्हणूनच प्रपंचातले सारे प्रश्न, सगळ्या अडचणी आहेत तशाच असल्या तरी तो मुक्तीचा आनंदसोहळा उपभोगत असतो. फार मोलाची गोष्ट आहे ही.

एकदा गोंदवल्याला पू. ब्रह्मचैतन्य महाराजांच्या उपस्थितीत सत्संग चालू असतो. एकाएकी श्री महाराज सर्वांना उद्देशून प्रश्न विचारतात. ‘मला सांगा, तुमच्यात पूर्ण सुखी किंवा सर्व सुखी कोण आहे?’ अपेक्षेप्रमाणे कुणीही हात वर केला नाही. यावर श्री महाराजांनी एका साधकाला विचारलं, ‘तुमच्या दु:खाचं काय कारण आहे?’ तो उद्गारला, ‘नोकरी नाही, महाराज.’ हळहळून श्री महाराज म्हणाले, ‘नोकरी नाही म्हणजे दु:खच की हो! दुसऱ्याला विचारलं, ‘तुमच्या दु:खाचं कारण काय? नोकरी आहे ना तुम्हाला’ ‘हो, आहे की! पण मालक (बॉस किंवा साहेब) चांगले नाहीत’ यावर असून श्री महाराज म्हणाले, ‘यांना नोकरी नाही म्हणून हे दु:खी; पण हे नोकरी असूनही दु:खी. याचा अर्थ नोकरी हे सुख-दु:खाचं कारण नाही. याच प्रमाणे श्री महाराजांनी दु:खाचं कारण विचारल्यावर अनेकांनी लग्न जमत नाही. लग्न होऊनही मूल नाही, घरात मुलच मुलं (लेकुरे उदंड झाली) ...अशी ना ना प्रकारची कारणं सांगितले. ती शांतपणे ऐकून श्री महाराजांनी एक सिद्धांत सांगितला.

‘सुख-दु:ख नावाची गोष्टच अस्तित्वात नाही. आपणच सुख-दु:खाला जन्माला घालतो नि मग स्वत: सुखी किंवा दु:खी होतो’ यातही प्रमाण असतं.

‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे.’

आनंदाचे मात्र असं नसतं. काहीही असलं ती नि काहीही नसलं तरी माणूस अखंड आनंदात राहू शकतो. भागवतातील प्रसिद्ध यदू राजा नि अवधूत दत्तात्रेय यांच्यातील संवादाचा आरंभ असाच होतो. यदू राजा-- राज्य, सामर्थ्य, वैभव सारं असूनही आप्त प्रज नि सेवक, मंत्री त्यांच्याशी एकनिष्ठ असूनही तो कायम दु:खी, बेचैन असतो. याउलट अंगावर वस्त्र नसलेले, हातात भिक्षापात्र नि काखेला झोळीही नसलेले अवधूत मात्र अत्यंत आनंदात असतात. करतल भोजन नि तरुतल शयन असं असूनही परमशांत, तृप्त, समाधानी असतात. त्याचं ‘अवधूत’ नावच या आनंदात रहस्य उलगडत असतं. ‘अव’ म्हणजे अखंड वर्तमान अन् यासाठी भूतकाळातही स्मृती नि भविष्यकाळातही चिंता सतत धूत राहायला हवं. ही अखंड वर्तमानकाळातच असलेली मनाबुद्धीची ‘धूत (सतत धुवत राहत असलेली)’ अवस्था हेच अखंड आनंदाचं रहस्य आहे. खरं ‘आनंदायन’ आनंदाचं निवासस्थान आहे.
 

Web Title: The secret of eternal happiness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.