डॉक्टरांचा हातगुण नावाचा प्रकार असतो?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 04:54 PM2019-02-08T16:54:32+5:302019-02-08T17:01:57+5:30

डॉक्टरांच्या दर्शनानं, स्पर्शानं, बोलण्यानं नुसत्या जवळ असण्यानं सुद्धा रोग्याला अर्ध बरं वाटतं. उरलेलं काम औषध करतं. 

The role of spirituality in health care | डॉक्टरांचा हातगुण नावाचा प्रकार असतो?

डॉक्टरांचा हातगुण नावाचा प्रकार असतो?

Next

रमेश सप्रे

काही मित्रांची मस्त बैठक जमली होती. त्यांचा कॉफी क्लब होता. कॉफी पिता पिता एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी ती मध्यमवयीन मंडळी जमायची. कधी कधी विषय आधी ठरलेला असे तर कधी कधी आयत्यावेळी एखात्याला उत्स्फूर्त सुचेल तो. 

त्या दिवशी असंच झालं. एक जण हॉस्पिटल-डॉक्टर-औषध नि त्यांची बिलं यांनी खूप कंटाळून गेला होता. घरातल्यांची आजारपणं नि त्या निमित्तानं औषध-डॉक्टर यांनी पुरता गांजून गेला होता. सर्वात जास्त त्याला मनस्ताप झाला होता डॉक्टरांच्या उदासीन बेफिकीर वृत्तीचा. बाकीच्या गोष्टी प्रारब्धाचा भाग म्हणून तो स्वीकारू शकत होता; पण डॉक्टर, नर्सेस यांचं वागणं मात्र त्याला खटकत होतं. काही अपवाद निश्चितच होते; पण अपवादच!

यावर कळस म्हणून की काय ती त्यांची मारुतीच्या शेपटीसारखी दिली जाणारी औषधं-त्यांची यादी कधी संपतच नाही. शिवाय या सर्वाची गगनचुंबी बिलं. अशा परिस्थितीत ‘जगण्याने छळळे होते, सरणाने (मरणाने) ते संपविले’ हा अनुभव त्याला येत होता. आनंद म्हणून काय तो नि त्याचे कुटुंबीय अनुभवू शकत नव्हते. त्यात चर्चेला तोंड फोडलं. ‘डॉक्टर जगतात की नागवतात?’ तसं पाहिलं तर हा विषय नवीन नव्हता. काही वर्षापूर्वी एका समाजाचं ऋण मान्य करणाऱ्या नि डॉक्टरी हा धंदा न मानता एक व्रत किंवा सेवेची संधी मानणाऱ्या डॉक्टरने एक प्रदीर्घ लेख लिहून या चर्चेला निमंत्रण दिलं होतं. बरेच दिवस वृत्तपत्रतून, वादविवादसभातून यावर खडाजंगी चालू आहे. बहुतेकांचं मत डॉक्टर नागवतात असंच होतं. यात रुग्णांची संख्या अधिक होती पण काही सजग, सहृदयच डॉक्टरांनीही असंच मत मांडलं होतं. त्याचा उपयोग किती झाला हे नंतर सर्वानीच अनुभवलं. अर्थात परिणाम शून्यच झाला. 

त्यानंतर आता काही दशकं लोटल्यावर साऱ्या जीवन व्यवहाराचंच बाजारीकरण झाल्यावर तर असह्य वाटावी अशी परिस्थिती निर्माण झालीय. एखाद्याचा जीव ज्यावेळी डॉक्टर वाचवतात, अनेकांना व्याधिमुक्त, वेदनामुक्त करतात त्यावेळी त्यांच्या सेवेला मोल नसतं. हे खरं असलं तरी एकूणच डॉक्टरांच्या जाळ्यात (नेटवर्क) सापडणं हा जीवघेणा अनुभवच असतो. 

चर्चा अगदीच नकारात्मक, निषेधात्मक दिशेनं चाललीय हे लक्षात आल्यावर एकानं या विषयाला एक नवा फाटा फोडला ‘डॉक्टरांचा हातगुण नावाची काही गोष्ट असते का?’ अनेक हलकी फुलकी उत्तरं आली- ‘हात गुण म्हणाल तर खिसेकापूचाही असतो. आपला खिसा कापला जातोय हे आपल्याला कळतही नाही. ही एक प्रकारची सर्जरीच नव्हे का?’ इतरांचं मत पडलं ज्याच्याकडे कौशल्य आहे किंवा कौशल्याची अपेक्षा आहे त्याच्या बाबतीत हातगुण शब्द वापरणं योग्य होईल. निरनिराळे कारागीर, कलाकार, डॉक्टरांमधील सुद्धा काही शल्यविशारद (सर्जन्स) इतकंच काय पण स्वयंपाक करणारी बाई किंवा घराघरातली आई यांच्यात हातगुण असणं शक्य असतं. 

एकानं फार हृदयस्पर्शी विचार मांडला. आईचा स्वयंपाक कलेतील हातगुण फक्त त्या कृतीतला नसतो तर ज्या ममतेनं, आत्मियतेनं ती तो स्वयंपाक ‘आपल्या’ माणसांसाठी करते त्यात असतो. जणू या वात्सल्यभावनेचं अमृत तिच्या हातावरच्या रेषांतून त्या त्या पदार्थात उतरत असतो. यातून साकारतो हातगुण! सर्वानाच हा विचार खूप भावला; पण डॉक्टरांचा हातगुण म्हणजे काय?

एकदा पू. गोंदवलेकर महाराजांना हाच प्रश्न एका डॉक्टर भक्तानं विचारला. त्यावर त्यांनी फार मार्मिक उत्तर दिलं- ते म्हणाले-

‘हो ना, डॉक्टरांचा हातगुण असतोच. तो त्याच्या ज्ञानात, रोगाची परीक्षा करण्यात, औषध योजनेत किंवा उपचार पद्धतीपेक्षा त्याच्या कृतीत, रोग्यांकडे पाहण्याच्या दृष्टीत व्यक्त होतो. म्हणजे हा रोगी आपल्याला पैसा देईल का, त्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे असा विचार मनात आला की त्याचं लक्ष विभागलं जाईल नि हाताला गुण येणार नाही. रोग एखाद्यावेळी बरा होईल; पण रोग्याच्या मनाचं समाधान होणार नाही. यातून डॉक्टर, रोगी, त्याचे नातेवाईक यापैकी कुणालाही आनंद लाभणार नाही. मग डॉक्टरच्या हातगुणाचा प्रश्न उद्भवणार नाही.’

खरंच हातगुण हा नि:स्वार्थी प्रेम, सेवाभाव, कर्तव्यभावना याचं फलित असतं. डॉक्टरवर यामुळे रोग्याची श्रद्धा बसते. डॉक्टरांच्या दर्शनानं, स्पर्शानं, बोलण्यानं नुसत्या जवळ असण्यानं सुद्धा रोग्याला अर्ध बरं वाटतं. उरलेलं काम औषध करतं. 

आपल्याला आपल्या सर्व कृतीत असा हातगुण आणता येईल. यातून असा आनंद उसळेल की आपल्याबरोबर सारे संबंधित लोक आनंदात न्हावून निघतील. मनसोक्त नि मनमुक्तपणे! विशेष म्हणजे अशा हातगुणाला नि त्यातून निर्माण होणाऱ्या आनंदाला एकही पैसा लागत नाही. तो असतो ‘अती साजिरा, स्वल्प, सोपा,फुकाचा’ भगवंताच्या नामातून मिळणाऱ्या मन शांत करणाऱ्या ईश्वरी प्रसादाचा अनुभव देणाऱ्या आनंदासारखा!

Web Title: The role of spirituality in health care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.