क्रांतीकारी विचारवंत: संत रविदास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 01:28 PM2019-02-19T13:28:53+5:302019-02-19T13:29:00+5:30

संत रविदासांच्या वडिलांचे नाव संतोरवदास आणि आईचे नाव कळसादेवी असे होते. बालपणापासूनच संत रविदासांना भजन, कीर्तन आणि अध्यात्माची आवड होती.  

Revolutionary thinking: Sant Ravidas | क्रांतीकारी विचारवंत: संत रविदास

क्रांतीकारी विचारवंत: संत रविदास

googlenewsNext

गुरू रोहिदास महाराज यांची १९ फेब्रुवारी ही जयंती, तर तिथीनुसार माघ पौर्णिमा! संत रोहिदास महाराज हे १४ व्या व १५ व्या शतकात होऊन गेले. त्या काळात जन्मतारखांची नोंद ठेवली जात नव्हती. काहींच्या मते, त्यांचा जन्म १५ फेब्रुवारी १३९८ रोजी झाला, तर काहींच्या मते माघ पौर्णिमेला १३७६ साली झाला. मात्र माघ पोर्णिमा ही सर्वमान्य जयंतीची तारीख निश्चित झालेली आहे.

संत रविदासांच्या वडिलांचे नाव संतोरवदास आणि आईचे नाव कळसादेवी असे होते. बालपणापासूनच संत रविदासांना भजन, कीर्तन आणि अध्यात्माची आवड होती.  चांभार समाजात जन्माला आल्यानंतरही त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य  जातींवर आधारलेली विषमतावादी समाजव्यवस्था बदलण्यासाठीच खर्ची घातले.  तत्कालीन समाज व्यवस्थेतील तळागाळातील शेवटचा घटक सुखी व्हावा,   एकमेकां प्रति आदर निर्माण व्हावा, जातीय आणि सामाजिक सलोखा निर्माण व्हावी, अशीच विचारधारा गुरु रविदासांची होती. म्हणजेच,     मानवतावाद, बंधुत्ववादी विचार गुरु रविदासांना प्रिय होते.         चौदाव्या शतकात उत्तरप्रदेशातील चांभार वंशात जन्मलेल्या रविदासांनी  सामाजिक कार्याचा प्रचार व प्रसार संपूर्ण उत्तर आणि दक्षिण भारतात केला. त्यामुळे संत रविदास विविध प्रांतामध्ये विविध नावांनी ओळखले जातात. यामध्ये बंगलीमध्ये रुईदास, रूयदास, राजस्थानीमध्ये रोहिदास, मराठीत रविदास, रोहिदास, रोहितदास तर पंजाबीमध्ये रैदास किंवा रेयीदास आणि हिंदी रविदास व रैदास अशी विविध नावे त्यांची प्रचलित आहेत. प्रचंड प्रतिभा, प्रभावी वाणी, संघटन कौशल्य, सामान्य जनतेविषयी आस्था, श्रध्दा, प्रेम, करुणा बंधुत्व हेच अष्टपैलू त्यांच्या व्यक्तीमत्वाचे होते. 

संत रोहिदासांना महाराष्ट्रात ‘रोहिदास’ म्हणतात, पण देशातील अनेक प्रांतात त्यांना वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. ज्या उत्तर प्रदेशातील काशी जवळील मांडूर गावी त्यांचा जन्म झाला, तिथे त्यांना ‘रविदास’ नावाने ओळखले जाते. संत रोहिदास भारतातील एकमेव असे संत आहेत की, त्यांना १६ नावांनी ओळखले जाते. त्यांची स्मारके, पुतळे, त्यांच्या नावाच्या धर्मशाळा देशभर आहेत.त्यांना पूर्ण देश ओळखतो. ख-या अर्थाने ते एकमेव राष्ट्रीय संत आहेत! 

१४ व्या शतकापासून आजपर्यंत सर्व समाजाला त्यांची दखल घ्यावी लागली. यातच त्यांचे वेगळेपण व त्यांचे सामर्थ्य अधोरेखित होते. शिखांच्या ‘गुरू ग्रंथसाहिब’मध्ये संत रोहिदासांची ४० पदे आहेत. संत रविदास हे हिंदू संत असतानाही शिखांच्या धर्मग्रंथात त्यांच्या रचनांना मानाचे स्थान मिळाले, याचाच अर्थ त्यांच्या दोह्यांमधला, पदांमधला भावार्थ हा हिंदू धमार्पुरता संकुचित नव्हता. ते मानवतावादी संत होते.  त्यामुळेच गुरुनानक हे रोहिदासांची गीतं, भजने म्हणत असल्याचे संदर्भ आढळतात.

 मन शुद्ध असेल तर कुठेही समाधान लाभते, पाणी मनाने कितीदाही अन् कोणत्याही नदीत स्रान केले तरी समाधान लाभत नाही, असा विचारच संत रविदासांचा होता.  ‘मन चंगा तो कठौती मे गंगा’ ही हींदी म्हणही संत रविदासांच्या वाणीतूनच आली आहे.  माणसाचे मन पवित्र असेल, त्याला जातीयवादाचा स्पर्श झाला नसेल तर चांभाराच्या कुंडातही त्याला गंगाजलाचे पावित्र्य दिसून येईल. चांभार हा देखील एक माणुसच आहे, त्याला हिन ठरवू नका, पवित्र किंवा निखळ मनाने पाहिले तर कुंडातही गंगा दिसू शकेल, केवळ तशी दृष्टी जोपासायला पाहिजे, या विचारधारेतून संत रविदासांच्या विचारांची व्यापकता कळून येते. 

रविदास, रोहिदास संत कबीरांचे गुरूबंधू होते. स्वामी रामानंद हे त्यांचे गुरू. रविदासांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजाला उपदेश केला. संत रविदासांच्या विचारांनी प्रेरीत होवून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘द अनटचेबल’ हा ग्रंथ संत रविदासांच्या चरणी अर्पण केला आहे. 

  सतमार्गावरून चालण्यासाठी केलेला त्यांचा उपदेश आजही अंगीकारण्यासारखा आहे. विशेष म्हणजे त्यांच्या भक्तीसाहित्यात नेहमीच्या बोलीतले शब्द होते. त्यामुळे त्यांचे साहित्य लोकांना भावले. त्याशिवाय पारतंत्र्याविषयीची बंडखोरीही रविदासांच्या साहित्यातून दिसून येते. ज्यावेळी मुस्लिम आक्रमक भारतात शिरले त्यावेळी त्यांनी लादलेल्या पारतंत्र्याविषयी रविदासांनी स्पष्टपणे लिहून ठेवले आहे. जात-पात- श्रध्दा-अंधश्रद्धा नव्हे तर, एकजूट आणि धर्म आणि देशप्रेमाबाबतही संत रविदासांनी अतिशय रोकठोक विचार प्रकट केलेत. 

‘हिल,मिल चलो जगतमे, फूट पडो दो नही, फूट पडी माची तो, देश नष्ट हो जाई’

    अर्थातच, एकजुटीला संत रविदासांच्या दृष्टीकोनातून अनन्यसाधारण महत्व आहे.  देशहितासाठी आपआपसात, समाजासमाजात तेढ निर्माण होवू देवू नका असा अमुल्य संदेश देत, मतभेदामुळे समाज आणि देशाची अपरिमित हानी होत असल्याचेही त्यांच्या विचारधारेवरून दिसून येते. म्हणजेच, माणुस आणि देशाच्या हितासाठीच संत रविदासांचे उपदेश असल्याचे दिसून येते.

    गुरु रविदासांच्या विचारधारेत ‘मनुष्य’ हाच धर्माचा केंद्र बिंदू  होता. धर्म हा मानवांसाठी असून मानवांच्या सर्वांगीण कल्याणासाठीच धर्माने आपली भूमिका वठवावी, असे त्यांना अभिप्रेत होते. इतकेच नव्हे तर,  मूर्तिपूजेसारख्या कर्मकांडावर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता.  मानवी मनाला सुयोग्य विचार करण्याची दिशा लावणे हेच सर्व सुखाचे उगमस्थान असल्याची धारणा रविदासांची होती.     केवळ अन्नाचा अर्थातच पोटपाण्याचा विचार न मांडता, लहान- थोर, गरिब-श्रीमंत, स्पृश्य-अस्पृश्य यांच्यात समानता असावी, सर्वांना समान अधिकार असावेत.  कोणताही भेद नसल्यासच रविदास प्रसन्न राहू शकतील, असे समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचेच संत रविदासांचे विचार आहेत. सर्व जीव एकाच मातीतून बनलेली भांडी आहेत. त्यांना बनविणाराही एकच आहे. एकाच परमात्म्याची ही सारी रूपे आहेत. इथे कोणी छोटा मोठा नाही. मेहनतीलाच प्रभूभक्ती समजतो त्याचे जीवनच यशस्वी होईल, असे ते सांगतात.

एकै माटी के सम झांडे, सबका एको सिरजनहारा

रविदास व्यापै एकों घट भीतर, सभको एकै घडै कुम्हारा 


    उपरोक्त चार ओळींतूनच संत रविदासांच्या विचारांची समाजवादी विचारांची व्यापकता कळून येते. 


- तुळशीराम राजाराम गवई

- अकोला.

 

Web Title: Revolutionary thinking: Sant Ravidas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.